पुण्यात १९ नोव्हेंबर रोजी गझल मंथन साहित्य संस्थेचे अ.भा. महिला गझल संमेलन
पुणे, दि. १३ महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन, पुणे येथे दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी गझलक्षेत्रात प्रथमच महिला गझलकारांचे अखिल भारतीय महिला गझलसंमेलन आयोजित केले आहे. या गझल संमेलनाला महाराष्ट्रासह देशभरातून महिला गझलकार उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाला अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ गझलकारा शोभा तेलंग (इंदौर) तर स्वागताध्यक्षा म्हणून डॉ. स्नेहल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून उर्मिला बांदिवडेकर, डॉ. संदीप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे आणि संस्थेचे सचिव जयवंत वानखडे उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ गझलकारा देवका देशमुख यांना गझलक्रांती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संमेलनात गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल अमृत दिवाळी अंक आणि गझलयात्री मालिकेतील तिसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाचे सूत्रसंचालन गझलकारा वैशाली माळी करतील. या संमेलनात एकूण सहा मुशायरे होतील. त्यात देशभरातील नामांकित महिला गझलकार आपल्या गझला सादर करणार आहेत. संगीता जोशी, रत्नमाला शिंदे, श्रद्धा खानविलकर, डॉ. मीना सोसे, सुनीती लिमये, उत्तरा जोशी ह्या ज्येष्ठ गझलकारा मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. तर सूत्रसंचालन प्राजक्ता पटवर्धन, यशश्री रहाळकर, अमृता जोशी, रजनी निकाळजे, सरोज चौधरी आणि विजया नवले करतील.
गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, पुणे विभाग प्रमुख प्रदीप तळेकर, उपप्रमुख डॉ. मंदार खरे, सचिव वैशाली माळी, पुणे जिल्हाध्यक्ष बा. ह. मगदूम व पुणे जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
_____________________
भरत माळी
प्रसिद्धीप्रमुख, गझल मंथन साहित्य संस्था
मो. 9420168806

0 Comments