‘बरा नाही तसाही नाद गझलेचा, लिहावी लागते सल काळजामधली’
लातुरात गाजले सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचे ‘गझलमंथन’
लातूर, - गझल हा एक आशयानुगामी आणि तंत्रानुगामी अत्यंत चित्तवेधक अनवट काव्यप्रकार आहे. मराठी गझलेने अनेक समृद्ध वळणे घेत वाङमयसौष्ठव प्राप्त केले आहे. नव्या पिढीच्या नवनव्या जाणिवा अभिव्यक्तीची वेगवेगळी रूपे सादर करीत आहेत. त्याचा परिचय सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘गझलमाला’ या निरंतर उपक्रमांतर्गत गझल मंथन साहित्य संस्थेच्या (कोरपना जि. चंद्रपूर) संयुक्त विद्यमाने दि. ३ मे, २०२६ रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मराठी गझल संमेलनाच्या निमित्ताने लातूरकरांना नुकताच झाला.
उद्घाटन सत्राच्या प्रास्तविकात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान या ग्रामीण भागात शिक्षणपूरक उपक्रम राबवत असलेल्या संस्थेचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मराठी गझलेच्या अनुषंगाने होत असलेल्या उत्थानाचा उल्लेख करून सुरेश भटांचे योगदान उद्धृत केले. कार्यक्रमाचे ‘शब्दश्रीमंत’ असे सूत्रसंचालन डॉ. संपदा कुलकर्णी (गिरगावकर) यांनी, तर नेटके व्यवस्थापन संजय अयाचित यांनी केले. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ गझलकार अजय पांडे, उद्घाटक आत्माराम जाधव, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अनंत देशपांडे, डॉ. राज रणधीर व संमेलनाध्यक्ष मारोती मानेमोड यांची उत्तम व नेटकी भाषणे झाली. गझल मंथन साहित्य संस्थेच्या लातूर जिल्हा कार्यकारिणीचे सचिव यशवंत मस्के यांनी आभारप्रदर्शन केले.
दिवसभरात पाच मुशायरे होवूनही या ‘गझलोत्सवा’चा आनंद अवीट राहिला. या संमेलनात मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या ४८ गझलकारांनी आपल्या गझल वैविध्याने लातूरकरांना मंत्रमुग्ध केले.
प्रेम, तरलता, नाजूक शैलीतील प्रणयाराधन व प्रिय व्यक्तीशी केलेले भावगर्भ हितगुज हा पारंपारिक बाज असलेल्या गझलेची नवी सुधारणावादी, नवमतवादी, आव्हानात्मक व आवाहनात्मक भाषा आणि त्याबरोबरच अधिकाधिक तीव्र होत चाललेली सामाजिक भान व वास्तवाची, ताणलेल्या नातेसंबंधांची व्यथा मराठी गझलेत कशी व्यक्त होत आहे याचा ‘अंदाजे बयां’ रसिकांना चकित करत राहिला.
दुरून तर ते दोघांचेही एकसारखे निळसर होते
पुढे कळाले तुझे नि माझे वेगवेगळे अंबर होते
मी नेमाने वाहत गेलो फुले तुझ्या दगडावर कायम
मलाच नव्हते कळले श्रद्धा होती की अवडंबर होते
- या शेरांनी त्याची सुरुवात केली, तर उद्घाटक आत्माराम जाधव यांच्या –
जीव देणाऱ्या तुला माहीत नाही
केवढी गंमत इथे जगण्यात असते
- या शेराने त्याचा सकारात्मक कळस उभारला. त्यांच्या
‘कळवा कुणीतरी त्या वर्गातल्या फुलाला
डोळ्यांत आसवांची भरते अजून शाळा
या शेराची तरलता श्रोत्यांच्या प्रतिसादाने भावांकित झाली.
बाळ पाटील यांच्या -
हे किती बुजगावणे तू छान केले
पाखरे अंगावरी खेळून गेली
– या शेराने शिवार उभे केले; मात्र
ही किती सजली फुलांनी अंत्ययात्रा
डोळियांचे पारणे फेडून गेली
– या शेराने एक उपरोधिक तरीही कारुण्यपूर्वक वास्तवदर्शन दिले.
स्वागताध्यक्ष अजय पांडे यांच्या
शब्दांसवे पहा ना आत्म्यास नेत आहे
घुसमट कलेवरातुन बाहेर येत आहे –
- यांच्या या शेराने शब्दांचा महिमा जागवला; तर संमेलनाध्यक्ष मारोती मानेमोड यांनी त्यांच्या -
मी तुझ्या वेदनेचा शृंगार भोगला
मी तुझ्या आतला आकार भोगला
मी दिव्याखालच्या जागेत राहिलो
जन्मभर फक्त मी अंधार भोगला
– या शेरांनी वैयक्तिक दु:खे आणि सामाजिक आशय यांच्यावर बेतलेले अवघे आयुष्य डोळ्यांसमोर उभे केले.
तसे ठरवून घडले पण अचानक वाटते आहे
तुझे जाणे सिनेमाचे कथानक वाटते आहे
या दिवाकर जोशींच्या शेरातील प्रत्यय श्रोत्यांना खूप भावला.
डॉ. राज रणधीर यांच्या -
तो सगळ्यांना वेगवेगळया रुपात दिसला होता
तरी भरोसा मूर्तीवरती कधीच बसला नाही..
समानतेच्या हक्कासाठी चर्चासत्रे भरली
पण आरक्षण रद्द करा हा मुद्दा रुचला नाही..
- या शेरांनी वैचारिक मंथन केले.
याशिवाय, कालिदास चवडेकर यांची हझल हसवून गेली; तर डॉ. संतोष कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी यांच्याही अंतर्मुख करणाऱ्या गझलांना श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.
दुसऱ्या सत्रापासून खऱ्या अर्थाने नवीन पिढीची गझल ऐकायला मिळाली.
जगाला वाटले हरलो, अशा काळात आई मी
तुझ्या डोळ्यात आशेची दिवाळी पाहिली होती!
डोळ्यांमधली नदी वाहती झाल्यावर
मुली म्हणाल्या समुद्र त्यांच्या बाबांना ! –
लातूरच्या चैतन्य जोशी
यांच्या या शेरांनी श्रोत्यांच्या मनात ‘घर’ केले. जणू तेच भाव पण वेगळ्या शैलीत निशा चौसाळकर यांनी सुरेल गाऊन सादर केलेल्या या गझलेत व्यक्त केले.
नाव माझी पार होते का बघू दे
वादळाची हार होते का बघू दे
टाकले देऊन सारे लेकरांना
माय आता भार होते का बघू दे
सहज सध्या आणि सरळ शब्दांत नांदेडच्या छाया नागर्थवार यांनी -
जसा जगात यायला बराच वेळ लागला
जगायचे शिकायला बराच वेळ लागला
कुणी कमी वयातही चलाख फार जाहला
मला तसे बनायला बराच वेळ लागला
- असा निरागस सूर मांडला, तर परभणीच्या कीर्ती टेकाळे यांनी
बाईपणाच नडतो माझ्यातला मलाही,
वाटे कधी कधी की बदलून लिंग घ्यावे
बरा नाही तसाही नाद गझलेचा,
लिहावी लागते सल काळजामधली
- अशी स्त्रियांच्या काळजातली व्यथा आणि पराकोटीची हतबलता व
गझलकारांच्या अस्वस्थ भावविश्वाचे गमक मांडून अंतर्मुख केले.
साद येते सारखी पण थांबण्याची वेळ गेली
काल माझी वेळ सरली आज त्याची वेळ गेली
- या रोहिणी पांडे यांच्या शेराने दाद मिळवली.
या मुशायऱ्याचे अध्यक्ष आत्तम गेंदे यांनी
‘जात बदलणे’ पक्ष बदलण्याइतके आता सोपे व्हावे
कोणालाही..,सहज कुठेही प्रवेश करता यावा आता
या शेरातील आशयाने अनेक राजकीय व सामाजिक संदर्भ थेट मांडत उपरोधाची अतिशय प्रगल्भ मांडणी केली. बहारदार सूत्रसंचालन करत चंद्रकांत कदम यांनी
फुफाटा ठेवला माझ्याजवळ राखून मी
पिढीसाठी उद्याच्या राजरस्ता ठेवला !
असे मराठी बोली भाषेतील शब्दांचे सौंदर्य व्यक्त करतच आश्वासक आवाहन केले. रोहिणी पांडे, विमल मुदाळे, विद्या देशमुख यांच्या गझलांनीही श्रोत्यांना खूष केले.
तिसऱ्या मुशायरा गाजला तो स्त्रीविषयक भावविश्वातील भावदर्शनाने.
प्रत्येक स्त्री जनाई बनून तुलाच भजते
दुःखे कधी तिची तू दळणार पांडुरंगा
(पंडित वराडे),
स्वातंत्र्यावर जरी अताशा बोलत असते बाई
किती किती अन् कुणाकुणाला सोसत असते बाई
(वंदना केंद्रे-बांगर)
हासत हासत जीवन सगळे घालवायचे होते पण
उभा जन्म ती जाळत गेली .. औषध नव्हते चिंतेवर
(दिपाली कुलकर्णी)
या शेरांतून स्त्री जीवनाच्या व्यथांची सखोल वंचना गझलकारांनी व्यक्त केली.
हट्ट लाडीकसा लेक जेंव्हा करी,
बोबडा बोलही मारवा वाटतो
(अविनाश कासांडे)
वेदना कळतील माझ्या त्यास केवळ...
ग्रंथ हृदयाचा कुणीही वाचल्यावर...
(प्रमोद जाधव)
जीव गेला तरी याद करतो तिला
वाट बघते तिची रोज माझी कबर
(सय्यद चाँद तरोडकर)
चित्र काढले कुणी घराचे,कुणी फुलाचे
उपासपोटी काढत बसले भाकर कोणी
गाठून पाखरा तू माहेर आज माझे
बाबास सांग त्यांची मुलगी सुखात आहे
(रेणुका जोशी)
- या शेरांनी गझलेच्या नाजूक पण उत्कट आविष्काराचा परिचय देत प्रचंड दाद घेतली. डॉ. निलेश नागरगोजे, सुलक्षणा सोनवणे, देवदत्त मुंडे यांच्या गझलांनी गंभीर बाज सादर केला व श्रोत्यांची दाद घेतली.
चौथ्या मुशायऱ्यात जयराम धोंगडे यांच्या -
काळजाचा काढला फोटो
अन् कळाले वाढला मत्सर
- अशा अनेक शेरांनी आपली गझल गाजवली व गझलेच्या प्रत्ययसामर्थ्याचा परिचय दिला. अश्विनी विटेकर यांनी -
घेते कुठे मनावर दु:खा तुला जराही
बघ सोहळा सुखाचा करतात वेदनाही
ही आश्वासकता व्यक्त केली, तर संजय विटेकर यांनी -
मला नावात माझ्या वीट आहे लाभली
विटेवरचा तुझा दावा.. मला सांगू नको
- या वक्रोक्तीतून विठ्ठलाला लडिवाळ आव्हान दिले. सौ. अनुराधा वायकोस यांनी आपल्या गझलेतील -
सोसले सारे पराभव जिंकलो होतो तरीही,
नाव स्पर्धेतून माझे गाळणारे हेच होते....
- अशा शेरांतून आपली कैफियत मांडली.
मुशायऱ्याचे अध्यक्ष गिरीश जोशी यांनी अत्यंत सोप्या शब्दांत पण जीवनाचे सत्य आणि वैचित्र्य मांडले व दाद घेतली. त्या गझलेतले–
काळ करतो कदर शेवटी शेवटी
सत्य होते प्रखर शेवटी शेवटी
जन्मभर छापली ना कुणी बातमी
कौतुकाचे सदर शेवटी शेवटी
प्रेयसीने पुन्हा मोगरा वाहिला
धुंद झाली कबर शेवटी शेवटी
- हे शेर मंत्रमुग्ध करणारे ठरले.
याशिवाय, सुनिता मोरे, सिद्धेश्वर इंगोले, जना घुले, अमेय तांदुळजे यांनीही आपल्या उत्तम गझला सादर करून मुशायरा साजरा केला.
पाचवा आणि शेवटचा मुशायरा गाजवला तो बव्हंशी आयोजक असलेल्या स्थानिक व परिसरातील मंडळींनी.
ज्येष्ठ आणि प्रसिद्धीपराङमुख असलेले बालाजी टेंकाळे यांनी आपल्या अत्यंत साध्या पण प्रभावी शैलीत गझल आणि शेर सादर केले. त्यांच्या -
आयुष्य माणसाचे आहे असा तमाशा
तंबू तुडूंब भरला, तिकिटे उधार सारी
- या सुंदर शेराला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
जमेल तितका सत्वगुणाचा विकास साधू
मिळणे नाही पुन्हा जन्म हा सफल करू चल
हे यशवंत मस्के यांचे सात्विक आवाहन, तर -
बालाजी मुंडे यांचे
बघतो आहे कैक खुणा मी,तुझ्यात देवत्वाच्या
म्हणून मजला तुझा पराभव अटळ वाटतो आहे...
- हे उपरोधात्मक भेदक वास्तव श्रोत्यांच्या मनाला भिडले.
अपघाताने दिव्यांग केलेल्या कांचनगंगा मोरे यांनी आत्मविश्वासाचा धडाच
वाड्या, वस्त्या, तांड्यावर मी धडे घेतले जगण्याचे
नका दाखवू स्वप्ने आता चंद्रावरच्या विश्वाचे
या शेरातून देवून वृथा स्वप्ने दाखवणाऱ्या फसव्या विकासवल्गनांचा समाचार घेतला.
या मुशायऱ्याच्या अध्यक्षा स्नेहलता झरकर (अन्दुरे)
कर्तव्याच्या तळपायांची चाळण होते दिवसा
फुंकर मारत रात्र सरकते . . विशेष काही नाही
स्त्रीकर्तव्याच्या मूक भावनांना वाट करून देत व
आले सहज मला मी भेटून एकदा
पण वाटले असे की . . 'ती ' कोण भेटली
- या शेरातून स्वगताच्या अनुभूतीला एका उच्च पातळीवर नेऊन आत्मिक प्रत्यय
दिला. दयानंद बिराजदार, राजेसाहेब कदम, संजय तिडके, जीवन धेंडे यांनीही सुंदर गझला सादर करून मने जिंकली.
अशा वैविध्यपूर्ण भावभावना व प्रत्ययानुभूतीचे गूढनिराळे भावविश्व या सर्व गझलकारांनी घडवून गारुड निर्माण केले. ‘गागर मे सागर’ असे वर्णन केले जाते, त्या गझलेचे सूक्ष्माचे अवकाश कवेत घेण्याचे सामर्थ्य दाखवून दिले व सुरेश भटांच्या ‘विजा घेवून येणाऱ्या पिढ्यांच्या’ प्रतिभेचे दर्शन दिले. अशी ही एक चिरस्मरणीय मैफल लातूरकरांनी दिवसभर अनुभवली आणि आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ती अधिकाधिक जिवंत केली.
खऱ्या अर्थाने हा ‘गझलोत्सव’ गझलकारांच्या आणि रसिकांच्या आपभावाचा मेळा ठरला.
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर






0 Comments