• गझल प्रभात • (भाग ४८)
![]() |
Gazalkar Anil Kamble |
🌹चंद्रा 🌹
तिचा चेहरा तू खुलवतोस चंद्रा
कशाला असे रोज छळतोस चंद्रा
तुझे पाड तू बिंब पाण्यात आता
उगा मासळीला झुलवतोस चंद्रा
मलाही तुझे दुःख सांगून बघ तू
असे एकटा काय झुरतोस चंद्रा
तुलाही भुरळ घातलेली असावी
अचानक दुपारीच दिसतोस चंद्रा
अजुनही असे बाळ जागेच माझे
कशाला ढगाआड लपतोस चंद्रा
तुला चांदण्यांची शपथ घालतो मी
कसे काय रात्री हरवतोस चंद्रा
जरा पाहुनी काजव्यांच्या वराती
किती आतल्या आत जळतोस चंद्रा
तुला वाटते मान आहे तुझा पण
शिवाच्या शिरी भार असतोस चंद्रा
असे रंगली रास का सावळ्याची
म्हणूनच निळाशार दिसतोस चंद्रा
अनिल कांबळे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments