Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मनस्वी Gazalkar Divakar Chaukekar

🍀 पुस्तक परिचय 🍀



🌷 'मनस्वी' 🌷


     ज्यांच्या लहानपणी घरात नित्यनेमाने शुभं करोती, रामरक्षा तसेच मारुती स्तोत्र म्हटले जायचे, आजोळी गेलेले असतांना ज्यांना हरिपाठाचे अभंग तसेच त्या अभंगांचे निरुपण ऐकायला मिळायचे. घरात आणि जगात कसे वागायला पाहिजे याबद्दलचे संस्कार ज्यांना आपल्या आईकडून मिळालेले आहेत असे माझे मित्र, समव्यवसायी व गझलकार श्री मकरंद घाणेकर (पुणे) जे 'मनस्वी' या टोपण नावाने (म्हणजेच तखल्लुसने) मराठीत गझल लिहितात, त्यांचा नवा-कोरा, पहिला-वहिला पण ब-याच बाबतीत वेगळेपण घेऊन आलेला गझल संग्रह 'मनस्वी' नुकताच माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. अशा या "मनस्वी" ला सर्वप्रथम माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ....!


     २०२१ मधे पुण्यातील जुन्या व प्रतिष्ठित अशा काव्य शिल्प या संस्थेचे सभासदत्व घेतल्यानंतर 'आपलं मडकं खूपच कच्च आहे' याची जाणीव झाल्याचे घाणेकर प्रांजळपणे कबूल करतात .....


गंध मातीचा मला त्या भावला होता

जीव जेथे माणसांनी लावला होता ....


पण जिथे अशी जीव लावणारी माणसं भेटतात तिथेच असेही काही माणसं भेटतात, असेही अनुभव येतात की ....


ढोल ताशा ठीक पण डीजे नको बाबा 

कान भिंतींचा किती त्रस्त होता ....


असे म्हणण्याची वेळ डीजेच्या कर्ण-कर्कश्श आवाजामुळे जशी सगळ्यांवर येते तशीच ती   घाणेकरांवरही आलेली आहे. डीजेवर जरी त्यांचा मनस्वी राग असला तरी अध्यात्म तसेच संस्कृतीची गोडी लागलेले घाणेकर पुढे म्हणतात की ....


किती खोल रुजलेत संस्कार येथे 

अशी आपली संस्कृती थोर आहे ....

घुमे आज कानात मंजूळ पावा 

जणू गोकुळातील चितचोर आहे ....


     समाजातील माणसांकडून अनेक भले-बुरे, चांगले-वाईट अनुभव येत असले तरीही 'मनस्वी' आज खुश आहे असे घाणेकर सांगून टाकतात कारण  ....


हा 'मनस्वी' खूष झाला काय कारण ?

ही गझल बाराखडी मज ज्ञात झाली ....


     असे घाणेकर अभिमानाने सांगतात आणि ते साहजिक सुध्दा आहे म्हणा, कारण कष्ट घेतल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय ही 'गझल सुंदरी' कुणालाही वश होणार नाही, प्राप्त होणार नाही इतकी ह्या दादासाहेब सुरेश भट ह्यांनी लिहिलेल्या 'बाराखडी'ची महती आहे आणि मग मधेच कुठेतरी लहानपणी झालेले संस्कार आठवतात, गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, रामायणाचे केलेले वाचन आठवते व ....


व्दैत सोडावे म्हणून मी वाचतो ज्ञानेश्वरी 

पांडुरंगाशी अता अव्दैत व्हावे वाटते ....


     असे अध्यात्माचे विचार घाणेकरांच्या मनात डोकावून जातात. अध्यात्मिक पुस्तके वाचून, बाराखडीच्या अभ्यासाने गझल सुंदरीला वश करुन घेतलेले असतांनाही ....


चालले हे पाप मी मोजू कसे 

त्यासही परिमाण नाही राहिले....

बोलण्याचे त्राण नाही राहिले 

आणि हाती बाण नाही राहिले....


     अशी आपल्या मनाची खंत, हळहळ घाणेकर व्यक्त करतांना दिसतात. आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडण्याची वेळ वाणिज्य शाखेत पदवी घेऊन आणि ३९ वर्षे बॅंकेसारख्या रूक्ष ठिकाणी काम केलेल्या मकरंद घाणेकर यांच्यावर येते आणि मग जेव्हा उदासवाणे वाटायला लागते तेंव्हा घाणेकर म्हणतात की ....


तुझे बहाणे नकोच आता

रडून गाणे नकोच आता ....

हवी जराशी सुजाण नारी 

रुसून जाणे नकोच आता ....

म्हणे 'मनस्वी' सुमार मी पण 

अती शहाणे नकोच आता ....


     बाराखडी बरोबरच गझल वृत्तांचाही अभ्यास मकरंद घाणेकर यांनी चांगलाच केला आहे असे दिसते कारण अगदी ८ मात्रांच्या 'वागुरा' या (छोटी बहर) अक्षरगण वृत्तापासून तर ३२ मात्रांच्या 'वनहरिणी' या (लंबी बहर) मात्रावृत्तात तसेच ३० मात्रांच्या क्रीडचंद्र या (लंबी बहर) अक्षरगणवृत्तात त्यांनी गझल रचना केलेली आहे असे दिसून येते, अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी सुध्दा त्यांना 'गझल कशी लिहावी' यावर प्रकाशित झालेले अनेक लेख वाचावे लागले, लेख वाचता वाचताच त्यांना गझलचा आकृतीबंध आवडायला लागला व ते गझल लिहू लागले असे मात्र ते प्रामाणिकपणे कबूल करतात, अर्थात शाळेत कायमच पहिला वा दुसरा नंबर पटकावणा-या, लहानपणी अनेक अभंग ओव्या पाठ करणा-या मकरंद घाणेकरांना अशी मेहनत घेणे फारसे अवघड गेले नसावे असे मला वाटते. या संग्रहात १०० गझलांचा समावेश असून पैकी ७७ गझला ह्या ३१ अक्षरगणवृत्तात तर २३ गझला ह्या ९ मात्रावृत्तात लिहिलेल्या आहेत. मंजुघोषा, राधा, वैखरी, मेनका, वियदगंगा, देवप्रिया, जलौघवेगा, आनंद, क्रीडचंद्र, साशंक, आनंदकंद, व्योमगंगा, मनोरमा, वागुरा, सुकेशी, प्रसूनांगी, भुजंगप्रयात, पिनाकी, मृगाक्षी, संयुत, विद्युल्लता, सोमराजी, मंदाकिनी, सुदिपा, कलापती, प्रभाव, सुकामिनी,  मयूरसारिणी, आंदोलिका, रंगराग, आणि पुष्प ही अक्षरगणवृत्ते तर लवंगलता, वंशमणी, पादाकुलक, वनहरिणी, अनलज्वाला, शुभगंगा, बालानंद, विधाता आणि भूपतीवैभव ह्या मात्रावृत्तात मकरंद घाणेकर ह्यांनी गझला लिहिल्या आहेत.  

     या गझल संग्रहाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यात या संग्रहाचे मुखपृष्ठ हे ही एक आहे असे म्हणावे लागेल. मकरंद घाणेकर यांचा साडे सहा वर्षाचा नातू नील घाणेकर, जो वेगवेगळे चेहरे काढतो, त्याच्याच काही चित्रांचा तसेच हस्ताक्षराचा वापर या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आला आहे. अर्थात, चेहऱ्याच्या चित्रानुसार घाणेकरांचे शेर सुध्दा मुखपृष्ठावर छापलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गझल म्हणजे काय? याची तसेच गझलमधील तांत्रिक शब्दांची प्राथमिक माहिती एका गझलेच्या उदाहरणांसह संग्रहाच्या शेवटच्या चार पानांवर देण्यात आली आहे. अशी माहिती पुस्तकात असावी अशी कल्पना माझे मित्र गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी (पुणे) यांनी एका सूचनेव्दारे घाणेकरांना केली होती. ह्या संग्रहाला श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांची अभ्यासपूर्ण तसेच प्रेरणादायक प्रस्तावना लाभली आहे हा सुध्दा एक विलक्षण योगायोगच असावा असे मला वाटते. तीन चार दशकापूर्वीच्या काळात गझल क्षेत्रात उमेदवारी करणारांसमोरच्या अडचणींच्या उल्लेख गझलकार श्री प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केला आहे आणि त्या दिवसांच्या अडचणींचा सामना करणारा मी पण एक होतो, मी पण ते सगळं भोगलेलं आहे म्हणून एक साक्षीदार या नात्याने मी प्रफुल्लजींच्या विधानांशी पूर्णपणे सहमत आहे.

     'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते' असे बोलले जाते, मग सौ वंदना मकरंद घाणेकर तरी कशा मागे राहतील ? 'मनस्वी' गझल संग्रहाला त्यांनी अभिप्रायरुपी शुभेच्छा देऊन आपण आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे आणि हे पण एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. संग्रहात समाविष्ट प्रत्येक गझलेखाली तिच्या लगावलीसह/मात्रांसह वृत्ताचे नाव दिलेले आहे आणि ते गझल अभ्यासकांसाठी, नवीन गझल लिहू पाहणारांसाठी उपयुक्त ठरेल याबाबत मला अजिबात शंका नाही.

     हा गझलसंग्रह गझलकार श्री मकरंद घाणेकर यांनी आपल्या सर्व कविता आणि गझला वाचून दाद व  प्रोत्साहन देणा-या आपली आई 'नलिनी घाणेकर' यांना अर्पण केला आहे. व्ही के ग्राफिक्स, पुणे हे मुद्रक असलेल्या या गझल संग्रहाच्या मलपृष्ठावर गझलकार श्री मकरंद घाणेकर यांच्या रुबाबदार छायाचित्रासह त्यांची एक गझल छापण्यात आली आहे.

      'गझल' ह्या मराठी काव्यप्रकारामधील रचना, गझलचे सर्व नियम तसेच आकृतीबंध पाळून, तंत्रशुध्द व गझलेच्या प्रकृतीस योग्य अशा शब्दांचा वापर करुन लिहिल्या गेलेल्या १०० गझलांच्या ह्या 'मनस्वी' नावाच्या गझल संग्रहाचा उपयोग मराठी गझल अभ्यासकांना निश्चितच होईल असाही मला विश्वास वाटतो. 

     गझलकार श्री मकरंद घाणेकर ह्यांना त्यांच्या उज्वल साहित्य सेवेसाठी शुभेच्छा देतो व माझा हा गझलसंग्रह परीक्षण व समीक्षणाचा लेख इथेच थांबवतो ....!




पुस्तकाचे नाव :  'मनस्वी' (गझलसंग्रह)

गझलकार :  श्री मकरंद घाणेकर 

संपर्क      :   94230 12491 

मुखपृष्ठ    :  नील घाणेकर 

मुद्रक      :  व्ही के ग्राफिक्स, पुणे 

पृष्ठसंख्या  :  १२० पाने



दिवाकर चौकेकर

गांधीनगर 

Post a Comment

0 Comments