Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलयात्री - भाग ४ Gazalkar Divakar Chaukekar

 🌷पुस्तक परिचय🌷


गझलयात्री - भाग ४ (मराठवाडा विभाग) 

प्रातिनिधिक गझल संग्रह  


मंडळी नमस्कार,  

     माझ्या ७२ वर्षांच्या आयुष्यापैकी फक्त आणि फक्त २६ वर्षेच मला मराठवाड्यात राहता आले याचे खूपच वाईट वाटते आहे, मात्र सगळ्यांना कबूल केल्याप्रमाणे "गझलयात्री" प्रातिनिधिक गझल संग्रह, भाग ४, मराठवाडा विभागाच्या परीक्षण / समीक्षण लेखाचा हा दुसरा भाग आपल्या समोर ठेवतो आहे. संग्रह वाचत असतांना माझ्या मनात आलेले विचार, माझ्या भावना तसेच माझी खंत सांगायची झाल्यास .....


तेव्हा असाच होता, आता तसाच आहे

माझा मराठवाडा, मागासलाच आहे ....

झालेत मुख्यमंत्री इथले अनेक वेळा 

प्रगतीत प्रांत अमुचा सुस्तावलाच आहे ....


     असे मोठ्या खेदाने म्हणावे लागेल. काही प्रमाणात पायाभूत सुविधा देण्याबाबत हालचाली होत असल्याचे दृष्टीस पडत असले तरी मराठी गझल लेखन क्षेत्रात झालेली इथली प्रगती ही मात्र नक्कीच नजरेत भरण्याजोगी आहे असेही मला अभिमानाने सांगावेसे वाटते. 

     संग्रहातील पहिलीच गझल ही वनहरिणी वृत्तातील,  धाराशिवच्या सौ अनिता नंदकुमार पडवळ, यांची आहे. वडिलांबद्दलच्या आपल्या भावना, आपले प्रेम व्यक्त करतांना त्या म्हणतात की ....


मुलांप्रमाणे सदैव जपतो कन्येलाही फुलासारखा 

जाते जेव्हा लेक सासरी आडोश्याला रडतो बाबा ....

 

तर भुजंगप्रयात वृत्तात लिहिलेल्या त्यांच्या दुस-या एका गझलेत त्या म्हणतात ....


लढा संकटाशी सतत देत गेले 

दिला दोष नाही कधी माणसाला  ..... 


    तर परभणीच्या सौ अनुराधा वायकोस, देवप्रिया/कालगंगा वृत्तातील गझलेत लिहितात ....


पायरी थिजली हरीची मागणी ना संपली 

सावळ्याच्या पायरीला अंतरंगी ठाव दे ....


     अशा शब्दांत त्या आपली देवावरची निष्ठा, श्रध्दा व्यक्त करतात तर नांदेड येथील अंजली कानिंदे-मुनेश्वर मैत्रीची व्याख्या करताना, मैत्रीचे मोल समजावून सांगताना वियदगंगा वृत्तातील गझलेत म्हणतात की ....


जिथे असतो नफा तोटा तिथे नसते खरी मैत्री 

कसे सांगू हिशोबाला कुठे पुरते खरी मैत्री ....


     मराठवाड्यातील मराठी गझल क्षेत्रात आघाडीवर असलेले आणखी एक नाव म्हणजे गंगाखेडचे गझलकार श्री आत्माराम जाधव (आत्मा) अनलज्वाला वृत्तात लिहिलेल्या गझलेत समाजात दिसून येत असलेल्या माणुसकी शून्य वृत्तीबद्दल चीड व्यक्त करतात तेव्हा ....


रस्त्यावरचे रक्त बघाया कुणीच नाही 

सगळी गर्दी सोशल मिडियावर हळहळते ....


     तर आई-वडीलांबद्दल मुलाला असलेल्या आदर भावनेबद्दल व मुलाच्या नम्र वागणुकीबद्दल बीडचे प्रा डाॅ अनंत देशपांडे लिहितात की ....


इतकेच म्हणालो केवळ मी काठी आहे तुमची 

अन् क्षणार्धात बापाच्या घामाचे अत्तर झाले ....


      समाजाची सध्याची मानसिकता, इथे हरघडी होत असलेले भांडण-तंटे आणि राडे लक्षात घेता आपण समाजात कसे वागायला पाहिजे याचा सल्ला देताना प्रा डाॅ अनंत देशपांडे म्हणतात की...


वाढली जशी गर्दी आसपास मुर्खांची 

हात त्या क्षणी दोन्ही जोडले बरे झाले ....


     तर जेष्ठ मराठी गझलकार, उर्दू गझल अभ्यासक, रेडिओलाॅजिस्ट, मुस्लिम स्काॅलर, माणुसकीचे खंदे पुरस्कर्ते, विश्व गझल परिषदेचे अध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर येथील माझे अत्यंत जवळचे असे मित्र डाॅ इक्बाल मिन्ने एका गझलेत म्हणतात की .....


माणसाला माणसाचे दु:ख कळले पाहिजे 

माणसाने माणसासाठीच जगले पाहिजे ....


     तर आयुष्यात अनेक प्रश्नांसाठी सततचा संघर्ष करावा लागलेले डाॅक्टर इक्बाल मिन्ने, जीवनात संघर्षाचा खिलाडूपणे स्वीकार करायला पाहिजे असे सांगताना म्हणतात   .....


हारलो नाही जगा मी आहे अजूनी 

संपलो नाही जगा मी आहे अजूनी ....


     तर आपल्या आयुष्यातील अशाच संघर्षाबद्दल नांदेडचे कपिल सावळेश्वरकर म्हणतात की ....


छायेत फार थोडी कायम उन्हात गेली 

ही जिंदगी व्यथांच्या सोबत सुखात गेली ....


     आणि मग व्यथांना असे सोबत घेतल्यानंतरही  आयुष्यभर सुखांची वाट पहावी लागली असे माझे नशीब आहे असे सांगतांना ....


आयुष्यभर सुखाची बघतोय वाट आहे 

मी शोधतो नव्याने माझी पहाट आहे ....

ताटात रोज माझ्या दु:खेच वाढलेली 

इतके कसे अभागी माझे ललाट आहे ....


     आणि असेच भयंकर दु:ख रोज रोज भोगल्यावर राणीसावरगाव ता: गंगाखेड येथील श्री गणेश नरवटे बंडखोरीची भाषा करतांना कवीच्या लेखणीचे महत्त्व सांगतात  ....


बंड करते फार माझी लेखणी 

पेटता अंगार माझी लेखणी  ....

लेखणीला तू कमी समजू नको 

पाडते सरकार माझी लेखणी  ....


     आणि अशा बंडखोरीनंतर लाभलेल्या शांत, निवांत आयुष्यात भोकरदनच्या गोवर्धन मुळक यांना आठवतो तो बालपणीचा काळ आणि ....


बालपणीचा काळ सुखाचा किती साजरा होता 

आजमितीला आठवणींचा तोच आसरा होता ....


     आणि अशा जुन्या आठवणीत आपण काय हरवले, काय गमावले याबद्दल सांगताना नांदेड येथील माझे (सन्मित्र) चंद्रकांत कदम म्हणतात की ....


खेळात कुणाच्या मामाचे पत्र हरवले आहे 

इथे आमच्या तर बापाचे छत्र हरवले आहे ....

कसे फिरकले नाही त्याचा शोध घेत कोणीही 

भावंड कुण्या भावाचे सावत्र हरवले आहे ? 

याच कारणासाठी तू ठरतोस वेगळा चंद्रा 

तुझ्याजवळ जे आहे ते सर्वत्र हरवले आहे ....


    तर माझे आणखी एक मित्र, नांदेडचेच श्री जयराम धोंगडे आज आपल्या आजूबाजूला चीड आणणारे जे घडते आहे त्याबद्दल आपल्या गझलेत म्हणतात की ....


मी घाण्याच्या बैलावाणी फिरतो आहे 

तेव्हा कोठे घास सुखाचा मिळतो आहे  ....

कर्तृत्वाचा बोथट झाला आहे बोरू 

माणूस आणि पेपर आता फुटतो आहे ....


     युवा गझलकार, प्रभावी सूत्रसंचालक असलेले माझे अजून एक मित्र सिल्लोड, छ. संभाजीनगर येथील श्री दिनेश कांबळे आपल्या आयुष्यात आलेल्या "स्त्री" च्या नात्याची महती सांगतांना म्हणतात....


बालमनाच्या बागेमधली जाई असते 

आई  नंतर ताई  दुसरी  आई असते  ....

उपदेशाने मनास उर्जा कायम देते 

ज्ञानेशाची अशी गुणी मुक्ताई असते ....


     तर असे आहेत माझ्या मराठवाड्यातले काही गुणी गझलकार आणि त्यांच्या गझलांमधील काही शेर. लेखाची वाढत चाललेली लांबी लक्षात घेता या प्रातिनिधिक गझल संग्रहावर अजून एक भाग लिहावा लागेल असे मला वाटते, तो भाग सुध्दा लवकरच सादर करण्याचे आश्वासन देतो व आज इथेच थांबतो ..... (क्रमश:)



संग्रहाची माहिती ....

पुस्तक: "गझलयात्री" प्रातिनिधिक गझल संग्रह भाग ४ मराठवाडा विभाग 

संपादक: श्री जयवंत भा वानखडे, सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना जि: चंद्रपूर 

प्रकाशक: श्री जयवंत भा वानखडे, गझल मंथन प्रकाशन, कोरपना (भ्रमणध्वनी: ९८२३६४५६५५ 

अक्षर जुळणी व मांडणी: श्री अनंत देशपांडे 

मुद्रक: रचना ऑफसेट प्रिंटर्स, पुणे 

मुखपृष्ठ: श्री साईनाथ फुसे 

संग्रहाचे मूल्य: ३५० रुपये




दिवाकर चौकेकर

गांधीनगर (गुजरात)

मोबाईल: 9723717047

------------ ------------ -----------


Post a Comment

0 Comments