Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलायन Gazalkar Sabir Solapuri

 🌹 पुस्तक परिचय 🌹



राजन लाखेंच्या लाखमोलाच्या गझला: गझलायन


     राजन लाखे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्याशी निगडित नाव आहे. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील असंख्य नव-प्रतिभेच्या कवींना कवी कट्ट्याच्या माध्यमातून व्यापक दालन निर्माण करून दिले आहे. कवी कट्ट्याला दरवर्षी लाभणारा वाढता प्रतिसाद हा लाखे यांच्या चोखंदळ निवडीचे द्योतक आहे. त्यांना नव्याची नवलाई नेहमीच खुणवत राहते. सध्याच्या काळातील ही चांगली गोष्ट आहे. कवी आणि कवितेवर मन:पूत प्रेम करणारे ते संवेदनशील मनाचे कवी आहेत. आता त्यांचा प्रवास कवितेकडून गझलेकडे सुरू झाला आहे. गझल हा पूर्णपणे तंत्रानुगामी काव्य प्रकार आहे. तो मुळातून समजून घेण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. लाखे यांनी गझलेचे शुद्धतंत्र, छंद वृत्तासह अल्पावधीत अवगत केल्याचे दिसून येते.  गझलसृजन करणे ही अवघड आणि जोखमेची गोष्ट आहे. त्यासाठी व्यासंगाची, अभ्यासाची मोठी किंमत अदा करावी लागते. अंतर्मनातून झपाटून जावून गझलेशी तादात्म्य पावे लागते. हे मोल वसूल केल्याविना गझल वश होत नाही. ज्या झपाटलेपणातून लाखे यांना गझल विधा जवळ केली आहे. यातूनच गझल त्यांच्यावर आषक झाली आहे. अन्यथा पहिल्या प्रयत्नातच ते इतक्या सहजसुंदर गझला लिहू शकले नसते. त्यांच्या बऱ्याच गझला काही प्रतिष्ठित दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्यास. त्यावर वाचकांनी पसंतीची मोहोर उमटविली आहे. त्यांच्या प्रारंभिक गझल प्रवासातील हे सुचिन्हच म्हणावे लागेल. 


      ‘गझलायन’ या मनोवेधक शीर्षकाचा त्यांचा पहिला वहिला, ताजातवाना गझलसंग्रह रसिकजनांच्या भेटीस आला आहे. रसिक त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतीलच. यात लगावलीसह विविध वृत्तांच्या गझलांचा अंतर्भाव आहे. त्यांच्या गझलांमध्ये आशय वैविध्याचे दर्शन घडते. लाखे यांना बोजड, भरभक्कम प्रतिमा, उपमा आणि प्रतिकांचा अजिबात सोस नाही. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, हा मुद्दा स्पष्ट असल्याने त्यांना दुर्बोध शब्दांच्या आड लपण्याचे कारण उरत नाही. साध्या सहज सोप्या शब्दशैलीत ते शेर गुंफतात. आकलनाच्या दृष्टीने त्यात कुठेच अडचण येत नाही. साध्या शब्दात प्रवाहीपणे व्यक्त होणे ही तशी साधी गोष्ट नाही. लाखे यांना ही साधेपणाची हातोटी साधली आहे. त्यामुळे त्यांच्या गझला संवादी स्वरूपाच्या होत जातात. ते शेरांतून वाचकांशी बोलत राहतात. हे बोलके कौशल्य अन्य गझलकारांमध्ये आभावानेच आढळून येते.


      अनेकदा जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. लाखे यांना गझलेचा हात धरला ते वाचकांसाठी चांगलेच झाले. नाहीतर वाचक त्याच्या वंचित राहिला असता. गझलेच्या सागरात उडी घेतल्यानंतर स्वतःलाच हात पाय मारावे लागतात. इथे कुणी तारण्यासाठी येईल आणि किनाऱ्यावर घेऊन जाईल,  असा भाबडेपणा बाळगण्यात फारसा अर्थ नसतो. हा अतितटीचा प्रवास स्वतःलाच करावा लागतो. उभरत्या गझलकारांनी याची खूणगाठ मनाशी नक्कीच बांधायला हवी. गझल सागरात जो स्वतःला बिनधोक झोकून देतो,  आरपार झुंजतो. अंतिमतः जीत त्याचीच असते. मात्रा वृत्तातील एका मतल्यावरून हा आशय अधिक सुस्पष्ट होतो.


धक्का दिला त्यांनी मला बुडवण्यासाठी

पाण्यात पडलो पोहलो जिंकण्यासाठी


      गझलेचा छंद रात्रंदिन वेडावणारा असतो. गझलेचा असोसी पावलोपावली अतृप्तीची जाणीव करून देते. गझलकारास एकदा का हा छंद जडला की मग त्याच्या उरात आणि मुखात गझलेशिवाय दुसरे काहीच नसते. हा ध्यास मनात अखेरपर्यंत वेढून राहतो. गझल हेच त्याचे औषध बनते.


उरात माझ्या गझल असावी

मुखात माझ्या गझल असावी


      गझलकार कोणत्याही परिस्थितीत मार्गक्रमण करत असला तरी जगण्याच्या प्रत्येक वळणावर गझलेची साथ किती गरजेची असते,  हे गझलकाराशिवाय कोण सांगू शकतो उरात माझ्या गझल असावी या गझलेच्या सगळ्याच शेरांतून लाखे यांनी गझलेची आंत्यतिक आवश्यकता प्रतिपादली आहे. गझल सकस, सरस जगण्याचा कसा मुलाधार आहे,  हे त्यांनी जाणिवेतून रसिकांसमोर ठेवले आहे. ती खूप काही अंत:करणा भिडणारे सांगून जाते.


निरोप घेईन मी जगाचा

पुढ्यात माझ्या गझल असावी


      कुणाचीही उंची ठरविण्याचे फुटपट्टी करते. उंचीचे मोजमाप करणाऱ्या फूटपट्टीलाच आपण इंच म्हणतो. जगाच्या मोजमापाचे हे तंत्र अनाकलनिय आहे. फुटपट्टी ही इंचाची असली तरी ती कुणाची ही उंची फुटाने मोजते. मग एखाद्याची उंची मोजणारी फुटपट्टी लहान कशी काय ठरते. याकडे लाखे यांना बारकाईने लक्ष वेधले आहे. उंटांची उंची मोजणारी फुटपट्टी त्याच्यापेक्षा उंच नाही का, असा सवालही ते गझलेतून उपस्थित करतात. एका वेगळ्या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडले आहे.


उंटाला मी उंच म्हणालो

फुटपट्टीला इंच म्हणालो


     शेती आणि पाणी यापासून शेतकऱ्याला कधीच वेगळे करता येत नाही. पाण्यावर शेतीचे आरोग्य आणि शेतकऱ्याचे जीवन अवलंबून असते. पाऊस अमर्याद बरसला तर पिके वाहून जातात. पावसाने ओढ दिली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते. अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडतो. या पार्श्वभूमीवर पाण्याचे किती महत्त्व आहे. हे लाखे प्रभावीपणे अधोरेखित करतात.


शेतकऱ्याचे जीवन असते पाणी पाणी

शेतामधली माती म्हणते पाणी पाणी


      डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातला एकमेव महामानव! या क्रांतीसूर्याच्या लेखणीने घटनेचा लख्ख साक्षात्कार घडविला. त्यांच्या सामाजिक महत्त्वेची लाखे यांनी गझलेतून नव्याने केलेली मांडणी सर्वस्पर्शी आहे. त्यांच्यासारखा समाज महानायक पुन्हा होणे नाही.


ना होणार असा हा, ना कधी झाला, नायक एक महानायक तो

हृदया हृदयावर राज्य करणारा मानव एक महानायक तो


      वास्तवतेचे भान देणारी ही एक लक्षवेधी गझल आहे. महामानवाची थोरवी असो, शेतकऱ्याचे विदारक दुःख असो वा दैनंदिन जगण्याचे तत्वज्ञान असो त्यावर लाखे यांनी मर्मग्राही भाष्य नोंदविले आहे. या गझला लाखमोलाच्या आहेत. अध्यात्म्याच्या अंगाने जाणारे काही शेरही प्रस्तुत संग्रहात वाचावयास मिळतात वानगीदाखल हा शेर पहा


आयुष्य छान आहे आकार पाहिजे रे

अध्यात्म जाणणारा ओंकार पाहिजे रे


     प्रेमविषयक गझलाही लाखे यांना तितक्याच हळुवारपणे,  तरलतेने त्यातील गझलियत कायम ठेवून लिहिल्या आहेत.


का ग माझ्याकडे पाहते सारखी

ही गुलाबी नजर खेचते सारखी


      संताप एक शास्त्र आहे. हे शस्त्र आपले असले तरी ते आपल्यावरच वार करते. हे लाखे यांना ठाऊक आहे. संताप, कडवटपणा, विद्वेष, त्रागा या शब्दांना त्यांच्या गझलेत जागा नाही. समाजजीवनाकडे ते सकारात्मकतेने पाहतात.  हा त्यांचा गुणविशेष आहे. ‘गझलायन’ हा लाखे यांचा पहिला संग्रह असल्याने त्यात क्वचित प्रसंगी सैलसरपणा जाणवतो. आगामी संग्रहात निश्चितपणे गोटीबंदपणा येईल. ते अधिकाधिक उत्कृष्ट आणि सर्वार्थाने निर्दोष मराठी गझला लिहू शकतील,  याची ग्वाही देणारा हा आश्वासक गझलसंग्रह आहे. राजन लाखे यांच्या पुढील गझल वाटचालीस माझ्या मनस्वी शुभेच्छा!



बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

१५' प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी,

कुमठा नाका, 

सोलापूर: ४१३००३.

मोबाईल नंबर: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments