. मराठी गजल म्हणजे सुरेश भट.भाग2.
. सुरेश भटांच्या गजलेतले तत्वचिंतन
.
1)उर्दू गजलमध्ये सूफी संप्रदायाच्या संस्काराने भक्ती,किंवा तत्वज्ञान सुद्धा, इष्किया प्रतिमा वापरून येते.मराठीत वा अन्यत्र तसे येत नाही.सनम हा उर्दू शब्द प्रियकर/प्रेयसी अर्थाने वापरला जातो,पण गजलेत तो खुदाला उद्देशून सुद्धा असू शकतो.
जीवनाची क्षणभंगुरता सांगतांना एखाद्या सुंदरीचा मोकळा सुटलेला कचपाश (कुंतल,केस) आठवेल ही शक्यता नगण्यच. पण गालिब म्हणतो.
आह को चाहिए इक उम्र असर होनेतक
कौन जीता है यहाँ तेरी जुल्फ के सर होनेतक
म्हणजे,हृदयातून(विरहाने) जो दर्द "आऽह" म्हणून बाहेर पडतो,त्याचा परिणाम(असर) व्हायला एक आयुष्य लागतं.इथे तर तुझे मोकळे केस बांधून मस्तकावर जायला जितका वेळ लागतो तितके तरी आम्ही जगू ह्याची शाश्वती नाही.
गालिबच्या शेराचे विद्वान मंडळींनी अनेक अर्थ लावले आहेत.ते बाजूला ठेवू.मात्र जीवनाची क्षणभंगुरता दाखवताना इष्किया रंग कसा आणलाय ते लक्षणीय आहे.
मराठीत सूफी अंगाने इतके परिणामकारक फार क्वचित लिहिले गेले असेल.भटसाहेबही तत्वज्ञान विषयक शेर थेट पद्धतीनेच लिहितात.मागच्या लेखात आपण तरल शेर पाहिले.ह्या लेखात आपण भटांचे तत्वज्ञान विषयक शेर बघू.
2)रूपगंधा ह्या भटांच्या पहिल्या संग्रहातले शेर बघू.
हे रिते अस्तित्व माझे शोध शून्यातील वेडा
माझिया मागेच माझी सर्व ही ओझी रहावी
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी ह्या गाजलेल्या गजलचा हा शेर आहे.
रिते अस्तित्व, शून्यातला शोध हे शब्द त्यांच्या सर्व अर्थच्छटांसह सामान्य वाचकाला आकलन होणे जरा कठीणच आहे.
"मी कोण आहे?" ह्या आध्यामातल्या मूलभूत प्रश्नाशी आशय निगडीत आहे. अस्तित्व रिते का? तर ते भ्रामक आहे म्हणून.(मायावाद.)
भ्रामक गोष्टीचा शोध कसा लागणार म्हणून वेडा शोध ...माणूस ह्या प्रश्नांची ओझी अकारणच वाहत असतो,असा सूर दुस-या ओळीत आहे.माझ्यामागे म्हणजे मी मेल्यावर ह्या प्रश्नांची ओझी मागेच रहावीत.कारण हा प्रवास अज्ञानातून ज्ञानाकडे आहे.
मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते ह्या
भटसाहेबांच्या नंतरच्या गजलमध्ये हाच आशय, ( ओझी मागेच राहिल्याने झालेली सुटका )
वेगळ्या संदर्भात असला तरी अधिक सुगम शब्दांत आल्याने वाचकाच्या आवाक्यात आला आहे.चर्चेसाठी घेतलेला शेर सोपा मुळीच नाही.मात्र म्हणून तो शेरच नाही असेही नाही.चांगला शेर आहे मात्र त्याला सुजाण वाचकाची अपेक्षा आहे.
3) रूपगंधातलाच आणखी एक शेर जो तुलनेने सोपा आहे,तो बघू.
मीच माझा चेहरा अन् मीच माझा आरसा
जाणतो मी पाहुनी माझ्यात--मी आहे कसा?
इथे पहिल्या ओळीत सरळ अद्वैत तत्वज्ञान सांगितले आहे. जे काही आहे ते एकच आहे.आरसाही मी,चेहराही मीच!त्या परम तत्त्वानेच स्वतःमधून हा पंचमहाभूतात्मक आरसा,म्हणजे देह तयार केला...आणि त्या आरशात स्वतःलाच पाहिले! आत्मज्ञान झाले की तो आरसाही लयाला जातो,पाहणारा "मी" ही संपतो,आणि उरते ते फक्त "चैतन्य" किंवा जे काही "आहे" ते! एकमेव.अशी अर्थच्छटा मला ह्या शेरात गवसली.कदाचित भटसाहेबांना वेगळे काही अपेक्षित असेल.'माझा देवाधर्मावर विश्वास नाही,माणूस आणि माणुसकी हेच मी मानतो' असे भट साहेब म्हणायचे,पण माणूस म्हटला तरी त्याचे अस्तित्व,त्यामागचे तत्वज्ञान आलेच.धार्मिक असणे आणि आध्यात्मिक असणे ह्या वेगळ्या बाबी आहेत.वरील आशय हा चांगदेव पासष्टी मध्येही आढळतो.
4)आता रंग माझा वेगळा,संग्रहातला शेर बघू.
आजन्म वै-यासारखे वेडावले ज्याने तुला
तो चेहरा होता तुझा,त्यालाच वेडावून जा!
हा शेर का व कसा सुचला असेल हे सांगता येणे कोणालाही शक्य नाही.
पण प्रा.राम शेवाळकरांनी सुरेश भटांवर एक विस्तृत लेख लिहिला होता.त्यात त्यांनी भटांना,अधू पाय व अन्य काही कारणांनी असलेल्या न्यूनगंडांची शक्यता सांगितली होती.त्या अंगाने त्यांच्या स्वभावाची, वर्तनशैलीची चिकित्सा केली होती.
तुला आजन्म तुझ्याच चेह-यानेवेडावले हा आशय त्या भावनेतून आला का? हे सांगता येणे अशक्यच!
त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवून आपण अर्थनिर्णयन करायचा प्रयत्न करू.एक अर्थ असा घेता येईल,माणसाला आजन्म वेडावणारे/फसवणारे/हुलकावणारे म्हणजे माणसाचे प्राक्तन.त्याचे नशीब.
पुन्हा हे प्राक्तन कोणी निर्माण केले तर पूर्वकर्मांनी
(किंवा पूर्वजन्मीच्या) म्हणजे पुन्हा मीच!माणूस आपल्या प्राक्तनाची निर्मिती स्वतःच करतो.म्हणून तो चेहरा होता तुझा! असे म्हटलेय.तू स्वतःच निर्माण केलेले प्राक्तन तुला मात देऊ शकत नाही.तू त्यावर मात कर! म्हणजे त्याला वेडावून जा.
मीच माझा चेहरा...हा आधीच्या शेरातला आशय वेगळ्या शब्दांत आला आहे.पण अद्वैत तत्वज्ञानाचे मूळ सूत्र कायम आहे.
5) हा शेर बघा,
हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
धगमगे शून्यात माझी आंधळी आरास
हरवले आयुष्य माझे एवढेच शब्द कळल्यासारखे वाटतात,शेराचा अर्थ पटकन् कळत नाही.आयुष्य कुठे हरवले,का हरवले,कसे हरवले? ह्यावर कवी मौन बाळगतो.शेर प्रासादिक हवा,शब्द सोपे असावे,ह्या प्रतिपादनाला हा शेर छेद देतो.पण तरीही आयुष्य हरवले म्हणजे विफल झाले एवढा अर्थ सूचित होतो.तो मान्य केला की आता जगण्याचे केवळ भास राहिले आहेत,त्यातला जिवंतपणा संपलाय हे उलगडते.पुन्हा दुस-या ओळीशी आपण अडतो.माझी आंधळी आरास म्हणजे काय आणि ती "शून्यात धगमगते" म्हणजे काय? तगमगते/झगमगते/ धगधगते आपल्या परिचयाचे शब्द. धगमगते ही वेगळी अर्थच्छटा, धग आणि झगमग
ह्या दोन्हीचा समावेश असलेली. हा मिसरा अजिबातच प्रासादिक नाही.
तरी प्रयत्न करू.
आंधळी आरास म्हणजे अव्यक्त/unmanifested
चैतन्य मानता येईल.म्हणजे व्यक्त झालेले manifested जीवन तर विफल झाले(हरवले) पण
जे काही अव्यक्त शून्य आहे,ते अजून धगमगते आहे.
ही आरास "आंधळी" का? तर अव्यक्ताला स्वतःच्याच
अस्तित्वाची जाणीव नसते म्हणून.
फारच कठीण आहे.मला जो आशय जाणवतोय तो मी गद्यातही वाचकांपर्यंत पोचवायला असमर्थ आहे.
पण अवघड तत्वज्ञान लिरिकली मांडणं हेही ह्या बहुरूपिणी गजलचे एक रूप आहेच.प्रासादिक नसला तरी हा गजलचा शेर आहे हे लक्षात घ्या.चार नियमांच्या चौकटीत न बसणारा हा शेर आहे.सुदैवाने हा भटसाहेबांच्याच गजलचा मतला आहे.अन्य कोणाचा असता तर स्वयंघोषित उस्ताद असा मतला होऊच शकत नाही असे म्हणाले असते.
6)झंझावात संग्रहातला हा शेर गाजलेला आहे.....
बघून रस्त्यावरील गर्दी,कशास मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे,पडून माझेच प्रेत होते!
आता मीच माझे "प्रेत" कसे पाहू शकेल? हा प्रश्न तर्कसंगत आहे.पण "काव्यांतर्गत लाॅजिक" ने त्याचे
उत्तर देता येते.अर्थात सामान्य वाचकाला हा शेर नक्कीच चकीत करतो.त्याची दादही येते.परंतु त्यातला अन्वय कितीजणांना कळेल? दाद येते ती चमत्कृतीला येते.
मी माझे बेवारशी प्रेत बघितले हे व्यवहारात शक्य नाही.मग काय असावे?तर धुळीमध्ये कुणी गरीब/दरिद्री/एकाकी व्यक्ती मरून पडली होती एवढाच भाग व्यावहारिक आहे.मात्र कवीने त्या प्रेताला पाहिले तेव्हा empathy सहानुभूतीची पराकोटीची भावना आली आणि ती व्यक्ती (प्रेत) मीच आहे असे त्याला वाटले. "सर्वाभूती एकच" ह्या न्यायाने किंवा सर्व दुःखीत,पीडित,शोषित एकाच जातीचे (कॅटेगरी ह्या अर्थाने,cast नाही.) असतात
ह्या न्यायाने.
पुढे हाच विचार भटांच्या गजलेत सोपा होऊन प्रकटलाय.जेव्हा त्यांनी लिहिले...
माणसांचे दुःख माझे बनत आहे
सोसताना मी नव्याने घडत आहे!
7) सप्तरंग संग्रहातील हा शेर बघा.
मी उरलो सुखदुःखांच्या वरपांगी भासांपुरता
हे जगणे, जगणे नाही,ही काया काया नाही
भारतीय तत्वज्ञान,"मी म्हणजे माझे मन नाही व देहही
नाही.तर ह्या दोहोना चालवणारा आत्मा किंवा चैतन्य आहे." हे माहीत असल्याशिवाय हा शेर पूर्णपणे कळणार नाही.सुखदुःख "भास" आहेत कारण कायाच मुळी भ्रामक आहे. माया आहे.आपला देहमनरूपी मीच ख-या अर्थाने अस्तित्वात नाही,ही जाणीव स्थिर झाली की,जगणे म्हणजे वरवरचे भासच होऊन राहते. म्हणून हे जगणे,जगणे नाही!
ही काया,काया नाही! असा मिसरा येतो.
8)सप्तरंग संग्रहातलाच एक मतला आणि शेर बघू.
उभा जन्म जातो आहे,हा असाच माझा
मी अजून शोधत आहे चेहराच माझा
ही भकास वणवण माझी कुणाला कळेना
पाठलाग करतो आहे,मी उगाच माझा
वरवर सोपे शेर आहेत."उभा जन्म जातो आहे हा असाच माझा" ह्यात एक निराशपणा,हताशा आहे.ज्याचे सामान्य वाचकाला आकर्षण असतो.आपल्याला काय मिळाले आहे,हे विसरून काय मिळाले नाही त्याचे दुःख आळवायला माणसाला आवडते.पण भटसाहेब सांगताहेत ती हताशा,व्यावहारिक अपयशातून आलेली नाही तर फार व्यापक अशा मानवी जीवनाच्या संदर्भातली आहे.आत्मशोध किंवा आत्मबोध हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नसल्याने आलेली ही निराशा आहे.हा अर्थ दुस-या ओळीत स्पष्ट होतो.मी अजून शोधत आहे चेहराच माझा!
अरे माणसा माणसा,कवा होशील माणूस हे बहिणाबाईंनी ज्या अर्थाने म्हटले आहे त्या अर्थाने आलेय.वरकरणी तो माणूस असला तरी त्याच्यातले पशूपण संपलेले नाहीय.म्हणून मी माझा खरा चेहरा शोधतोय,त्यासाठी मी माझाच पाठलाग करतो आहे.
मात्र दुस-या शेरात वेगळी छटा आहे.ती "उगाच" शब्दाने सूचित होते. पाठलाग करतो आहे मी उगाच माझा
पाठलाग करणे किंवा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणे हेच मुळी व्यर्थ आहे. मी पणाचे रहस्य कधीच कळणारे नाही.
हा शोध, हा पाठलाग उगाच आहे असे म्हणून, जाणता/अजाणता भटसाहेबांनी सा-याआध्यात्मिकते
वर,प्रश्नचिन्ह लावलंय.म्हणून हा शेर खास भटांचा आहे.
तत्वज्ञान व दार्शनिकता,भक्ती हे सगळे विषय गजलमध्ये येतात,येऊ शकतात.ह्या बहरूपिणीची ही
अनेक रूपे आहेत. निव्वळ तंत्र शिकून,कारागिरी करून तयार केलेले शेर,मुशाय-यात दादलेवा असतीलही.पण ते तात्कालिक परिणाम करतात.पुनःपुन्हा प्रत्यय देण्याची क्षमता त्यांच्यात नसते. मात्र त्यासाठी मुद्दाम कठीण किंवा तत्वचिंतनात्मक लिहायला हवे असे नाही.मनात उठलेल्या उर्मीशी,विचार तरंगाशी आलेल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून लिहायला हवे हे मात्र खरे.
9) सुरेश भटांचे तरल शेर व तत्वचिंतनात्मक शेर आपण दोन लेखात पाहिले.त्यांच्या गाजलेल्या गजला अतिपरिचित आहेत.हे दोन पैलू तितके पुढे आले नव्हते,म्हणून त्यावर लिहिले.
सुरेश भटांचे एकूणच मराठी काव्याला,(विशेषतः गीत,गजलला) सर्वात महत्वाचे योगदान माझ्या मते वेगळेच आहे.भटांच्या आधी काव्यातली नायिका ही लाजरी बुजरी होती.मान खाली घालून पायाच्या अंगठ्याने जमीन कोरणारी."मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला" असे म्हणत उखाण्यात नाव घेणारी.आधुनिक काळात हे सगळं बाद झालं.आता नव-याला नावाने हाक मारतात,अरे,तुरे करतात.कारण स्त्री आता शिक्षण,कमाई सा-याच गोष्टीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरते.
ही बदललेली धीट नायिका भटांनी आणली.आधुनिक स्त्री बरोबरीने वागते.
प्रेमात,संसारात आणि शृंगारातही.ती म्हणू शकते "मालवून टाक दीप,चेतवून अंग अंग" किंवा
"तरूण आहे रात्र अजुनी,राजसा निजलास का रे?"
आणि तरीही शृंगारातली नजाकत हरवत नाही.तो बीभत्स किंवा बटबटीत होत नाही.
भटसाहेबांच्या प्रेम/शृंगारविषयक रचनांकडे ह्या दृष्टीने जरूर पहा.
इति लेखनसीमा.
सदानंद डबीर.9819178420
0 Comments