पुस्तक परिचय
गझल मंदिरात रमलेली "मानसी"
कथासंग्रह (३), कवितासंग्रह (३), बालकथासंग्रह (३), प्रातिनिधिक कथासंग्रह (४), प्रातिनिधिक कवितासंग्रह अशी साहित्यसंपदा असलेल्या आणि विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या कवयित्री आणि लेखिका मानसी जोशी यांचा मानसी हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून विविध विषयांवरील एकूण ९८ गझला या गझलसंग्रहात वाचायला मिळाल्या तरी बहुतेक गझला या स्त्री जीवनाशी संबंधित आहेत. स्त्रीला समाजात मिळणारी वागणूक, संसार करताना आणि अनेक नाती सांभाळताना तिची होणारी परवड, स्वत:च्या स्वप्नांना तिलांजलि देत पतीच्या आणि मुलांच्या सुखात आपलं सुख पाहणारी आणि दु:ख, वेदना यामधूनही आनंद शोधणारी स्र्त्री मानसीताईंच्या गझलांमधून पहायला मिळते.
बायकांचा जन्म म्हणजे "रांधा, वाढा, उष्टी काढा " असं पूर्वीच्या काळी म्हंटलं जायचं. आता परिस्थिती पालटली असली तरी अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे बाईला सावध राहून प्रसंगी स्वतःचं रक्षणही करावं लागतं. याबरोबरच संसारातील अशा अनेक गोष्टी आहेत जिथे घरच्या गृहिणीशिवाय घरातील सभासदांचं पान हलत नाही. अशा वेळेस स्वतःची दु:खं, वेदना विसरून स्त्रीला वावरावं लागतं. त्याचं वर्णन मानसीताईंनी "रोजचे जगणे नवा अध्याय असतो बायकांचा" या शेरातून केलं असलं तरी स्वतःचं वर्णन मात्र
"काळजाचे दार उघडे ठेवणारी मानसी मी
योग्य अन परखड प्रसंगी बोलणारी मानसी मी"
अशा शब्दांत केलंय ज्यामधून आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन दिसून येतो. (प्राक्तनाच्या स्वागताला जागणारी मानसी मी - पान नं १५)
मानसीताईंचा हाच स्वभाव पुढल्या गझलेत दिसून येतो "मुखवटा काढ थोडासा | जगाचे दोष बघण्याला" आणि "जरा सांभाळ मदिरेला | बळी पडलास मोहाला" या दोन शेरांमधून जसा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो तसंच संपूर्ण गझलेतून कुणाला तरी चार समजुतीच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. (नको चिडवूस कोणाला पान नं १६) "चुकीचे सोडले आपण | बरोबर घेतले आपण" पती पत्नी म्हंटलं की वाद हा व्हायचाच पण संसार करताना अनावश्यक गोष्टींचा बाऊ करायचा नसतो हे तत्व लक्षात घेऊनच "नको पण वाढवू भांडण | जगूया आपले आपण" असं मानसीताई म्हणतायत. (चुकीचे सोडले आपण पान नं १७)
पिंडे पिंडे मतैर्भिन्न: या म्हणीप्रमाणे प्रत्येक स्त्री चा स्वभावही वेगळा असतो. याचा दाखला देताना रामायणातील व्यक्तिरेखांचा आधार घेत मानसीताई म्हणतायत "भोगला वनवास रामाने जरी मातेमुळे | सावली होऊन वनवासास गेली जानकी" दोन स्त्रियांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतानाच आई आणि बायकोच्या भांडणात मुलाची अवस्था कशी होते हे मानसीताईंनी "वाटते संसार सोपा लग्न करताना तरी | बायको आईमध्ये बनते पतीची ढोलकी" या शेरामधून अचूक सांगितलं आहे. (का परीक्षा घेत असतो देव माझी नेमकी पान नं १९)
लग्न झाल्यानंतर सून, वहिनी, मावशी, आत्या, मेहुणी, आई, अशी बरीच नाती स्त्रीला चिकटतात. एकदा का लग्न होऊन संसार सुरू झाला की स्त्रियांना स्वतःच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला वावच मिळत नाही. मग कधीतरी आपण घेतलेला निर्णय चुकीचा तर नव्हता ना या विचारांच्या वावटळीत "गगनभरारी मारू शकते कळले होते मला तरीही | अवकाशाला कवेत घेणे सुचले नाही चुकले माझे" असा तिचा समज पक्का होत जातो. "चंद्रचांदण्या हव्या कुणाला वैभव माझे मुलेच होती" अशी मनाची समजूत काढत असतानाच, दुसरं मन बंड करत म्हणतं "दागदागिने पैशासाठी झटले नाही चुकले माझे" (स्वाभिमान हा माझा ऐवज कळले नाही चुकले माझे पान नं २१). असं जरी असलं तरी माझ्या खंबीर आणि धैर्यशील मनामुळेच तर "लाख संकटे आली गेली घाबरले मी नाही तेंव्हा" आणि "नेटाने, मी जगत राहिले कधी कुठेही झुकले नाही" म्हणूनच तर आज मी ताठ मानेने उभी आहे . तरीही माझं मलाच कळलं नाही की "अशी कशी मी गुंतत गेले नात्यांमधल्या गुंत्यामध्ये" तुझं बिनधास्त आणि मुक्त आयुष्य माझ्याच आयुष्याबरोबर धावत होतं हे खरं असलं तरी "संसाराचा भार वाहिला तुझे मुक्तपण लुटले नाही" याची टोचणी मात्र मला अस्वस्थ करत राहते. (आयुष्याला फुलवित जाणे मनासारखे जमले नाही पान नं २२)
स्त्री कितीही शिकली आणि प्रगत झाली तरी आजच्या युगातही तिला सत्वपरीक्षा द्यावी लागते याचा खेद मानसीताईंना होतो आहे. एकपत्नी, एकवचनी आणि एकबाणी प्रभू श्रीराम हे सर्वच दृष्टीने सरस आहेत हे सांगताना त्या लिहितात “इतिहासाच्या पानावरती सरस ठरवला राम परंतू” इथे परंतू हा शब्द फार महत्वाचा आहे कारण या शब्दानंतर पहिल्या ओळीला कलाटणी देणारी ओळ येते.. ती म्हणजे “सीतेसाठी अग्नीपरीक्षा युगेयुगे का थांबत नाही” ही ओळ वाचल्यावर आपण आजच्या युगात वावरत आहोत की अजूनही रामायण काळात आहोत असा संभ्रम मनाला पडतो. सीतेप्रमाणेच आजच्या काळातही स्त्रीला कधी ना कधी अग्नीपरीक्षा द्यावी लागते आहे इकडे लक्ष वेधत असतानाच मुलगी ही नेहमी आईबापाची ठेव असली तरी परक्याचं धन असं समजूनच तिला वाढवलं जातं म्हणून ठेव धन्याची अशी उपमा या शेरामध्ये देऊन, शिक्षण, नोकरी, विचारस्वातंत्र्य असं सारं काही आलबेल आहे असं भासवणा-या या जगात लग्नानंतर सासुरवाशीण झाली तरीही “मुक्त मोकळा श्वास घेतला तरी मुलीची धडगत नाही” असं गझलकारांना वाटतं आहे शेतक-यांच्या आत्महत्त्येच्या पेपरमध्ये येणा-या बातम्या वाचून क्षणभरासाठी आपलं मन विषण्ण होतं खरं पण कविमनाच्या मानसीताईंना मात्र ही बाब अस्वस्थ करते आणि हीच अस्वस्थता त्यांच्या “धरणीमाता प्रसन्न होऊन धान्य डोलते तुझ्या अंगणी | शेतकऱ्यांना मात्र गरीबी त्रिकालातही सोडत नाही” या शेरातून व्यक्त होते. शेतक-यांविषयीची राजकीय उदासीनता, सावकारी पाशात अडकणारी त्याची मान, धान्याला न मिळणारा अपेक्षित बाजारभाव असा ब-याच गोष्टींकडे या शेरामधून लक्ष वेधलं जातं. (भोग भोगले आयुष्याचे तरी व्यथेची धडगत नाही पान नं २३)
पूर्वीच्या स्त्रियांनी तशाही परिस्थितीत संसार केला हे खरं असलं तरी नवीन पिढीबद्दल “नकोत कोणी वडीलधारी घरात म्हणते | स्वैरपणाने नवी पिढी ही वागत असते” असं स्पष्ट मत या शेरातून व्यक्त करून पुढे “नातीगोती समजत नाही धार जिभेची | कधी कधी ती ह्रदयासाठी करवत असते” असंही आपलं निरीक्षण मानसीताई नोंदवतात. (मनासारखी कर्णभूषणे घालत असते पान नं २४) लग्नानंतर पती आणि मुलं यांच्या सुखातच आपलं सुख मानणा-या स्त्रियांविषयी बोलताना, त्यांच्या इच्छा, अपेक्षांचं काय झालं असावं हे मानसीताईंनी “तिने संसार केला नेहमी पतिच्याच मर्जीने | तिची इच्छा अपेक्षा वाटते शब्दात उरलेली” या शेरात स्पष्ट केलं आहे. (मला अपुल्याच लोकांनी दिली नाती उसवलेली पान नं २६). मुलं, पती आणि संसारातील अडचणी यामध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा मारल्या जातायत हे ठाऊक असून काही स्त्रिया “त्या हासऱ्या क्षणांना नात्यात गुंफते मी | आधार जीवनाचा त्यांच्यात पाहते मी” असाही आपला आनंद शोधतात. (त्या हासऱ्या क्षणांना नात्यात गुंफते मी पान नं २७))
समाजातील काही महाभागांचं वर्णन मानसीताईंनी “कुणाला ओढ प्रेमाची कुणाला आस विजयाची | कुणी सोडून नात्यांना पकडतो कास स्वार्थाची” या शेरात अगदी अचूक केलं आहे. मोहाच्या क्षणांची भूल तर सर्वांनाच पडते. कधीकधी आपणही आयुष्यात येणा-या या मोहाच्या क्षणांना इतकं आपलंसं करतो की त्यासाठी “मनाने मांडला व्यापार मोहाचा स्वतःसाठी | भरडतो स्वत्व आपण अन् विसरतो जाण सत्याची” हेदेखील आपल्या लक्षात येत नाही. (कुणाला ओढ प्रेमाची कुणाला आस विजयाची पान नं २८)
सुख म्हणजे नक्की काय असतं हे कुणालाच सांगता येत नसलं तरी मानसीताई सुखाची व्याख्या करताना म्हणतात “वेदनेला झाकले मी अंतरी | सुख म्हणाले शाल घे तू भरजरी” तर श्रमांचं महत्व त्यांनी “कष्ट आयुष्यात करते खूप मी | मग श्रमाची गोड मिळते भाकरी” या शेरातून सागितलं आहे (वेदनेला झाकले मी अंतरी पान नं ३०) या संग्रहातील काही काही शेर फार बोलके आहेत. उदाहरणार्थ “कोडे पडे मला की ... चिंता सतावते | रागात संयमाचा उपदेश मानते”, “सुखदु:ख सोयरे हे आधार सोबती | वाटेवरी सुखाच्या दु:खास गाळते” किंवा “आयुष्य एक असते कोरी वही जरी | लिहिते हवे मला जे आत्म्यास भावते” (दु:खास भावनेची जरतार लावते पान नं ३३)
आपण दुस-याला फार कमी वेळा माफ करतो पण स्वत:च्या चुकांकडे कानाडोळा करून स्वत:ला मात्र लगेच माफ करून टाकतो. स्वत:च्या चुका नजरेआड करूनही काही फरक पडत नाही तेंव्हा मानसीताई “लाख चुका मी माफ करूनही परिवर्तन का घडले नाही | न्यायासाठी झगडले तरी सत्य वागणे जमले नाही” असा शेर अतिशय परखडपणे लिहून जातात आणि मग “गोड बोलले सगेसोयरे सुखदु:खाच्या जरी प्रसंगी | स्वार्थासाठी कुणी कुणाचा वापर केला कळले नाही” असं सांगून नातेवाईकांच्या वागणुकीवरही या शेरामधून त्यांनी ताशेरे ओढले आहेत त्याचबरोबर “देवत्वाचा बुरखा घालत लुटले होते भल्याभल्यांनी | पण पैशाच्या मोहापायी माणुसकीला जपले नाही” असं म्हणून समाजातील दुष्प्रवृत्ती वाढत चालल्या असून आपणही नकळतपणे त्याचाच एक भाग बनत चाललो आहोत हेही दाखवून दिलं आहे. (लाख चुका मी माफ करूनही परिवर्तन का घडले नाही पान नं ४६)
एखादी कविता कधीकधी सहज जमून जाते पण गझल मात्र सहजासहजी गझलकाराला वश होत नाही. गझलचा ओनामा, गझलची जमीन, मतला, काफिया, रदिफ या सर्वच गोष्टी घोटून घ्याव्या लागतात. मानसीताईंनीही गझलचा अभ्यास केला तेंव्हा “मी लगावली म्हणताना जग वेडे ठरवत होते” असं त्यांनी एका शेरात म्हंटलं असलं तरी “अन गझल छान झाल्यावर ते ऐकत बसले होते” इतका त्यांच्या गझलेचा प्रभावही त्यांना लगेच दिसून आला (ते कष्ट सोसूनी आता मन खरेच दमले होते पान नं ५१) संसारात स्त्रीला कष्ट कधीच चुकले नाहीत तरीही विविध विषयात प्रावीण्य मिळवत शिक्षण घेणा-या स्त्रीविषयी त्यांनी “शिकून स्त्रीने झेप घेतली पुसले अपुले अश्रू | आज गवसणी घालते असते आकाशाला झरझर” या शेरातून आजच्या स्त्रीचं कौतुक केलं आहे त्याचबरोबर “मर्यादेचे कुंपण स्त्रीला वाटते आहे ओझे | बंधनातुनी सुटण्यासाठी प्रयत्न करते मणभर” या शेरामधून समस्त स्त्रीवर्गाच्या व्यथेला बोलतं केलं आहे (आठवणींच्या गावी माझे मन का पळते भरभर पान नां ५३). घरातली आपली म्हणणारी माणसंच आपलं बोलणं कसं फिरवतात हे त्यांनी “घर उभे आहे तुझ्यावरी म्हणता | जेवणाची वेळ टळता आळशी म्हटले” या शेरातून फार सुंदर रीतीने दाखवून दिलं आहे (बोलले मी गोड तेंव्हा चांगली ठरले पान नं ५५)
या गझलसंग्रहातील बहुतेक गझला या स्रीच्या सुखदु:खांविषयी, वेदनांविषयी, घरादारासाठी तिने केलेल्या त्यागाविषयी बोलणा-या असल्या तरी सुखासवे जगायचे कसे... तुला शिकायचे (पान नं ५७), मतभेद कुठे झाले जरा समजून घेऊ (पान नं ६७), हक्क मिळण्याला जरी लढते बिचारी (पान नं ७४), द्रौपदीचे दु:ख येथे जाणले नाही कुणी (पान नं ७७) या गझलांप्रमाणेच आठवणींच्या गावी माझे मन का पळते भरभर (पान नं ५३), ग्रंथ माझे गुरू भले होते (पान नं ६३), कर्जे फिटून गेली व्याजात राहिला (पान नं ६४), उगाच जीव गुंततो कुणामध्ये कधीकधी (पानं नं १०३) या गझलाही त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे लक्षात राहतात.
आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतून मानसीताईंच्या शेरांची ओळख डाँ स्नेहल कुलकर्णी यांनी करून दिली आहे. त्याचबरोबर मानसीताईंच्या गझल लिहिण्याच्या कौशल्याविषयी आपलं मत मांडताना त्या लिहितात “गझलेतील भावनात्मक सौंदर्याची भूक भागविणारे मानसीताईंचे हे शेर.... हीच खरेतर त्यांच्या गझलेची ओळख आहे असं म्हंटलं तर फारसं वावागं ठरू नये. गझलाकार स्वत:च्या अंत:करणात उचंबळलेल्या भावभावना, विचारविकार ज्याप्रमाणे आपल्या शेरात प्रकट करतो त्याचप्रमाणे बाह्य जगतातील सुखदु:खे पाहून उत्कटपणे वर आलेले विचार, विकारदेखील तितक्याच प्रामाणिकपणे आविष्कृत करतो... त्याची ही वस्तुनिष्ठताच त्याच्या शेराला अस्सल बनवत असते. अशी वस्तुनिष्ठता घेऊन येणारे मानसीताईंचे शेर ... रसिकांना अंतर्मुख करतात, विचारप्रवृत्त करतात हे त्यांच्या लेखणीचे खरे यश आहे.”
आपल्या मनोगतात मानसीताई म्हणतात “गझल हा एक वृत्तबध्द प्रकार आहे आहे हे मला माहित होते पण उर्मिलामाईंच्या शाळेत गझलेचे धडे घेताना गझल ही तन, मन, बुध्दी, भावना गुंतवून टाकणारी रचना आहे आणि जेंव्हा ती लिहून पूर्ण होते तेंव्हा होणारा आनंद गगनभेदी असतो याचा अनुभव मी घेतला.”
ज्येष्ठ गझलकार समीर बापट सरांनी मानसीताईंना शुभेच्छा देतानाच मानसी या शब्दाचा अर्थही सांगितला आहे. ते म्हणतात “मानसी नावाचा अर्थ शुध्द आत्मा / पवित्र मनाची असा होतो. प्रभावी व्यक्तिमत्व आणि कोणत्याही परिस्थितीत समस्येपासून दूर न जाता त्यावर मात करणा-यांचे नाव दर्शवते. मानसी नाव हे पूर्णपणे प्रामाणिकतेचे आणि शुध्दतेचे प्रतिबिंब आहे.”
झाडाखाली गझलेचा विचार करत बसलेल्या स्त्रीचं मुखपृष्ठ आणि सुलेखन, सुलेखनकार प्रशांत पी. रामगिरवार यांनी केलं असून गझल मंथन प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा गझलसंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे.
पुस्तकाचे नाव – मानसी (गझलसंग्रह)
गझलकारा:- मानसी जोशी
पृष्ठे – ११२
मूल्य – रू. २००/-
प्रकाशक – गझल मंथन प्रकाशन
विकास मधुसूदन भावे
------------------------------------------
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
------------------------------------------



0 Comments