🌹 पुस्तक परिचय 🌹
आशयाची दस्ती
गझलांची वस्ती
दस्ती कधी आनंदाचे कधी दुःखाचे अश्रू पुसण्याचे काम करत असते. दस्ती सुखदुःखाची सखी असते. दस्ती आपला चेहरा स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम करते. दस्ती दिलासा देते. दस्ती प्रेमाचे प्रतीक असते. दस्ती दोस्तीची निशाणी असते. दस्ती दोन मनांना जोडण्याचे शुभसंदेश देते. सकारात्मक संकेत देते. दस्तीवर पाना-फुलांचे, भाव-भावनांचे आशय, विषय नोंदवलेले असतात. ते सौंदर्याचेच प्रकटीकरण असते. हे सौंदर्य पाहण्यासाठी गझलेचा डोळा असावा लागतो. गझलेतूनच जीवनातल्या सुंदरतेची, सौंदर्याची दृष्टी खुलत, फुलत जाते. अकोल्याचे गझलकार, शिक्षक निलेश कवडे यांना काव्यात्मक, कलात्मक दृष्टी लाभली आहे. कवडे यांनी आशयाच्या दस्तीवर जणू गझलांची वस्ती बसली आहे. त्यातील निखळ प्रेमभावना माणुसकीने ओतप्रोत आहेत. यात गझलकाराचे उत्कटत्व प्रभावीपणे उतरले आहे. ते उल्हासाचे, उमंगाचे, उदात्तेचे उत्कटरूप आहे. दस्तीची नवीकोरी घडी उघडताना त्याच्यातील अर्थवाही, प्रवाही गझला मनाला भावतात. खिळवतात, जीवनाचा अपरिहार्य भाग असलेले अनेक विषय आपल्याला नव्यानव्या रूपात भेटत राहतात. तळमनात उतरत राहतात. दीर्घकाळ झिरपत राहतात. गझल आणि रसिक यांच्यातील मैत्रीची वीण अधिकाधिक घट्ट होत जावी. याकरिता कवडे यांनी आशयाची दस्ती रसिकांना बहाल केली आहे.
दस्तीचं आणि जखमेचं नातंही अतूट असंच आहे. दस्ती जखमेवर हळुवार फुंकर घालते. झालेली जखम चिघळू नये, ती लवकर भरून यावी. म्हणून जखमेवर दस्ती बांधण्यात येते. जखमी माणूस त्या दस्तीला कधीच विसरू शकत नाही. ती दस्ती तो मनाच्या दुखऱ्या कुपीत सांभाळून ठेवतो. जखमेशी निगडित असलेल्या दस्तीची दास्तानही कवडे तितक्यात संवेदनशीलतेनं मांडतात.
तू दिली जखमेस या बांधून दस्ती
ठेवतो ती रोज सांभाळून दस्ती
गझल आत्म्याचा उद्गार असते. ती मानवी संवेदनाचा आविष्कार असते. आयुष्यातले सुखदुःख सांगण्यासाठी गझलकारास शेवटी गझलेच्या जवळच यावे लागते. गझलेशिवाय आश्रय घर, दुसरा कोण देणार? मौनातल्या मुक्या वेदनेला शब्दरूप देत तिला बोलकं करणं, जिंदगीला कागदावर साकार करत सुलभ संवाद घडवत राहणं हीच तर गझलकाराची मनोधारणा असते. गझलेच्या अनुषंगानं कवडेंची अनुभूती अशी अविष्कृत होते.
गझल घर देते मुक्या वेदनेला
जिंदगी साकारते कागदावर
गझल जशी कुसुमकोमल हृदयाच्या स्पंदनाची भाषा असते तशीच ती आविष्काराच्या आंदोलनाची देखील भाषा असते. मातीतूनही एल्गारचा पुकारा होतो. नव्या क्रांतीला श्वास मातीच पुरवत असते. गझलकार निर्भिड विचारांची खळबळ, आंतरिक भावनेची घालमेल निर्भयपणे व्यक्त करतो. हा एल्गारचा भाग असतो. मातीतला संस्कार आणि आविष्कार घेऊन नवीक्रांती एल्गारच्या नाऱ्यातून प्रकट होत असते. हा एक प्रकारे भुईचाच उठाव असतो.
ऐकतो आहे पुन्हा एल्गार मातीचा
श्वास क्रांतीला नव्या मिळणार मातीचा
माणसाच्या चेहऱ्याला खोटी प्रतिष्ठा, प्रशस्ती हवी असते. आरशावर कोणत्याच चेहऱ्याची जबरदस्ती चालत नाही. जसे त्याचे रूप तशीच प्रतिमा आरसा दाखवत असतो. मुळात माणसाला त्याच्या खऱ्या चेहऱ्याची भीती वाटत असते. आरसा कधीच खोटं बोलत नाही. तो माणसाच्या चेहऱ्याशी बेईमानी करत नाही. तो सत्याचे दर्शन घडवतो तेव्हा माणसाचा मुखवटा गळून पडतो. त्याला त्याचाच चेहरा निराळा दिसू लागतो.
आरशावर चेहऱ्याची जबरदस्ती
चेहऱ्याला पाहिजे खोटी प्रशस्ती
एखाद्याच्या दुःखाला परीसीमाच उरत नाही. ते विराट स्वरूपाचं असतं. त्या दुःखाला व्यक्त करता येत नाही. त्याचं दुःख लिहिण्याचं हिय्या केला तरी त्याचा उल्लेख अटळ होऊन जातो. हे सखोल दुःख कागदावर मांडायचं म्हटलं तरी लेखणीचा जीव गुदमरल्याशिवाय राहत नाही. हीच आदिमदुःखाची चित्तरकथा असते. निलेश कवडे यांनी दुःखावर नितांत सुंदर असा शेर लिहिला आहे. तो दाद देण्याजोगा आहे.
दुःख लिहिताना तुझा उल्लेख येतो अन
कागदावर लेखणीचा जीव गुदमरतो
देशाचं संविधान अस्तित्वात आल्यानंतर आपण लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला. सर्वसामान्य लोकांचं कल्याण करणं हे लोकशाहीत अपेक्षित होतं. परंतु नेत्यांच्या तुंबडीभरू प्रवृत्तीमुळे लोकांच्या हिताच्या योजना गरजूपर्यंत पोहोचतच नाहीत. लोकशाहीचे खरे वाहक लोकच असतात. पण त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. कायद्याचा फक्त कागदाशी घरोबा असतो. जनता मतदानापुरतीच कागदावर मालक ठरते. एरवी त्याला काडीची किंमत नसते. लोकशाहीची ही शोकांतिका प्रकट करणारा हा शेर पाहा.
लोकशाहीचे खरे वाहक तुम्ही आम्ही
कागदावर राहिलो मालक तुम्ही आम्ही
गावकुसाबाहेर टाकून दिलेला माणूस गावात यावा. माणसं-माणसात मिसळावीत. त्यांच्यावर बसलेला अस्पृश्यतेचा कलंक धुवून निघावा. त्यालाही आत्मसन्मानानं जगता यावे. या उदात्त हेतूनेच बाबा साहेबांनी संविधान लिहिले. परंतु आडनावावरून जातीचा अदमास घेऊन माणसांना टाळणारी माणसे समाजात कमी नाहीत. जन्मापासूनच जात माणसाला चिटकून राहते. आडनावावरून त्याला वेगळेपणा मिळते. ज्ञान-विज्ञानाच्या युगातही जात समाजजीवनात घट्ट रुतून बसलेली आहे. यावरच वास्तवदर्शी भाष्य कवडे असं पोटतिडकीने नोंदवतात.
आडनावातली शोधतो जात अन्
टाळतो रोज मजला कुणी ना कुणी
बापाला स्वतःची जिंदगी असतेच कुठे? तो फक्त कुटुंबासाठी जगत असतो. बाप वेदनांनी, वंचनांनी रोजच सजत असतो. परिस्थितीच्या काळोखात दिवा होऊन जळत असतो. जगण्याची, संघर्षाची, लढण्याची, झुंजण्याची तग धरण्याची आणि टिकून राहण्याची बापात दूर्दम्य इच्छाशक्ती असते. इतक्या साऱ्या खस्ता खावून, शेवटी त्याची उपयोगिता संपल्यानंतर पोटच्या गोळ्याकडून त्याची उपेक्षा होते. ही कलीयुगातलं विदारक सत्य कवडे यांनी अतिशय प्रत्ययकारी शब्दात मांडले आहे.
वेदनांनी रोज सजलो बाप होतो
मी दिवा होऊन जळलो बाप होतो
धोरणकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे आज शिक्षण आणि शिक्षकांचे तीनतेरा झाले आहे. उद्याचे सुजाण नागरिक घडविण्याचे उत्तरदायित्व शिक्षकांच्या खांद्यावर असते. परंतु त्यांना सतत शिक्षणबाह्य कामावर जुंपण्यात येते. मग शिक्षणाची गंगा घरोघरी कशी पोहोचणार? हा खरा प्रश्न आहे. गझलकार हे स्वतः गुरुजी असल्यानं त्यांनी गुरुजींची नेमकी व्यथा काय असते. यावर गझल लिहून धोरणकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.
राहिले आता कुठे, शिकवायला गुरुजी
रोज खिचडी लागले शिजवायला गुरुजी
'दस्ती' मधील गझल हृदयातून उमललेली आहे. ती वाऱ्यांच्या झुळकीसारखी आहे. ती धुवांधार पावसासारखी ओसळते. पण आक्रमकतेच्या आहारी जात नाही. आक्रस्ताळी होत नाही. संयम आणि संयतपणा हे दस्तीचे गुण वैशिष्ट्य म्हणायला हवं. दस्ती हा कवडे यांचा पहिलाच गझलसंग्रह असूनही तो सृजनाच्या पातळीवर कसदार अन् आश्वासक असा आहे. हा गझलसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालाय्. हे गझलेच्या दृष्टीने प्रसादचिन्ह आहे.
गझलसंग्रह: दस्ती
गझलकार: निलेश कवडे
प्रकाशक: पायगुण प्रकाशन, अमरावती
पृष्ठे:९६ मूल्य:१५०₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments