Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी गझल : १९२० ते १९८५ Gazalkar Divakar Chaukekar

 🍀 पुस्तक परिचय 🍀



🌷'मराठी गझल : १९२० ते १९८५'🌷

मराठी गझलेच्या जडणघडणीचा इतिहास सांगणारा ग्रंथ


     आद्य मराठी गझलसंशोधक डाॅ.अविनाश सांगोलेकर यांच्या 'मराठी गझल : १९२० ते १९८५' या संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथाचे परीक्षण (भाग ५) 

                द्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ मराठी गझलकार डाॅ.अविनाश सांगोलेकर यांचा परिचय, त्यांचे मराठी गझलक्षेत्रातील संशोधनकार्य, तसेच हे कार्य हाती घेण्यामागील पार्श्वभूमी आणि त्या वेळची परिस्थिती याविषयी थोडक्यात माहिती आपण या आधीच्या भागांमध्ये घेतलेली आहे. आता आपण  'मराठी गझल : १९२० ते १९८५' या ग्रंथाच्या अंतरंगाचा आढावा घेत चाललेलो आहोत.

         आत्तापर्यंत आपण गझल म्हणजे काय, तिचा उगम कसा आणि कुठे झाला, गझल भारतात कशी आली, गझलगायन,१९२० पूर्वीची मराठी गझल,माधव जूलियन यांच्या गझलरचनेमागील आणि गझलपुरस्कारामागील पार्श्वभूमी व त्यांचा गझलविचार, त्यांची गझल व त्यांचे गझलकार्य हे सर्व जाणून घेतले. आता १९२० ते १९४० या रविकिरण मंडळ काळातील इतर कवींच्या गझलेवर डॉ.सांगोलेकर यांनी आपल्या ग्रंथात कशा प्रकारे प्रकाश टाकलेला आहे, हे जाणून घेऊ.

           मराठी गझलक्षेत्रात माधव जूलियन यांचे भरीव स्वरूपाचे कार्य चालू असताना १९२० ते १९४० या काळात त्यांच्या व्यतिरिक्त अजूनही काही मराठी कवींकडून मराठी गझललेखन केले जात होते. दरम्यान ऑक्टोबर १९२० मध्ये पुण्यात 'श्रीमहाराष्ट्रशारदा मंदिर' नावाची एक साहित्यप्रेमी संस्था स्थापन झाली व १९२१ पासून या संस्थेने प्रत्यक्ष काम करणे सुरू केले. अनेक नवे आणि जुने कवी असलेल्या या संस्थेत सुरुवातीलाच काही वाद झाले व त्यातून काही नवे कवी हे संस्थेतून बाहेर पडले. त्यामधूनच १९२३ मध्ये रविकिरण मंडळाचा उदय झाला. या रविकिरण मंडळात एकूण आठ कवींचा समावेश होता. या सर्वांच्या कवितांची गझलदृष्ट्या तपासणी केली असता डॉ. सांगोलेकर यांना माधव जूलियन, कवी गिरीश व कवी यशवंत या तिघांनीच 'गझल' हा काव्यप्रकार हाताळला आहे, हे लक्षात आले.

             पैकी कवी गिरीश यांनी गझल, सुनीत,नाट्यगीत, अभंग, 

उद्देशिका, जानपदगीत व मुक्तच्छंद स्वरूपात लेखन केलेले आहे. त्यांनी आपल्या १९ कवितांना 'गझल' असे म्हटलेले आहे. या १९ कवितांची गझलदृष्ट्या तपासणी केली असता त्यातील १२ कविता या रद्दबातल ठरतात. कारण प्रत्यक्षात त्या 'नाट्यगीत', 'सुनीत' व 'उद्देशिका' (Ode) या काव्यप्रकारांमधील आढळतात. उरलेल्या ७ कविता मात्र गझल म्हणता येतात,असा निष्कर्ष डाॅ. सांगोलेकर यांनी काढलेला आहे. 

            कवी यशवंत ह्यांनी गझल, सुनीत, नाट्यगीत, जानपदगीत, खंडकाव्य, महाकाव्य, मुक्तच्छंद आदि प्रकारांमध्ये स्फुट कविता लिहिल्या आहेत. त्यांची संख्या ५२१ भरते.पैकी ३५ कवितांना त्यांनी 'गझल' असे म्हटलेले आहे. या ३५ कवितांपैकी १७ कविता ह्या गझलदृष्ट्या अपात्र ठरतात, तर उरलेल्या १८ कविता गझलवृत्त, द्विपदीयुक्त रचना, तसेच एकयमकीपणा यांनी परिपूर्ण असल्यामुळे त्यांना 'गझल' म्हणता येते. या १८ पैकी प्रेमभावना व्यक्त करणा-या ७, सामाजिक विषयावर २, आत्मचिंतन पर ३, उपदेशपर १ आणि कथनात्मक १,तसेच कवी आणि कविताविषयक ४ गझला होत. या १८ गझलांची चिकित्सा करता डॉ.सांगोलेकर यांच्या लक्षात असे आले की, कवी यशवंत यांच्या प्रेमभावनेवरील गझलांवर माधव जूलियन यांच्या तशाच गझलांचा प्रभाव आहे.माधव जूलियन,त्यांची गझल व त्यांचा गझलविचार यांचा प्रभाव कवी गिरीश व कवी यशवंत यांच्या गझलरचनांवर पडला असल्याचे मत डाॅ. सांगोलेकर व्यक्त करतात.  

          रविकिरण मंडळाशिवाय त्या काळात आघाडीवर असलेल्या इतर कवींच्या काव्यलेखनाचा, त्यांच्या मतांचा, त्यांनी केलेल्या गझलविरोधाचा, तसेच त्यांच्या गझललेखनाचा मुळातून अभ्यास डाॅ. सांगोलेकरांनी आपल्या या ग्रंथात मांडलेला आहे. या कवींच्या तथाकथित गझललेखनावर माधव जूलियन यांच्या गझलरचनेचा व गझलविचाराचा, फार्सी-उर्दू-हिंदी गझलांच्या वाचनाचा, संगीत नाटकांमधील गझलांच्या चटकदार व लोकप्रिय चालींचा प्रभाव पडलेला डॉ.अविनाश सांगोलेकरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ह्या गझलेला 'माधव जूलियनपद्धतीची गझल' असे संबोधले आहे.

           'गझल' हा एक स्वतंत्र काव्यप्रकार आहे, ही जाणीव कवींमध्ये,तसेच रसिकांमध्ये १९२० ते १९४० या काळात मूळ धरू लागली.हा काव्यप्रकार कविप्रिय झाला.तसेच गझलेबद्दल उलटसुलट चर्चाही सुरू झाली. यामागे वाड्मयीन कारणे जशी आढळतात,तशीच काही राजकीय -सामाजिक-सांस्कृतिक कारणेही आढळतात,हे डॉ.सांगोलेकरांनी लक्षात आणून दिले आहे.१९२० साली लो. टिळकांचा मृत्यू झाल्याने मराठी माणसात निर्माण झालेली पोरकेपणाची भावना, पहिल्या महायुद्धानंतर जगभर निर्माण झालेली भयाणता,त्यातून  लोकांमध्ये निर्माण झालेली प्रतिक्रिया, त्यातून प्रबळ झालेली स्वच्छंदवादी, निर्भरशील, Romantic प्रवृत्ती ही ती काही प्रमुख कारणे डॉ .सांगोलेकरांनी नमूद केली आहेत.  

           या पार्श्वभूमीवर आता आपण १९४० ते १९८५ या काळातील माधव जूलियन पद्धतीच्या गझलेचा इतिहास डॉ .सांगोलेकरांच्या ग्रंथाच्या आधारे परीक्षणाच्या पुढील भागात जाणून घेऊ.

(क्रमश:)


ग्रंथाचे नाव : 'मराठी गझल : १९२० ते १९८५'  (संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ,तृतीयावृत्ती),

ग्रंथकार : डाॅ.अविनाश सांगोलेकर, 

प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स,पुणे,

मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी, 

पृष्ठसंख्या : २९८,

किंमत : ३५० रुपये. 




दिवाकर चौकेकर

गांधीनगर, (गुजरात) 


Post a Comment

0 Comments