🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹गझलचे अंतर -घटक (सविस्तर)🌹
(एलेमेंट्स ऑफ गझलl)
![]() |
Gazalkar R B Bharswadkar |
या लेखात आपण गझलचे घटक (एलेमेंट्स) या बद्दल समजून घेणार आहोत. गझलमध्ये खालील पाच अंतर घटक असतात. उर्दू शब्दांच्या साहाय्याने हे घटक व त्यांचा अर्थ समजाऊन घेऊयात.
अंदाजे बयाँ .
अंदाजे या उर्दू शब्दाचा बोली भाषेतला अर्थ,पद्धती, खुबी, वैशिष्ट्य, (स्टाईल) , खासियत ई. तर बयाँ या उर्दू शब्दाचा अर्थ, व्यक्त करणे, अभिव्यक्ती, मांडणी, (एक्सप्रेशन ऑर मॅनिफेस्टेशन ) ई. (इंग्रजी शब्द येथे मुद्दाम देत आहे, कारण कुठून का होईना, अर्थ कळाल्याशी आपला मतलब आहे.)
हे आपले 'शिक्षण' (एज्युकेशन) चालू आहे. या ठिकाणी, मला स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाची व्याख्या सांगाविशी वाटते. ती अशी - एज्युकेशन कॅन बी डिफाईंड ॲज मॅनिफेस्टेशन ऑफ लेटेंट . (अव्यक्ताला व्यक्त करणे म्हणजे शिक्षण).
आता, अंदाजे बयाँ म्हणजे व्यक्त करण्याची , गझलकाराची आपली स्वताहाची वैयक्तिक स्टाईल किंवा खुबी.
आता प्रत्येक कवीचा स्वभाव, प्रकृती, भिन्न असते. त्याच्या स्वभावानुसार त्याची व्यक्त करण्याची पद्धती असते, आणि तिच त्याच्या गझलेच्या स्टाईल वरून लक्षात येते. या स्टाईल शब्दासाठी आपण मराठी शब्द 'लकब' असा वापरू शकतो.
उदाहरणार्थ, एखादा कवी 'तिरकस " स्वभावाचा असतो, त्याला प्रेमच व्यक्त करायचे असते, पण बघा तो गझलेतून कसा व्यक्त करतो ते -
जान लेनी थी, ले लिये होते
मुस्कुराने की क्या जरूरत थी ।
ही झाली तिरकसपणाची पद्धत. आता विनय, अनुनय, अजिजी, मार्दव, लालूनचांगुल करण्याची पद्धती -
आप कहे और हम ना सुनाये, ऐसे तो हालात नही,
एक ज़रासा दिल है धडका, और तो कोई बात नही ।
आता, रोखठोक, व्यवहारी पद्धतीने व्यक्त होणारी 'बयाँ " (स्टाईल) , -
मै समझता था, उन्हे मुझसे महब्बत होगी ।
वो समझते थे, मेरी जेब मे पैसा होगा ।
-पागल अंसारी.
आता, आपल्या लक्षात हा गझलेचा पहिला आंतरघटक, अंदाजे बयाँ म्हणजे, गझल सांगण्याची आणि अभिव्यक्तिची खुबी. 'कहते है के ग़ालीब का अंदाजे बयाँ ही कुछ और था ।' असे काहीसे म्हटले आहे.
यासाठी, नवीन गझल शिकणार्यांनी, आपल्या स्वताहाच्या खुबीनुसार गझल लिहावी. आता काही जण, असे म्हणतील की, आमच्यात कुठे अशी खुबी आहे ? तर मानसशास्राचा अभ्यासक म्हणून मी शंभर टक्के खात्रीने सांगतोय की, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ना एक सद्गुण असतो, म्हणजे असतोच. जर, माझा मलाच तो दिसला नाही, तर, खुशाल समजावे की, माझी सद्गुण ओळखण्याची पात्रता कमी पडत आहे. खरी गरज आहे ती पात्रता (अॅबिलिटी) वाढवण्याची, न की क्षमता (कॅपॅसिटी) वाढवण्याची. आपल्याला जमत नसेल तर जवळच्या मित्रांना विचारा , ते सांगतील तुमच्या मधील खुबी, /हुनर/शैली, म्हणजेच थोडक्यात काय तर तुमच्या स्वभावाची जडण-घडण इत्यादी.
विनाकारण, प्रसिद्ध कविंच्या गझलांचे अनुकरण न करता, आपल्या स्वतःचा 'अंदाजे बयाँ' लेहेजा, स्टाईल, शैली, व्यक्त करण्याची खुबी शोधा, आणि मग बघा, तुमची गझल ही, 'तुमचीच ' गझल आहे, हे इतरांनाही समजेल. सुरवात तर करा, गझलेच्या समुद्रा, खोलवर गोते खाण्यासाठी, शेवटी, आपलाच 'जिगर' कामाला येतो.
या भागाचा शेवट मी असा करतो की, प्रत्येक कवीच्या मनात, त्याचा 'अंदाजे बयाँ ' असतोच, तो सुप्त स्वरूपातील अंदाजे बयाँ, व्यक्त करण्याच्या पातळीवर यावा, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.
गझलेचा दुसरा आंतरघटक
हुस्ने ख़याल
आता आपण गझलेचा दुसरा आंतर घटक, 'हुस्ने ख़याल' बद्दल समजून घेऊया.
हुस्न म्हणजे सौंदर्य आणि ख़याल म्हणजे विचार. तेव्हा हुस्ने ख़याल याचा अर्थ विचारांचे सौंदर्य. काही मराठी प्रेमी याला सौंदर्य विचार असे म्हणतात. पण ते चुकीचे असू शकते. कारण यात सौंदर्याला प्राधान्य दिले जाते, म्हणून विचारांचे सौंदर्य असे म्हणणे योग्य आहे, कारण यात विचारांना प्राधान्य आहे. त्या विचारातील सुंदरता गझल लिहिताना कवी आपल्या प्रतिभाशक्तिच्या कल्पनाविलासातून मांडत असतो. थोडक्यात सांगायचे तर, गझलकाराच्या कल्पनाविलासातून आलेला सुंदर विचार म्हणजे, 'हुस्ने ख़याल '.
हा कल्पनाविलास कवीच्या सर्जनशिलतेतून (यालाच नवनिर्माण किंवा क्रियेटिव्हिटी असे म्हणतात.) आलेला असतो, जो आजवर कुणीही गझलेच्या शेर मधून यापुर्वी कधीच मांडलेला नसतो.
एक उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करतो.
1) धूप के ऊँचे-निचे रस्तों को
एक कमरेका बल्ब क्या जाने ।
2) तुमने देखा है किसी मीरा को मन्दिर मे कभी,
एक दिन उसने ख़ुदासे इस तरह माँगा मुझे ।
3) झिल मिलाते है किश्तियों में दिये....
पूल खड़े सो रहे है पानी में ।
वरिल तिन्ही शेर बशीर बद्र यांच्या 'उजाले अपनी यादों के ' या ग़ज़ल संग्रहातील आहेत. त्यांच्या 'आस' या ग़ज़लसंग्रहाला 'साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. जगातल्या महान व्यक्तिंपासून ते रिक्षेवाला, ट्रकवाला, हमाल, मजूर ई. सामान्य माणसेही त्यांच्या या 'हुस्ने ख़याल ' मुळे त्यांचे चाहते होते. याचे कारण म्हणजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील दर्द-भरे क्षण, त्यांचा राग-द्वेष हे त्यांच्या ग़ज़लेतील विचारातून व्यक्त होत होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी बशीर बद्र यांच्या गझला मुशायरा मध्ये प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत. असो.
आता मराठी गझलातील 'हुस्ने ख़याल ' पाहुया. गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझलेतील हुस्ने ख़याल म्हणजेच क्रियेटिव्हिटीतून व्यक्त झालेले विचारांचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे. जशी समुद्राची खोली अथांग असते, तशी त्यांच्या विचारांची उंची मोजण्याची मोजपट्टी अजून निर्माण व्हायची आहे.
याची स्थळमर्यादे अभावी मोजकीच चार-पाच उदाहरणे देतोय -
1) सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो.
2) उत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो !
3) मला येतात भूमीतून हाका
ऊठे सीता नव्या रामायणाची.
4) साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ?
5) माझ्या पराभवाची समजूत घातली मी
जे वार खोल गेले , ते यार मानले मी.
आता थोडेसे निरूपण, नवीन गझल लिहायला शिकणार्यांसाठी. क्रिएटीव्हिटी म्हणजे सर्जनशिलता, नवनिर्माण शक्ती, किंवा, आता मी जो शब्द लिहिणार आहे, तो शब्द बरोबर म्हणता येणार नाही, लक्षात येण्यासाठी, 'कल्पनाशक्ती 'प्रत्येकात ऊपजत असते. आता डे मानसशास्र सांगतो. आपल्या मेंदुचे दोन भाग असतात. आपला डावीकडचा पन्नास टक्के मेंदू हा 'मॅथेमॅटिकल ईंटेलिजन्स ' म्हणजे गणिती बुद्धीशी संबंधित असतो व उजवीकडचा पन्नास टक्के मेंदू हा 'क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स ' म्हणजे, नवनिर्माण बुद्धीमत्तेशी संबंधित असतो. या दोन्हितला फरक म्हणजे, गणिती बुद्धिमत्ते मध्ये 'लाॅजिक' असते तर नवनिर्मिती संबंधी बुद्धिमत्तेमध्ये 'लाॅजिक ' म्हणजे तर्कशास्र नसते. लाॅजिक हे सायन्स आॅफ रिझनिंग आहे, जिथे तर्कशुद्ध (रॅशनल) वेल रिझन्ड (कारण मिमांसा ) असते. उदा. 2x2 = 4 हे गणिती बुद्धिमत्तेने प्रमेयासह सिद्ध करता येते. याला आपल्या दैनंदिन भाषेत 'व्यवहारी ज्ञान ' असे म्हणतात.
आता आपण क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स बद्दल थोडक्यात पाहूया. यासाठी सर्वांना माहित असलेले उदाहरण देतो. न्यूटनने झाडावरून सफरचंद पडताना पाहिले, आणि त्याची कल्पनाशक्ती (क्रिएटिव्हिटी) जागी झाली आणि त्याने गुरूत्वाकर्ण शक्तिचे नियम शोधून काढले. (लाॅ ऑफ ग्रॅव्हिटी). आता तुम्ही साधा विचार करा की, न्युटनच्या अगोदर हजारो लोकांनी सफरचंद झाडावरून पडताना पाहिले असणारच की ! मग त्यांना का नाही गुरूत्वाकर्षणाचा शोध लावता आला ? याचे ऊत्तर असे आहे की, ईट वाॅज दि क्रिएटिव्ह जिनियस आफ द न्युटन, हू ईन्व्हेंटेड लाॅ आऑफ ग्रॅव्हिटी. गझलकार हा असाच सर्व सामान्यांच्या, मानवी मनातील अव्यक्त भावनांना आपल्या गझलेच्या शेर मधून, व्यक्त करत असतो, तेंव्हा रसिक, वाचक , श्रोता ऊसळून दाद का देतो, तर त्यांच्या सूप्त भावनाच कवी आपल्या क्रिएटिव्हिटीतून व्यक्त करित असतो. ही वाहव्वा, ही दाद म्हणजे , 'मेरे मू की बात छिन ली यार तुने ' असेच त्यांना म्हणायचे असते. असो.
या सर्जनशिलते मध्ये जेव्हा सकारात्मकता असते तेव्हा ते विश्वगान ठरते. पसायदान हे त्याचे उदाहरण. हा आशावाद आपल्या गझलेतून यावा यासाठी हा लेखनप्रपंच. या लेखाचा शेवट' बशीर बद्र यांच्या या माझ्या अत्यंत आवडणार्या गझलेतील एका 'शेर' ने करतो -
कभी मैं अपने हाथों की लकीरों से नही उलझा,
मुझे मालूम है क़िस्मत का लिक्खा भी बदलता है ।
गझलेचा तिसरा आंतर घटक मौसिकी
आता आपण गझलेचा तिसरा आंतरघटक " मौसिकी " या बद्दल समजून घेऊया. यापुर्वी आपण गझलेचे दोन आंतरघटक पाहिलेत, मौसिकी म्हणजे संगीतमयता, गेयता, रागदारीवर आधारित ज्याला इंग्रजीत ' मेलडी ' किंवा 'मेलोडियस' असे म्हणतात.
रागदारी , शाम-ए-ग़ज़ल - ज्यात गायकी आणि मौसिकी यांचा संगम झालेला असतो. साज़ (वाद्ये) आणि आवाज (गायक) यांच्या संगमातून गझल जेव्हा श्रोत्यांसमोर सादर केली जाते, तेव्हा श्रोत्यांच्या दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटातून गझल विजेसारखी चमकत राहते. म्हणून गायक हा नेहमी उत्तम आणि प्रसिद्ध गझलांच्या सतत शोधात असतो.
यामध्ये, काही गायक हे स्वतः गझलेला चाल लाऊन गझल गायन करतात , तर काही गायक दुसर्या संगितकाराने संगीतबद्ध केलेल्या गझला ध्वनीमुद्रित अल्बम साठी गात असतात.
ज्या काळात प्रसिद्धी माध्यमे कमी होती किंवा नव्हती, त्या काळात मुशायर्यातून शायर आपल्या गझला स्वतः सादर करायचे, जे आजही चालू आहे. या मैफिली रात्री असायच्या. त्या काळात मेणबत्ती (शमा) गझल सादर करणार्या शायर समोर ठेवण्याची प्रथा होती.' आता मी आपल्या समोर माझी एक गझल सादर करतो,' असे म्हटल्या बरोबर, समोर बसलेले सर्व श्रोते मोठ्याने 'ईर्शाद 'असे म्हणून गझलकाराला प्रोत्साहन द्यायचे. यामुळे एक सुंदर वातावरणनिर्मिती (माहौल) तयार व्हायची.
गझल सादर करण्यापुर्वी गझलकार काही 'शेर' (स्वताहाचे किंवा इतरांचे किंवा गझल गुरूंचे प्रभावी शेर सादर करून प्रचंड दाद मिळवत व मग वातावरण निर्मिती झाली की, आपली गझल सादर करित असत.
ज्यांच्या गझलेत 'हुस्ने ख़याल' असतो अशा गझला लिहिणारे गझलकार उच्च दर्जाचे समजले जायचे, तर ज्यांच्या गझलांमध्ये, 'मौसिकी' म्हणजे संगीतमयता अधिक असायची, अशा गझला, गझल गायकांच्या मैफिलीत श्रोत्यांची वारंवार दाद मिळवत असत. आमची एक गझल गायलीच पाहिजे, असा आग्रह रसिक श्रोते करत व आपल्या चाहत्यांची ही मागणीही (फर्माईश ) गझल गायक मोठ्या प्रेमाने करतात. ही परंपरा आजही चालू आहे.
पुढील काळामधे हळुहळू, छापील माध्यम, ध्वनी माध्यम, ध्वनी-चित्र माध्यम, डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मिडिया यांनी गझलेचे क्षेत्र बहरून आले. गझलांच्या रेकाॅर्ड्स पासून ते कसेट्स, सी.डी.ज, डिव्हिडी, यांचा काळ सुरू झाला, आणि सामान्य माणुसही गझलेकडे आकर्षित झाला. आता डिजिटल तंत्रज्ञानाने तर कळस गाठला आहे. या सर्वांचा परिणाम गझलचे वाचक व श्रोते मोठ्या प्रमाणात वाढण्यावर झाला. नव्या ईलेक्ट्राॅनिक सोशल मिडियाने, मागच्या काही महिन्यात विशेषत: लाॅकडाऊनच्या काळात, बहारदार धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. या पुढे ऑनलाईन सादरीकरण ही वाढत जाणार आहे. आता स्वदेशी 'नमस्ते भारत" हे ॲप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. इंटरनेटचे जाळे सर्वदूर ग्रामीण भागापर्यंत पसरत आहे, हे गझलेला बरे दिवस येण्याचे संकेत देत आहेत. ई-गझल संग्रह, ई-गझल पुस्तके, ई-गझल मासिके, यांचे स्वागत होत आहे.
अनेक अल्बम मधून आता 8 डी ऑडिओ,16 डी आॅडिओ व त्या पुढील व्हर्जन्सची गाणी/गझला या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.
म्हणून या काळात 'मौसिकी' गझल लिहिणारे गझलकार खरोखरच भाग्यवान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पुढे येणार्या युगाच्या , म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) च्या उंबरठ्यावर आज जगाने प्रवेश केला आहे. कदाचित भविष्यात आपण लिहिलेल्या मौसिकी गझलेला संगणकिय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगीतबद्ध केले जाईल.
या मौसिकी गझलसाठी गझलकाराला शास्त्रीय संगीताची जुजबी ओळख असल्यास चांगले. उदाहरणार्थ, मैफिलीच्या शेवटी "भैरवी " हा राग सादर करून मैफिल संपन्न होते. गझल गायन मैफिलीत भैरवी रागातूनच गझल सादर केली जाते. ही गझल निरोपाची गझल असते. गंभीर स्वरूपाची असते. निसर्गशक्तीची आळवणी करणारी असते किंवा विश्व कल्याणाचे, मानवाच्या मंगलतेचे, कल्याणाचे , सर्व जन सुखी व्हावेत , सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत अशी दान / दुवा मागणारी असते. आयुष्याचे सार , तत्वज्ञान , अध्यात्मिक विचार (सुफी) मांडणारी असते.
अशा उत्तमोत्तम ' मौसिकी ' गझल लिहिण्यासाठी तुम्हाला आत्मप्रेरणा मिळो, अशी त्या परमेश्वर चरणी प्रार्थना .धन्यवाद.
गझलचा चौथा आंतरघटक
तसव्वुफ (मारिफत)*
आता आपण गझलेचा चौथा आंतरघटक , ज्याला 'तसव्वुफ ' किंवा मारिफत असे म्हणतात तो पाहू.
तसव्वुफ म्हणजे, अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा अध्यात्मिक विचारांची चुणूक. हे समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला , 'शेर' मधील दोन बाबी समजून घेतल्या पाहिजे. त्या म्हणजे, शेर मधील , 'दावा ' आणि 'दलील '. गझलचे एक खास वैशिष्ठ आहे, ते म्हणजे , प्रत्येक शेर मध्ये 'दावा'-'दलील' असते. 'दावा ' म्हणजे प्रस्तुतीकरण. प्रस्तुतीकरण याला इंग्रजीत 'स्टेटमेंट ' असा शब्द असून यालाच 'विधान' किंवा 'दावा पेश करणे' असे म्हणतात , आणि 'दलील' म्हणजे , त्या दाव्याचा खुलासा , ज्याला इंग्रजीत "एक्सप्लेनेशन' असे म्हणता येईल. आपण हिंदी चित्रपटात जेंव्हा कोर्टाचा प्रसंग पहात असतो, तेव्हा जजसाहेब वकिलाला असे म्हणतात की, 'तुम्हारे ईस दावे को पुख्ता बनानेके लिए और ऐसे कोई दो 'दलील' पेश करो. आता आले का लक्षात की, "दलील' म्हणजे , शेरच्या पहिल्या ओळीत केलेल्या दाव्याचा खुलासा.
हा खुलासा, त्या शेर ला असा काही कलाटणी देतो की, रसिकाच्या गणिती बुद्धिमत्तेला एक धक्कातंत्र अनुभवास येते. आता, एक अत्यंत महत्वाचे गझलच्या अंतरंगाचे रहस्य सांगतो, ते असे की, 'दावा' आणि 'दलील' मध्ये, विरोधाभास किंवा चमत्कृती, प्रभावीपणे निर्माण करण्याचे धक्कातंत्र ज्याला जमले, तो यशस्वी गझलकार होतो , कारण वाचकाला किंवा श्रोत्याला, ते भावते, पटते, त्यातला विचारांचा वेगळेपणा लक्षात येतो , आणि तो उसळून दाद देतो.
गझलेच्या शेर मधून, हा दावा आणि दलील जेव्हा अध्यात्मिक ज्ञानाची झालर लाऊन येतात , तेव्हा, गझलेचा हा चौथा घटक 'तसव्वुफ ' , गझलेला अशा एका उंचीवर घेऊन जातात की रसिक अगदी हरखुन नतमस्तक होतात.
आता याची काही उदाहरणे बशीर बद्र यांच्या गझलांमधील काही शेर पाहू -
1) उजाले अपनी यादोंके हमारे साथ रहने दो ,
न जाने किस गली मे ज़िन्दगी की शाम हो जाये ।
2) मुझे इश्तिहार-सी लगती है, ये मोहब्बतों की कहाँनिया ,
जो कहा नही वो सुना करो , जो सुना नही वो कहा करो ।
3) दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो ।
4) मैं तो आँसुओं का सुकूत हूँ लबे शेर मुझको सदा
न दे
न 'कबीर'हूँ, न 'नज़ीर' हूँ , न मैं 'मीर' हूँ , न
'बशीर' हूँ ।
वरील बशीर बद्र यांच्या चार शेर मधून , 'तसव्वुफ' (मारिफत) म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा चुणूक लक्षात आली असेल.
आता, मराठी गझलेत, गझलसम्राट सुरेश भटांनी , केवळ मराठी गझलच नाही, तर एकूण 'गझल' या काव्य प्रकाराला एका मोठ्या उंचीवर नेले आहे. या पुर्वी मी त्यांच्या गझलेतील शेर ची अनेक उदाहरणे दिलेली आहेत, आता 'तसव्वुफ' ची काही उदाहरणे पाहू -
1) संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला ।
2) मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला ।
3) मी असा त्या बासरीचा सूर होतो
जीवनाला मीच नामंजूर होतो.
4) गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.
5) जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
6) आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा ..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला !
7) आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?
सारांश असा की, गझलेचा आंतरघटक, तसव्वुफ ( मारिफत ) , गझलेला अध्यात्माच्या पालखीत बसऊन गझल-दिंडी काढण्यासाठी आहे , त्या वारीतून गझलपंढरी गाठण्यासाठी शुभेच्छा.
गझलचा पाचवा आंतरघटक - नुदरत
'नुदरत ' म्हणजे 'नाविन्य '.हे गझलचे खास वैशिष्ठ्य आहे . नाविन्य म्हणजे नवेपणा. कवी असे काही तरी शेर मधे मांडतो , की ते वाचकाला / श्रोत्याला , एकदम नवीन कल्पना, नवीन विचार ,नवीन संकल्पना , नवी प्रक्रिया , नवी प्रतीक्रिया , नवा शोध , नवी भूमिका , किंवा नव्याने वेगळा अर्थ जाणवतो.
आता , नाविन्य म्हणजे काय , याचा थोडा खोलात जाऊन विचार करू या . हा 'नवेपणा' काही 'नवा' नसतो. तो कदाचित 'जुना' ही असू शकतो , पण कवी आपल्या प्रतिभाशक्तिने , तो इतरांपेक्षा अधिक 'प्रभावशाली' पद्धतीने मांडतो , त्यात नवेपणा असतो. हा जो शोध आहे तो असा की, ईनाॅव्हेशन ईज अॅन आयडिया , थाॅट , आॅर प्रोसेस , व्हिच ईज ' परसिव्ह्ड ' अॅज न्यू बाय द ईंडिव्हिज्युअल .' याचा अर्थ असा की, एखादी बाब जेव्हा एखाद्या व्यक्तिला पहिल्यांदा 'जाणवते ' ( टू परसिव्ह मिन्स टू फील) , ते त्या व्यक्ती साठी " नाविन्य " (नुदरत) असते.
आता याचे सोपे उदाहरण देतो, म्हणजे उलगडा होण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, "हृदयारोपण " ( हार्ट ट्रान्सप्लांटिंग ) ही संकल्पना , एखाद्या मुंबई सारख्या महानगरात राहणार्या माणसाला ऐकून माहित असू शकते , दुर्गम ग्रामीण भागातल्या माणसाने हे नाव कधीच ऐकलेले नसेल व जेव्हा तो पहिल्यांदा हे नाव ऐकेल , तेव्हा त्याच्यासाठी हे 'नवीन' असेल. संकल्पना एकच , पण एका साठी ती जुनी असेल , तर दुसर्यासाठी ती नवीन असेल. म्हणून 'नाविन्य' (ईनाॅव्हेटिव्हनेस ) ची ही संकल्पना , 'सापेक्ष ' (सबजेक्टिव्ह ) आहे.
म्हणून , गझलच्या 'दावा' (प्रस्तुती) नंतर , शेर ची जी दुसरी ओळ असते , त्या ओळीत , 'खुलासा ' (दलील) अशी काही खुबीने मांडलेली असते , की रसिकाला 'जाणवते ' हे काहीतरी 'वेगळेपण' आहे. हे 'जाणवणे ' (परसेप्शन ) म्हणजे , 'नाविन्य '.
ही ' जाणीव ' (फिलिंग) , भावनांशी (ईमोशन्स) निगडीत (रिलेटेड) असते.'भावना ' (ईमोशन), म्हणजे, एखाद्या व्यक्तीची किंवा कोणत्याही जिवंत घटकाची (आॅर्ग्यानिझम) 'विचलीत ' (डिस्टर्ब्ड स्टेट) स्थिती असते.
आता, या भावनांची काही उदाहरणे पाहूया.
आनंद , दु:ख , चीड ,प्रेम, राग, मत्सर, द्वेष, मोह, मद, लोभ ई. यांचा संबंध, ' गझल लिहिताना गझलकार आपल्या शेर च्या पहिल्या ओळीत 'दावा' (प्रस्तुतीकरण) करतो, तेव्हा वाचक/श्रोत्याच्या मनात 'ऊत्सुकता' किंवा 'उत्कंठा ' निर्माण करतो, आणि शेर च्या दुसर्या ओळीत जेव्हा 'दलील' (खुलासा) सादर (पेश) करतो, तेव्हा त्याच्या विशिष्ट भावना, प्रतीक्रियेच्याशा स्वरूपात, अशा काही अचानक उफाळून येतात की, त्याच्या तोंडून, 'वाहव्वा ' व अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारी 'दाद' आपोआप बाहेर पडतेच. कारण त्यातले' नुदरत' (नाविन्य) त्याला खूप भावलेले असते.
सुरेश भटांचे शेर, ऊदाहणा दाखल पाहू.
दावा : ऊत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
( या ओळी मुळे, मनामध्ये उत्सुकता सहजपणे निर्माण होते की, 'मग उत्तरे दिली कोणी ? आणि आता हा कवी , प्रश्न विचारणार तरी कोणाला ? आणि मग भट साहेब 'दलील ' (खुलासा) , दुसर्या ओळीत काय पेश करतात ? ते आपण आता आपण पाहुया -)
दलील : प्रश्न प्रेतांना विचारू लागलो ।
(यात 'दलील' (खुलासा) , अनपेक्षित व नाविन्यपुर्ण (नुदरत) असल्यामुळे भावना ऊचंबळून नाही आल्या तर नवलच म्हणावे लागेल. अनेक शेर, जे सुरेश भट आणि बशीर बद्र यांनी ,'नुदरत' असलेले लिहिले आहेत.. तुर्तास एवढेच..
प्रा. डाॅ. रे. भ. भारस्वाडकर
छ. संभाजीनगर
मो. 9730093331
__________________________________
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
__________________________________
0 Comments