Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलकारा योगिता तकतराव यांना ‘गझलयात्री पुरस्कार’ जाहीर Yuva Gazal Sammelan

मुंबईतील गझलकारा योगिता तकतराव 

यांना ‘गझलयात्री पुरस्कार’ जाहीर



     मुंबई, (प्रतिनिधी) : गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘गझलयात्री पुरस्कार’ मुंबईतील कवयित्री तथा गझलकारा योगिता तकतराव यांना जाहीर झाला आहे. येत्या ७ जून रोजी मुंबई येथे आयोजित पहिल्या युवा गझल संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

     या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवा गझलकार गोपाल मापारी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद जोशी, सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव, परिवर्तन फाउंडेशनचे डॉ. गिरीश इंगळे आणि प्रा. हेमंत सावंत उपस्थित राहणार आहेत. तर गझलकार चेतन पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

     कांदिवली (पश्चिम), मुंबई येथील रहिवासी असलेल्या सौ. योगिता वितल तकतराव या कवयित्री, लेखिका, निवेदक, सूत्रसंचालक, ग्राफिक्सकार तसेच गृहिणी अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करीत आहेत. सध्या त्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा म्हणून कार्य पाहत आहेत. यापूर्वी जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत असताना त्यांनी महिला गझल संमेलन तसेच गझल लेखन कार्यशाळांसाठी विशेष योगदान दिले आहे.

      इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या योगिता तकतराव यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कांदिवली शहर अध्यक्षा तसेच उत्तर मुंबई उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विविध साहित्य समूहांत मार्गदर्शक, परीक्षक, ग्राफिक्सकार आणि संयोजक म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

     त्यांच्या कविता, कथा आणि लेख विविध पुस्तके, वृत्तपत्रे व मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. स्टोरी मिरर तसेच विविध राज्यस्तरीय साहित्य स्पर्धांमधून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘उत्कृष्ट पद्य लेखन पुरस्कार’, ‘राजमाता जिजाऊ साहित्य भूषण पुरस्कार’ तसेच यंदाचा ‘काव्य करंडक २०२६’ यांसारखे मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. गझल लेखन स्पर्धांमध्येही त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहेत.

गझल, कविता, कथा, चारोळी, भावगीत, भक्तीगीत, अभंग, हायकू, मुक्तछंद यांसह विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साहित्य हेच आपल्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्या सांगतात. नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करून त्यांना साहित्य क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे कार्यही त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्यासोबत गझलकारा मनाली माळी यांनाही गझलयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

     पहिल्या युवा गझल संमेलनाचा गझलप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे व डॉ. स्नेहल कुलकर्णी तसेच मुंबई जिल्हा आणि कोकण विभागीय कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments