🍀 पुस्तक परिचय 🍀
गझलेभोवती फिरे
🌼‘प्राक्तनाचे भोवरे’🌼
इथे स्वतःच्या मर्जीप्रमाणे कुणाला जगता येते. प्राक्तनाचे भोवरे माणसाला सतत फिरवत राहतात. या गोलाकाराचे फेरे स्वतःच्या चालीने माणसांना चालवत राहतात. हे चक्र अनेकवेळा उलटसुलटे फिरत राहते. ते जीवघेणेही ठरू शकतात. हे प्राक्तनाचे भोवरे गझलकारास तर गझलेच्या भोवतीच फिरवत राहतात. निर्मितीच्या चक्रातून तो बाहेर पडूच शकत नाबऱ्याचवेळा भावभावनांचे, सुख दुःखाचे, आशा-निराशेचे हेलकावे बसू लागतात. ही सगळी अनुभूती गझलेतून व्यक्त करण्याशिवाय गत्यंतरच नसते. अथांग समुद्रात कैक भोवरे असतात. त्यातून विविध तरंग उमटतात. त्यामुळेच तर समुद्राचे अंतरंग कळत असते.
हरहुन्नरी, संवेदनशील मनाचे गझलकार शिव डोईजोडे यांचा ‘प्राक्तनाचे भोवरे’ हा एकाहून एक सरस गझलांचा संग्रह तुळजापूरच्या समग्र प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्यात ८५ गझलांचा अंतर्भाव आहे. समग्र प्रकाशनाची ही एक दर्जेदार पेशकश आहे. मुखपृष्ठापासूनच हा संग्रह गझल रसिकांचे लक्ष वेधून गेतो. ‘प्राक्तनाचे भोवरे’ शिव डोईजोडे यांचे अंतरंग गझलेतून उलगडत जातात. एकेक गझलेतून परिपक्व जाणिवांचा प्रत्यय येत राहतो.
प्राक्तनाचे भोग कुणाला बरे सुटले आहेत. हे भोग अटळ असतात. ते भोगावेच लागतात. याची जाणीव गझलकारास आहे. ते लिहितात ते काही उगाच नाही.
भोगून घेत आहे मी भोग प्राक्तनाचे
मोजून घे हवे तर हे डाग काळजाचे
एकेकाळी उपेक्षित असलेला गझल हा काव्यप्रकार तिच्या अंगभूत सामर्थ्याने आज सर्वोच्च सन्मानाच्या शिखरावर विराजमान झाला आहे. काव्यामधला तो सुबक दागिना बनला आहे. सर्व काव्यप्रकारात त्याची झळाळी सर्वाधिक आहे. ती डोळ्यांना दिपवणारी आहे. त्यातील आशय अंतःकरणाला थेट भिडणारा आहे. अवघ्या मानवी दुःखाला गझल आपल्या कवेत घेते. त्याला उद्गार देते. दुःखापलीकडच्या जगण्याचे प्रयोजन सांगते. अश्रुचा आवाज बनते. आयुष्याला दुःखानी सजवल्याशिवाय अस्तित्वाला सौंदर्य प्राप्त होत नाही. सुखाचे गाणे तर कुणीही गावू शकतो. दुःखाची गझल गाता आली पाहिजे. जो दुःखाची गझल गातो त्याच्या अश्रुंना गझल आवाज देत असते. डोईजोडे यांच्या गझलेला अश्रुंचा आवाज लाभला आहे.
काव्यामधला सुबक दागिना खास गझल
तुमच्या माझ्या अश्रुंचा आवाज गझल
माणसाच्या आयुष्याची सीमा ठरलेली आहे. त्याचे आयुष्य मर्यादित आहे. म्हणून माणसाला अमर्यादतेचे आकर्षण आहे. असीम जगण्याची आस आहे, ओढ आहे. कितीही शिगोशीग भरली तरी जगण्याची झोळी त्याला नेहमीच रिती वाटते. हे रितेपणच त्याला सदैव अस्वस्थ करत राहते. अमरत्वाची लालसा त्याला असते. पण असीम प्राक्तनाचे भोवरे पार करणे माणसाच्या हाती नसते. हे वास्तव नाकारून आयुष्याची दोरी अमर्याद करता येत नाही.
भरूनही जगण्याची झोळी रिती वाटते
ओढ कशाची आयुष्याला अशी वाटते
मनुष्य सरसकट, सरमिसळ आयुष्य जगत नाही. तो सुख दुःखाचे वर्गीकरण करतो. सुख दुःखाचे वेगवेगळे हिशेब मांडतो. सुख दुःखाचे पारडे नेहमीच जड ठरते. सुखाच्या मागण्या कधी संपणाऱ्या नसतात. त्यामुळे माणूस व्यथित होत जातो. आता जगण्यात काहीच राहिले नाही, असे त्याला वारंवार वाटू लागते. सुख दुःखाला समपातळीवर जोखता आले पाहिजे. त्यात भेदाभेद करता कामा नये. सुखाने हुरळून न जाता, दुःखाने पिचून न जाता सुख आणि दुःख यांना समांतर केले की मजेत जगणे मुश्किलीचे ठरत नाही. हेच निर्धास्त जगण्याचे सार आहे. डोईजोडे लिहितात.
जगतो आहे मजेत आता
सुख अन् दुःख समांतर केले
हुंदक्याला फार काळ बंदिस्त ठेवून त्याला आतल्या आत दाबू जगणे दुरापास्त होऊन जाते. पापण्यावर अश्रुंचे ओढे गेऊन वावरणे म्हणजे दुःखाने मोडून पडण्यासारखेचे आहे. दाटलेले अश्रु ढाळल्याविना मोकळे होता येत नाही. जो मोकळा श्वास घेतो तो गुदमरून जात नाही. त्याच्या जगण्याची वाट सुकर होत जाते. हा गझलकाराचा जीवनविषयक दृष्टिकोन रास्त वाटतो. तो जगण्यातून आलेला आहे.
शेवटी झालो रिता सांडून अश्रु
मी कधीचा हुंदका दाबून होतो
काट्यांचे बोचणे आणि माणसाचे रक्तबंबाळ होणे ही सर्वांना दिसणारी सर्वश्रुत गोष्ट आहे. पण आपण ज्यावर जीव लावतो. त्याच्या सुंगधात मस्त होतो, ती फुले त्याच्या पाकळ्याही दंश करतात, तो दंश स्पष्टपणे दिसत नसला तरी तो अंतरात सलत राहतो. काट्याच्या बोचण्यापेक्षा पाकळ्याचे दंश अधिकच जखमी करून जातात. काटे म्हणजे बोचणारच असे आपले गृहितक पक्के असते. तसे पाहिले तर हा काट्यांवर केलेला बेछूट आरोपच नसतो काय? याकडे डोईजोडे लक्ष वेधतात. यावरून त्यांचे सखोल आत्मचिंतन दिसून येते.
आरोप लागले रे काट्या तुला परंतू
मी ओळखून आहे हे दंश पाकळ्याचे
खायचे अन् दाखवायचे असे दातांचे दोन प्रकार असतात. या दोन दातावरच जगातला व्यवहार चालतो. ज्याला आपण खायचे दात समजतो ते तर निव्वळ दाखवायचे दात असतात. इथेच मोठी फसगत होते. फसगत झाल्यानंतर फटका बसल्यानंतरच या दोन दातांमधील फरक लक्षात येतो. तोवर डाव साधण्यात आलेला असतो. जगरहटीचा हा नियम आहे.
कोण कसे हे कळले नंतर
दात खायचे दिसले नंतर
स्वतःला कोंडून ठेवल्यावर कोंडमारा होणे अपरिहार्य ठरते. कोंडमारा हा असह्य करणाराच असतो. माणसाने स्वतःला डांबून घेऊन सातत्याने अलिप्त राहणे प्रकृतिसाठी चांगले नसते. एकलकोंडेपणात नैराश्य डोकावत असते. याउलट पार्याचे गुणधर्म आहे. पारा चंचल, अस्थिर असतो. म्हणून माणसात मिसळणे आवश्यक आहे. केवळ तिच्या बोलण्यातून जीव पारा होऊन जातो. कोंडमारा अन् पारा या दोन उपमांच्या मिश्रणातून एक सुंदर शेर बनला आहे.
कोंडल्यावर कोंडमारा होणारच ना
बोलली की जीव पारा होणारच ना
शिव डोईजोडे यांनी आत्मशोधाबरोबरच इश्किया गझलाही अतिशय उत्कटतेने लिहिल्या आहेत. पावसाची वेगवेगळी रुपे असतात. त्यातली सौंदर्यस्थळे निरनिराळी असतात. कुणाच्या दृष्टिला पाऊस कसा दिसतो, हे सांगता येत नाही. ओठांनी ओठावरचा पाऊस टिपला की पाऊस शृंगारिक होतो, प्रेममय होतो. तेव्हा पाऊस किती वेगळा दिसतो. अतिशय नाजूक आणि हळुवार शेर पाहा.
तू ओठांनी ओठांवरचा टिपला पाऊस
किती वेगळा होता तेव्हा दिसला पाऊस
शिव डोईजोडे मराठवाड्याचे रहिवाशी आहेत. मराठवाड्यावर त्यांचे नितांत प्रेम असणे, त्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. मराठवाडा ही संतांची भूमी तर आहेच ती आता गझलेची भूमी होऊ पाहत आहे. अलीकडच्या काळात अनेक प्रतिभावंत गझलकार उदयास येत नाही. त्यांच्या ‘समग्र’ गझला वाचल्याची त्यांचे सामर्थ्य लक्षात येते. मराठवाड्याच्या वैशिष्ट्यावर डोईजोडे यांनी लिहिलेली गझल उत्कृष्ट आहे.
मातीत राबणारा माझा मराठवाडा
खेड्यात नांदणारा माझा मराठवाडा
डोईजोडे यांच्या गझल प्रवासाला शुभेच्छा !
गझल संग्रह : प्राक्तनाचे भोवरे
गझलकार : शिव डोईजोडे
समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठे : ९५, मूल्य : १५० रु.
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments