Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी गझलेचे नवनीत : मराठी गझल आकृती आणि आशय Ashok Wadkar

                    🌹पुस्तक परीक्षण🌹

मराठी गझलेचे नवनीत :  मराठी गझल आकृती आणि आशय
VVK


मराठी गझलेचे नवनीत :
मराठी गझल आकृती आणि आशय 



----------------------------------------------------------------


गझल हा काव्यप्रकार मुळचा अरबस्थानातील! तो अरबी भाषेतून फारसी भाषेत रुजला. फारसी भाषेत बहरून त्यास स्वत:चा असा वैशिष्ट्यपूर्ण चेहरा मिळाला. तुर्की भाषेतही तो आढळतो. तिकडच्या प्रदेशातून गझल भारतात आली ती सुमारे ४०० वर्षापूर्वी बाल्यावस्थेत असलेल्या उर्दू ह्या अस्सल भारतीय भाषेत! उर्दू भाषेत तर ती अशी व्यापून उरली, की गझलेशिवाय उर्दू भाषेचा विचारच करता येत नाही. त्यानंतर ती पंजाबी, सिंधी, पश्ती, हिंदी व हिंदीच्या बोलीभाषांतही लिहिली जाऊ लागली. गुजराती भाषेमध्ये ती गेल्या दशकभरात स्थिरावली. मराठीत हा काव्यप्रकार माधव जुलियनांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विविध उर्दू गझलवृत्तांतील सलग मराठी कवितेच्या स्वरुपात आणला. मूळ गझल या काव्यप्रकाराशी वैशिष्ट्यपूर्ण नाते सांगणारी मराठी गझल ख-या अर्थाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मुलखात गझलसम्राट सुरेश भटांनी रुजवली. विजा घेऊन येणा-या पुढील पिढीत तिचा प्रसार व प्रचार करून ती मराठीत रुजवण्यासाठी त्यांनी अवघे आयुष्य वेचले. अभ्यासपूर्ण विशुद्ध अशी "गझलेची बाराखडी" लिहून ती नव्या दमाच्या गझलकारांच्या पिढ्यांपुढे त्यांनी मार्गदर्शनार्थ खुली केली. या बाराखडीमुळे मराठी गझलेचा आकृतिबंध निश्चित केला गेला. 


उर्दू गझलेच्या तंत्राबाबत काही बाबी सखोल आणि तपशीलवार समजून घेऊन मराठी गझल लेखनाकडे वळावे लागते. त्यामधील काही बाबी मराठीत अव्यवहार्य ठरतात. परिणामत: नंतरच्या काळात काही मान्यवर मराठी गझलकारांनी स्वीकारण्याजोग्या बाबी उर्दूतून अभ्यासपूर्वक स्वीकारल्या व त्यांचा डोळसपणे अंगिकार केला. बाराखडीनंतर स्वीकारलेल्या अशा नियमांच्या लिखित स्वरुपातील नोंदी वेळोवेळी अनेक अभ्यासकांनी केल्या असल्या तरी त्यांचे एकत्रीकरण आजवर झालेले आढळत नाही. ही उणीव भरून काढण्याचा यथाशक्ती व प्रामाणिक प्रयत्न म्हणजे वैवकु (वैभव वसंतराव कुलकर्णी) लिखित "मराठी गझल आकृती आणि आशय" हे संकलनात्मक पुस्तक. ही माहिती संकलित करताना लेखकाने मराठी आणि उर्दू गझलेच्या तंत्रासंबंधातील वाचनात आलेली पुस्तके, लेख आणि अनुभवी मंडळींशी वेळोवेळी झालेल्या चर्चा ह्यांचा प्रामुख्याने आधार घेतला आहे. शिवाय लेखकाने आपली निष्पक्षपाती, अचूक ठरतील अशी, अभ्यासपूर्ण व्यक्तिगत मते व निरीक्षणेही यामध्ये प्रामाणिकपणे नोंदवली आहेत.


मराठी गझलेचा आकृतिबंध मांडताना मराठीची धाटणी, बाज, व्याकरण आणि मराठी काव्याची समृद्ध परंपरा विचारात घेऊन उर्दू गझलेचे व तिच्या नियमांचे अंधानुकरण टाळण्याचा प्रामाणिक विवेकशील प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.


आजच्या मराठी गझलेच्या संदर्भातील असलेले भिन्नभिन्न मतप्रवाह पाहता उर्दू गझलेच्या आकृतीबंधाची तांत्रिक अंगे पचवून आशयसमृद्ध सौष्ठवपूर्ण अभिव्यक्तीसाठी नियमांचे सर्वंकष व स्वीकारार्ह असे प्रमाणिकरण होणे ही काळाची गरज वाटते. त्याकामीही हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.


पुस्तकाची मांडणी प्रकरणांनुसार अधिकाधिक तपशीलाच्या अंगाने अत्यंत मुद्देसूद व सहजसुंदर अशी केली असल्याने विषयाच्या आकलनात कोठेही अडचण येत नाही.


पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व कलात्मक असून ग्रंथाची निर्मितीही छान आहे. गझलेसंबंधातील माहितीपूर्ण परिशिष्टे, शब्दसूची व संदर्भसूची यांमुळे पुस्तकाचे संदर्भमूल्य वधारले आहे.


गझल लेखनास आवश्यक त्या तांत्रिक बाजू, सुटी, सवलती, त्रुटी, दोष,, मतप्रवाह, संदर्भ, प्रकार इत्यादी बाबी यथोचित उदाहरणांसह स्पष्ट करणारे हे पुस्तक गझल अभ्यासकांसाठी व नव्याने गझल लिहू पाहणा-यांसाठी दिशादर्शक नवनीत ठरेल यात तिळमात्र शंका नाही.



पुस्तकाचे नाव - मराठी गझल आकृती आणि आशय

लेखक - वैवकु

प्रकाशक- समग्र प्रकाशन, तुळजापूर 

पृष्ठे - १७६, मूल्य - ₹ २००/-



अशोक म. वाडकर

कोल्हापूर

मो. ७०२०० ११४०८



_________________________________________

 

🌹 *साहित्य पाठवा* 🌹


गझल मंथन साहित्य संस्थेने स्वतंत्र ब्लॉग सुरु केला आहे. या माध्यमातून गझल, लेख, पुस्तक परीक्षण आदी साहित्य प्रकाशित करण्यात येते. साहित्यिकांनी आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.



संयोजक:

भरत माळी 

गझल मंथन साहित्य संस्था

मो. 9420168806

_________________________________________ 

Post a Comment

0 Comments