🌹पुस्तक परिचय 🌹
"गुलमोहर फुलताना.."
रसिकहो नमस्कार,
आज गझल संग्रह परिचय लेख लेखनासाठी मी घेऊन आलो आहे एकदम ताजा-तवाना असा गझल संग्रह, ज्याचे प्रकाशनही अगदी नुकतेच झाले आहे आणि अशा या गझल संग्रहाचे नाव आहे, "गुलमोहर फुलताना...", गझलकार आहेत टिटवाळा येथे राहणारे माझे स्नेही, जवळचे मित्र, मराठी गझल क्षेत्रात आदराने घेतले जाणारे एक नाव, प्रख्यात गझलकार श्री प्रशांत वैद्य. ज्या प्रशांत वैद्य याला मी प्रशांत दादा असे म्हणत आलो आहे.
तर, असा हा प्रशांत वैद्य मुंबईच्या सिनेव्हिस्टा प्रा. लि. या कंपनीमध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होता तेव्हापासूनचा आमचा स्नेह व मैत्री. आणि रसिक हो, आणखी एक विशेष म्हणजे गझलकार श्री प्रशांत वैद्य " मैफल " नावाचे गझलांचे एक सदर " साप्ता. कल्याण नगर वार्ता " मधून चालवत होते, तेंव्हाच आमची मैत्री झाली असल्याची आठवण आज मला आवर्जून होत आहे, कारण त्याच वेळेस मी सुध्दा माझे " गझल वाढदिवसाची ...." नावाचे एक सदर पेपरमध्ये चालवत होतो.
आज गझल क्षेत्रात आपल्या नावाचा डंका वाजवणा-या या प्रशांत दादाला आयुष्यात अनेकदा, अनेक संकटांशी 'सामना' करावा लागला. मोठ्या आजाराला सुध्दा खूप धीराने सामोरे जाणा-या या प्रशांत दादावर चाळीस वर्षांपूर्वी, म्हणजेच गझल क्षेत्रात उमेदवारी सुरु केली होती तेंव्हाच, एका मंचावर आपली रचना सादर करत असतांना कमी लेखणारी व अपमानास्पद अशी वागणूक देणारी घटना घडली होती व तीच घटना कदाचित प्रशांतला खंबीरपणे जगण्याचा धडा देऊन गेली असावी, आज इतके मोठ मोठे मानसन्मान मिळवून देण्यास कारणीभूत ठरली असावी असे निदान मला तरी वाटते.
'निसर्ग' ह्या विषयावर जवळपास प्रत्येक कवी कविता लिहित असतो, गझलकार प्रशांत वैद्य सुध्दा त्याला अपवाद नाही, पण या निसर्गात सुध्दा प्रशांत रमतो ते मात्र त्याचा वीक पॉईन्ट असलेल्या 'गुलमोहर' च्या लालभडक फुलांनी डवरलेल्या झाडाजवळ आणि त्या वेळी जणू काही तो या गुलमोहराच्या झाडाला सांगत असावा - -
मी तुझ्या प्रेमात आहे आजही
घे तुला हे टाकले कळवून मी ....
एकही हिरवे पान नसलेल्या पण लालभडक फुलांनी डवरलेल्या या गुलमोहराचा भरपूर अभ्यास प्रशांतने केला असावा असे आपल्या लक्षात येते कारण - -
गुलबाक्षीचा देह उमलतो गुलमोहर फुलताना
क्षितिजाचाही संयम सुटतो गुलमोहर फुलताना ....
केवळ कोठे प्राजक्ताचे राज्य खालसा होते
गुलाबसुध्दा बरेच हरतो गुलमोहर फुलताना ....
अखेर त्याची गोष्ट येउनी तिच्याजवळ थांबते
ती दिसल्यावर तो सळसळतो गुलमोहर फुलताना ....
निसर्गावर असलेले आपले प्रेम अशा प्रकारे कबूल करणारा प्रशांत आपल्या प्रेमाबद्दल बोलतांना मात्र - -
काय आहे दोष माझा ते मला माहीत नाही
एवढे माहीत आहे मी तुझ्या यादीत नाही ....
मी तुला माझे म्हणावे तू नकाराचेच गावे
ही न मैत्रीची कहाणी ही जगाची रीत नाही ....
सांगतो जाहीर मी की मी तुझ्या प्रेमात आहे
सांगण्यासाठी खरे ते मी कुणाला भीत नाही...
असे जरा जास्तच स्पष्टपणे, बिनधास्तपणे बोलतांना तो दिसतो आणि तेंव्हासुध्दा हा निसर्ग त्याच्या अगदी जवळच असल्यामुळे - -
सारे उनाड वारे वळवून घेतले
माझ्यावरी तुला मी उधळून घेतले ....
जेव्हा तुझ्या मनाने बरसून घेतले
मी काळजास माझ्या भिजवून घेतले ....
दारासमोर माझ्या प्राजक्त सांडला
मी अंगणास माझ्या उचलून घेतले ....
अशी निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जवळीक अगदी उदाहरणांसह देऊन जातांना दिसतो पण तरीही कधी कधी असा काही प्रसंग येतो, असा काही अनुभव येतो की जेंव्हा - -
सांगू तरी कहाणी सांगा कुणाकुणाची
अश्रू दगे सु-यांची जखमा व्यथा कशाची ....
त्यांनी खुडून नेल्या काही कळ्या उमलत्या
मी आणली नव्याने काही फुले उद्याची ....
दारात हुंदके अन् खिडकीत दोन अश्रू
इतकीच गोष्ट आहे इथल्या घराघराची ....
अशा शब्दांत या समाजाशी, सभोवतालच्या लोकांशी व पर्यायाने आपल्या देशबांधवांशी आपले नाते काय आहे हे तो अगदी स्पष्ट शब्दांत तरीही स्वाभाविकरित्या सांगतो. समाजाबरोबर असे वागत असतांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र - -
उभ्या जन्मात मी माझ्या सुखाला पाहिले नाही
तुझ्या एका कटाक्षाने जिवाचे चांदणे झाले ....
जरी माझे तुझे आहे अजूनी कोवळे नाते
युगांनी भेट जी होते असे ते भेटणे झाले ....
कुणाचा यारही झालो कुणाशी वैरही केले
असे माझे तुझ्यापायी जगाशी वागणे झाले....
असल्याचे, असेही काही चांगले वाईट अनुभव आल्याचे प्रशांत सांगताना दिसतो.
निसर्गावर, प्रेमावर तसेच समाज जीवनावर आपले मत अतिशय परखडपणे व्यक्त करणारा प्रशांत आपल्या जीवनाबद्दल बोलतांना - -
जीवनाचे हेच आहे मागणे
रोज थोडे रोज थोडे संपणे ....
चांदणे आले न माझ्या सोबती
भाग पडले मीच मजला जाळणे ....
केवढी शस्त्रे तुझ्या भात्यामध्ये
पाहणे अन् हासणे अन् लाजणे ....
गेल्या ४० वर्षांपासून कविता व गझल लेखन करणा-या गझलकार प्रशांत वैद्य यांचे 'अहवाल' आणि 'विजांचा सोयरा हे दोन संग्रह या पूर्वी प्रकाशित झालेले असून 'काफला' या दस्तुरखुद्द गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांनी प्रकाशित केलेल्या प्रातिनिधिक गझल संग्रहापासून नंतर प्रकाशित झालेल्या जवळपास सर्वच प्रातिनिधिक गझल संग्रहांमध्ये प्रशांतच्या गझलांचा समावेश करण्यात आला असल्याचे दिसून येते.
पिंपरी-चिंचवड येथील गझलपुष्प संस्थेचा पहिला 'गझलपुष्प' पुरस्कार, हिराजी पाटील फाऊंडेशन, नेरळ यांचा पहिला 'गझल सारथी' पुरस्कार, सुस्मृती प्रतिष्ठान, मुंबई यांचा 'गझलयात्री' पुरस्कार आदि पुरस्कारांनी गझलकार श्री. प्रशांत वैद्य यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच गोवा, कर्नाटक आदि राज्यांमध्ये आयोजित मराठी गझल मुशायरा मध्ये गझलकार प्रशांत वैद्य यांनी गझल सादरीकरण करुन रसिकांची 'वाहवा' मिळवली आहे. इथे आवर्जून नमूद करावयासारखी आणखी एक बाब म्हणजे माझा गझल संग्रह "तुझ्या सारखी तू....!" आणि कविता संग्रह "बिंब-प्रतिबिंब" यांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त गांधीनगर (गुजरात) येथे मी आयोजित केलेल्या, गांधीनगरच्या इतिहासातील पहिल्या-वहिल्या मराठी गझल मुशाय-यासाठी हा प्रशांत दादा त्याच्या आणखी तीन-चार मित्रांना घेऊन आला होता, सर्वांनी मोठ्या दिमाखात या मुशाय-यात गझला सादर केल्या, रसिकांना मंत्रमुग्ध केले, त्यांची अशी वाहवा मिळवली की, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले रसिक आजही त्या मुशाय-याची आठवण करताना दिसतात.
या मुशाय-यासाठी प्रशांत बरोबर गोविंद नाईक, शर्वरी मुनीश्वर व अनिल आठलेकर हे मुंबईहून तर ज्येष्ठ गझलकार, गझलचे एक अभ्यासक व माझे जवळचे मित्र डाॅ. शेख इक्बाल मिन्ने हे सध्याचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथून हजर राहिले होते आणि मुशायरा गाजवला होता. या मुशाय-याचा उल्लेख देखील 'गुलमोहर फुलताना" या गझल संग्रहात शेवटच्या पानावर प्रशांत दादाच्या परिचयात करण्यात आलेला आहे.
हिरवीगार जमीन, काळपट-निळे डोंगर, निळेशार आकाश व त्या अलिकडे हिरव्या पानांनी व लालभडक फुलांनी डवरलेली गुलमोहराची फांदी असे आकर्षक वाटणारे मुखपृष्ठ तसेच मलपृष्ठावरील प्रशांतच्या फोटो खाली सुलेखनात लिहिलेले या संग्रहातील काही शेर माझे मित्र व गझलकार श्री शिवदादू डोईजोडे (उदगीर ) यांचे असून ८८ गझला असलेला हा संग्रह प्रशांतने आपले स्वर्गीय वडील, स्वर्गीय सासरे आणि स्वर्गीय सासुबाई तसेच त्याला लेखनासाठी सतत प्रोत्साहन देणा-या व त्याच्या लेखनाचे कौतुक करणा-या आपल्या आईला अर्पण केलेला आहे. या संग्रहाचे प्रकाशक आहेत देविदास बाळासाहेब पाटील, समग्र प्रकाशन, तुळजापूर आणि दिनांक १२ मे २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या या गझल संग्रहाचे मूल्य आहे रु.१५०/= मात्र.
या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य असेही सांगता येईल की, या गझल संग्रहाला लाभलेली प्रस्तावना कुणा मातब्बर साहित्यिक, गझलकार किंवा कवीने दिलेली नसून, एक सामान्य रसिक या नात्याने प्रशांतच्या धर्मपत्नी सौ. प्रज्ञा प्रशांत वैद्य यांनी लिहिली आहे. आपल्या ओघवत्या भाषेत त्यांनी लिहिलेली प्रस्तावना फक्त प्रशांत आणि त्याची गझल या शिवाय बरंच काही सांगून गेली आणि म्हणूनच मनाला भावली आहे. मनापासून अभिनंदन प्रज्ञा वहिनी ....!
गझल संग्रह परिचय लेख लेखनाच्या शेवटाकडे जात असतांना प्रशांतचे अभिनंदन करतो, संग्रहातील मला आवडलेले काही शेर रसिक वाचकांसमोर सादर करतो व लवकरात लवकर " दीवान-ए-प्रशांत " घेऊन ये, आम्ही त्याची उत्सुकतेने वाट पहात आहोत अशी अपेक्षा व्यक्त करुन हा लेख पूर्ण करतो आहे ....!
दूर ठेव तू तुझ्या वेदना कधीतरी
छेड श्रावणातल्या भावना कधीतरी....
••••••••
कोणता ॠतू खुणावतो पहा
पारिजातकात न्हात ये पुन्हा ....
••••••••
एवढी झाली सवय मरणा तुझी की
ठार झाली भूक गेले दूर पाणी ....
••••••••
मी काय तुम्हाला सांगू मी किती बिलंदर आहे
हासरे शेरही माझे दु:खाला दडवत होते ....
••••••••
मला न केव्हा सुखे लाभली
व्यथा चघळल्या चवीचवीने ....
••••••••
एकमेकांच्यात आपण मिसळुनी गेलो तरीही
का बरे उडतात अजुनी मौसमी खटके कळेना
•••••••••
खरेच वेचशील तू कधीतरी मला
म्हणून मी फुलासवे गळून पाहिले....
•••••••••
यापुढे ना बोलणे ना सांगणे ना मागणे
जा तुझ्या चंद्रास आता दे तुझे तू चांदणे ....
•••••••••
गुणगुणावे तुला की लिहावे तुला
भेट घ्यावी तुझी की छ्ळावे तुला ....
•••••••••
तू येता फुलते बाग
हे नंदनवन की शहर ....
•••••••••
तुझ्याएवढी माझी उंची नाही अलबत
कुठे तुझीही माझ्याइतकी खोली आहे ....
•••••••••
शेवटी गझलकार प्रशांत वैद्य यांचे " गुलमोहर फुलताना या " गझल संग्रहासाठी अभिनंदन करतो, " दीवान-ए-प्रशांत " लवकरच येऊ दे अशी सर्व रसिक, गझलप्रेमी वाचकांच्या वतीने विनंती करतो व गझल संग्रह परिचयाचा हा लेख आटोपता घेतो .....!
दिवाकर चौकेकर
गांधीनगर (गुजरात)
0 Comments