Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

युवा गझलकार विशाल मोहिते यांना ‘युवा गझलकार-२०२६’ पुरस्कार जाहीर Yuva Gazal Sammelan

 युवा गझलकार विशाल मोहिते यांना

‘युवा गझलकार-२०२६’ पुरस्कार जाहीर



     मुंबई, (प्रतिनिधी) मराठी गझल क्षेत्रात आपल्या प्रभावी शब्दशैली, संवेदनशील लेखन आणि सातत्यपूर्ण साहित्यसाधनेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारे युवा गझलकार विशाल मंदा अशोकराव मोहिते ‘मनोहर’ (रा. साखळी बुद्रुक, ता. जि. बुलढाणा) यांना गझल मंथन साहित्य संस्थेचा पहिला ‘युवा गझलकार-२०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे ७ जून रोजी आयोजित युवा साहित्य संमेलनात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

      प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद जोशी, सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव, परिवर्तन फाउंडेशनचे डॉ. गिरीश इंगळे व प्रा. हेमंत सावंत उपस्थित राहतील. गझलकार चेतन पवार स्वागताध्यक्ष आहेत.    

     शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विशाल मोहिते हे सध्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, शिवना, छत्रपती संभाजीनगर येथे अध्यापन करीत आहेत. त्यांनी एम.ए. (राज्यशास्त्र) पदवी प्राप्त केली असून साहित्याची आवड जपत त्यांनी २०१३ पासून कविता लेखनास सुरुवात केली. पुढे २०१७ पासून त्यांनी गझल लेखनाकडे वळत स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली.

     कथा, कविता आणि गझल या साहित्यप्रकारांमध्ये विशेष रुची असलेल्या मोहिते यांनी अल्पावधीतच गझल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या ‘विजा घेऊन आलेल्या पिढीची गझल’ आणि ‘तेच निखारे धरतो हाती’ या गझलांनी रसिक व साहित्यप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या लेखनात सामाजिक वास्तव, मानवी संवेदना आणि समकालीन प्रश्नांचे प्रभावी प्रतिबिंब दिसून येते.

     राज्यभरातील विविध कविसंमेलने, गझल मुशायरे आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे आणि आशयघन लेखनामुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

     यापूर्वी त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेत ‘स्व. लक्ष्मण जेवणे स्मृती राज्यस्तरीय गझल पुरस्कार-२०२३’ ने त्यांना गौरविण्यात आले होते. आता जाहीर झालेला ‘युवा गझलकार-२०२६’ हा सन्मान त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

     या पुरस्काराच्या घोषणेनंतर साहित्य क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, सहकारी शिक्षक आणि गझलप्रेमींनी विशाल मोहिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, त्यांच्या आगामी साहित्यनिर्मितीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. युवा गझल संमेलनाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, मुंबई जिल्हा कार्यकारिणी तसेच कोकण विभागीय कार्यकारिणीने केले आहे.



Post a Comment

0 Comments