🌷पुस्तक परिचय🌷
गझलयात्री - भाग ४ (मराठवाडा विभाग)
प्रातिनिधिक गझल संग्रह
रसिकहो नमस्कार,
"गझलयात्री" प्रातिनिधिक गझल संग्रह, भाग ४, मराठवाडा विभागाच्या परीक्षण/समीक्षण लेखाचा हा ३रा भाग आपल्या समोर सादर करतो आहे.
एखाद्या गझलकाराच्या वैयक्तिक गझल संग्रहाचे परीक्षण करणे, समीक्षात्मक लेख लिहिणे वेगळे आणि एखाद्या प्रातिनिधिक गझल संग्रहावर अशा प्रकारचा लेख लिहिणे खूप खूप वेगळे आहे आणि नेमकी हीच भावना माझ्या मनात या क्षणी राहून राहून येत आहे, पण हा ही एक अनुभव मला या प्रातिनिधिक संग्रहाच्या निमित्ताने मिळाला, घेता आला एवढे मात्र नक्की .....!
परळी येथील गझलकार श्री दिवाकर जोशी आपल्या आत्मचिंतनपर गझलेत म्हणतात की...
डोस प्रेमाचे मला हळुवार पाजा
वेदना आहे जरा नाजूक माझी ....
मानले असते स्वत:ला जर बरोबर
एकही झालीच नसती चूक माझी ....
तर तशाच प्रकारच्या दुस-या एका गझलेत हेच माझे 'हमनामी' दिवाकर जोशी म्हणतात की ....
जीवघेणे खूळ शोधत राहिलो
मी व्यथेचे मूळ शोधत राहिलो ....
शुध्दतेच्या फक्त होत्या वल्गना
मी उगाचच कूळ शोधत राहिलो ....
तर नांदेडच्या सौ दीपाली कुलकर्णी माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना सांगतात ....
तसे तर दिवस चार .... आयुष्य म्हणजे
तरी वाटते फार ..... आयुष्य म्हणजे ....
कुठे भेटल्या तेवत्या सौख्यवाती
कुठे फक्त अंधार .... आयुष्य म्हणजे ....
तर त्याच वेळी अंबाजोगाईच्या गझलकारा सौ निशा चौसाळकर माणसाच्या स्वभावाबद्दल लिहितात की ....
दया येउनी .... काऊला मग घरात घेते चिमणी
अता स्वत:ला काऊ घरचा मालक म्हणतो आहे ....
तर दुस-या एका गझलेत 'तखल्लुस' म्हणजे मक्ता वापरणा-या सौ निशा चौसाळकर म्हणतात ....
अताशा सुखाने कुठे झोपते मी
जमा स्वप्न झाले निशाच्या उशाला ....
असेच मक्त्यात लिहिणारे या नंतरचे गझलकार आहेत नळणी, ता.भोकरदन जि: जालना येथील श्री पंडित भिकाजी वराडे. शेतक-याचे, वारक-याचे म्हणजेच इथल्या अगदी सामान्य माणसाचे दु:ख, व्यथा आपल्या आराध्य दैवतासमोर मांडतांना, त्याला साकडं घालताना श्री पंडीतराव वराडे म्हणतात की ....
आहे जसा तसा घे पदरात पंडिताला
अंतीम ही मनीषा असणार पांडुरंगा ....
पाहून वाट थकले हे नेत्र पावसाची
पाऊस सांग केव्हा पडणार पांडुरंगा ....
तर आपल्या आसपास विचित्रपणे, तटस्थपणे वावरणा-या आपल्याच गणगोताकडे, आपल्याच भावकीकडे बघून ते म्हणतात ....
माणसे अशी कशी वागती विचित्रशी
पंडिता विचार हा जाळतो कधी कधी ....
अशाच एका सामाजिक प्रश्नांवर आणि आईच्या आपल्या लेकरावर असलेल्या प्रेमाबद्दल लिहिताना वसमत जि: हिंगोली येथील गझलकारा सौ प्रज्ञा कुलकर्णी-राज्ञी आपल्या गझलेत मुलांकडून अपेक्षा व्यक्त करतांना म्हणतात की ....
अनेक दुपटे ओले केले कधीच नाही तिने मोजले
नकोस आणू वेळ तिच्यावर पदराने अश्रू पुसण्याची ....
तर माणसाप्रमाणेच निसर्गातही असलेल्या गुण तसेच अवगुणांबद्दल बोलताना ....
युगांचे पेलुनी ओझे कली वादात आहे
मनुष्या पिंड तर स्वार्थी तुझ्या माझ्यात आहे ....
घरी पंखे कुलर एसी विकतचे तर बसवले
कळाले ना हवा मोफत उभ्या झाडात आहे ....
नियतीकडून दिला गेलेला भयंकर असा सगळा त्रास, सगळे दु:ख सहन करून झाल्यानंतरही आपल्या झुपकेदार मिशांमधून दिलखुलासपणे हसणारे, आपल्या दोन चिल्ल्यापिल्ल्यांचा त्यांच्या आईच्या माघारी सांभाळ करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणारे, मराठवाड्यातील जेष्ठ गझलकार आणि माझे जुने मित्र, तसे ते नांदेडचे पण सध्या पुण्यात वास्तव्यास असणारे श्री प्रफुल्ल कुलकर्णी समाजात दिसून येणारे भेदाभेद, गरीबी आणि श्रीमंतीमधील वाढत चाललेली दरी, भोगावे लागणारे दु:ख याबद्दल खंत व्यक्त करताना म्हणतात ....
पादुकांना पालखी
पाऊले रस्त्यावरी ....
तोंड वेंगाडे उगी
सोडलेली नोकरी ....
बाप होऊनी उभी
पोर आईच्या घरी ....
तर आपल्या दुस-या एका गझलेत जीवनाचे मर्म समजावून सांगतांना ते म्हणतात ....
फूल हाती लागले वा लागला काटा कधी
जीवनाने ठेविला ना राखुनी वाटा कधी ....
ओहटी-भरती प्रशांती जीवघेणी वादळे
गुंतुनी पडतात का हो यामधे लाटा कधी ?
मन सुन्न करणारी, विचार करायला भाग पाडणारी अशी ही गझल वाचून झाल्यानंतर आपल्याला वाचायला मिळते ती अशीच अजून एक दु:ख व खंत व्यक्त करणारी गझल, जी लिहिली आहे किनगाव येथील गझलकार बालाजी मुंडे यांनी ....
नसेल ज्याच्या खिशात खडकू त्यास विचारा
कसा जाचतो तंगीचा तो त्रास विचारा ....
आणि आपल्या या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आपल्या आराध्य दैवतास हाक मारतात आणि म्हणतात की ....
म्हणून माझी ऐक सावळ्या हाक जराशी आता तू
दाखव मजला तुझे रूप ते न्याय निवाडा करताना ....
असे दु:ख आपल्या अवती भवती अगदी रोज, सर्रास दिसत असले तरी खरे सुख कशात आहे हे सांगताना माजलगावचे बालाप्रसाद चव्हाण म्हणतात की ....
काही नसे खरी ती वाड्यात मौज मज्जा
शेती जमीन वाडी सुख हे गुरात आहे ....
तर दुस-या एका शेरात ते म्हणतात मोह, माया,धन आदिंमुळे माणसाचे भले होत नाही तर ....
कळावीच किंमत सुखाची कधीही
खरे मोल जाणा जुन्या अनुभवाचे ....
असा सल्ला सुध्दा द्यायला ते विसरत नाहीत आणि मग असेच जुने अनुभव, मागच्या काळातले जुने अनुबंध ह्या काळात आणले तर प्रेमातले भावनांचे गंध अजून वाहू लागतात असे सांगतात माझे मित्र, जेष्ठ गझलकार व शासन दरबारी जबाबदारीचे काम सांभाळलेले नांदेडचे श्री बापू दासरी ....
ते जुने अनुबंध आणू मागच्या काळातले
भावनांचे गंध अजुनी वाहती प्रेमातले ....
आरशाला तडकतांना पाहिले रागावुनी
पाहिले मी कैक माझे चेहरे माझ्यातले ....
तर अशाच अर्थपूर्ण पण गंभीर विषयावर लिहितांना मित्रवर्य गझलकार श्री बापू दासरी म्हणतात ....
बापाचा अर्थ कळाया जन्माचे थिजले डोळे
त्यागाचा देह चितेवर सरणाचे रडले डोळे ....
अस्थिंच्या आत जळाले भोगाचे शाप निराळे
बाबा या हाकेसाठी बाबाचे शिणले डोळे ....
श्री बापू दासरींचे हे शब्द अगदी हृदयाला जाऊन भिडतात कारण अंथरुणावर खिळलेल्या आपल्या काकांची सेवा करत असतांना मी एकदा प्रत्यक्ष श्री बापू दासरींच्या घरात हजर होतो. बापू दासरी यांना आयुष्यात आलेल्या अशा अनेक अनुभवांनंतर अगदीच कमी वयात असंख्य अनुभव घेतलेले परभणीचे एक युवा गझलकार महेश ज्ञानोबा होनमाने दुश्मनावर सुध्दा अशी वेळ येऊ नये असे सांगतांना लिहितात ....
जुन्या प्रेयसीचे समोरीच सासर
अशी वेळ येऊ नये दुश्मनावर ....
कुणी साथ नाही दिली हारताना
हजारो उभे सोबती जिंकल्यावर ....
तर समाजात कसे वागल्याने काय होते याबद्दलचा अनुभव सांगतांना धाराशिवच्या मीना महामुनी लिहितात की ....
शंका निघून जाते संवाद साधल्याने
नाते अभंग होते जोडून ठेवल्याने ....
जेंव्हा माणसाची माणसाला ओढ रहात नाही तेंव्हाचा अनुभव घेतल्यानंतर काय होते हे सांगत असतांना ....
शेणमातीच्या घरातच लेकरे घडली सुसंस्कृत
वाढल्या काँक्रिट भिंती कोण नाही आस-याला ....
असे अनेक अर्थपूर्ण शेर/व्दिपदी आणि दर्जेदार गझला लिहिणारे इतके सारे गझलकार मित्र आज माझ्या मराठवाड्यात गझल लेखन करत आहेत हे चित्र खूपच उत्साहवर्धक आहे व याचा मला खूपच आनंद होत आहे.
या प्रातिनिधिक गझल संग्रहातील गझलांसाठी वापरलेला फाॅन्ट चांगल्या मोठया आकारातील असल्यामुळे गझला वाचतांना डोळ्यांना त्रास होत नाही ही या प्रातिनिधिक गझल संग्रहाची आणखी एक जमेची बाजू आहे असे म्हणावे लागेल.
दर्जेदार गझला, कसदार शेर, गझल लेखन करणा-या गझलकार मित्रांची भली मोठी संख्या आदि गोष्टींचा विचार करता या गझल संग्रहाच्या परीक्षणाचा आणखी एक भाग लिहावा लागेल असे मला वाटू लागले आहे. तर मग भेटूतच लेखाच्या पुढच्या म्हणजे चौथ्या भागात ..... (क्रमश:)
संग्रहाची माहिती ....
पुस्तक: "गझलयात्री" प्रातिनिधिक गझल संग्रह भाग ४ मराठवाडा विभाग
संपादक: श्री जयवंत भा वानखडे, सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना जि: चंद्रपूर
प्रकाशक: श्री जयवंत भा वानखडे, गझल मंथन प्रकाशन, कोरपना (भ्रमणध्वनी: ९८२३६४५६५५
अक्षर जुळणी व मांडणी: श्री अनंत देशपांडे
मुद्रक: रचना ऑफसेट प्रिंटर्स, पुणे
मुखपृष्ठ: श्री साईनाथ फुसे
संग्रहाचे मूल्य: ३५० रुपये
दिवाकर चौकेकर
गांधीनगर (गुजरात)
मोबाईल: 9723717047
------------ ------------ -----------



0 Comments