Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. स्नेहल कुलकर्णी Mahila Gazal Sammelan

 तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी

 डॉ. स्नेहल कुलकर्णी


स्वागताध्यक्षापदी वैशाली माळी;
 ममता सिंधुताई यांना गझलक्रांती पुरस्कार


पुणे, (प्रतिनिधी) पुणे येथे गझल मंथन साहित्य संस्था आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी  ज्येष्ठ गझलकारा डाॅ. स्नेहल कुलकर्णी तर स्वागताध्यक्षा म्हणून गझलकारा वैशाली माळी यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात ज्येष्ठ गझलकारा ममता सिंधुताई यांना गझलक्रांती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.



     पुणे येथील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात दि.२२ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी या गेल्या सोळा वर्षापासून गारगोटी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मधून कार्यरत आहेत. त्यांचा 'ति'ची हा काव्यसंग्रह तसेच स्नेहांकुर हा वृत्तबद्ध काव्यसंग्रह, स्नेहांकित व दिशांतर हे गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा काव्यरसदा हा वृत्तबद्ध रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे. गझलरंग  व इतर राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना साहित्या सोबतच वैद्यकीय क्षेत्रातीलही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध कथा, कविता, ललितबंध यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या कविता, ललितलेख, गझल, व लघुकथांचे सातत्याने प्रसारण होते. त्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या गेल्या पाच वर्षापासून मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. लिहित्या हातांना बळ देऊन त्यांना सतत लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे बहुमूल्य काम डॉ. स्नेहल कुलकर्णी करीत आहेत.



    नव्या पिढीच्या नामांकित गझलकारा व पुणे विभाग सचिव वैशाली माळी यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा ज्योत्स्ना रजपूत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकारा श्रद्धा खानविलकर, गझलकारा निर्मिती कोलते, कौतिक दांडगे उपस्थित राहतील. या संमेलनात ज्येष्ठ गझलकारा ममता सिंधुताई यांना गझलक्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गझलकारा दिपाली कुलकर्णी व मानसी जोशी यांना गझलयात्री पुरस्कार देण्यात येणार आहे. अनुजा कौतिक दांडगे यांना गझलसखी पुरस्कार दिला जाईल. तसेच कै.जबनाबेन सोमजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहादा (जि. नंदुरबार) येथील सोहंम कोलाईड्स तसेच श्री शरद सोमजी पाटील व सौ. हेमलता शरद पाटील यांच्यातर्फे दिला जाणारा यंदाचा गझलध्यास पुरस्कार धाराशिव येथील गझलकारा स्नेहलता झरकर-अंदूरे यांना देण्यात येणार आहे. गझल संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझलमंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे, संमेलन समन्वयक प्रदीप तळेकर तसेच पुणे जिल्हा व विभागीय कार्यकारिणी केले आहे.

---------------------------------------

भरत माळी

प्रसिद्धीप्रमुख

गझल मंथन साहित्य संस्था


Post a Comment

0 Comments