Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उत्कृष्ट शेरांचा मागोवा- एक विचारधारा Gazalkara Dr Snehal Kulkarni

 🌼 दिवाळी विशेष 🌼

उत्कृष्ट शेरांचा मागोवा- एक विचारधारा
Gazalkara Dr Snehal Kulkarni 


उत्कृष्ट शेरांचा मागोवा- एक विचारधारा


बोलीभाषेशी जास्तीत जास्त जवळीक साधणारी, वास्तववादाला शोभणारी आणि थेट व स्पष्ट अभिव्यक्ती करणारी रसिकांची आवडती काव्यविधा म्हणजे गझल...!!

दांभीक विचारांचा, विचारधारेचा.. मर्मभेदी उपहास करतानाही ती भाषेची प्रासादिकता जराही डळमळू देत नाही, हरवू देत नाही.. हे तिचे वैशिष्ट्य तिच्या आणखीनच प्रेमात पाडते.एखाद्या उत्कृष्ट शेराचे मूळ पाहताना, त्याचे अधिष्ठान जाणून घेताना.. ते अर्थातीत शब्दघटकांपासून निरनिराळ्या दिशांना विस्तारत जाताना दिसते. प्रभावी काव्यरूपात्मक उपहास, विरोध, अ - भाव, बौद्धिक आशय, स्पष्ट वास्तवाला भिडणारी गद्य- शैली, रचनेतील तार्किकता... इ. अनेक महत्वाचे थांबे या चक्राकार टप्प्यावर आढळतात.


     अगदी प्रारंभिक अवस्थेत प्रेमपाशात अडकलेली स्वयंकेंद्री, व्यक्तिवादी गझल... व्यापक सामाजिक जाणीवा अर्थगर्भतेसह मांडताना दिसते. समाजावर, राष्ट्रावर, ध्येयावर, मानवतेवर... ती उत्कटतेने लिहिते. विचारघन आशय, रचनाचातुर्य याबरोबरच साधे सोपे साद घालणारे शब्द... यामुळे रसिकही आजच्या उत्कृष्ट शेरांवर,गझलेवर लुब्ध आहेत.क्वचित वेळा शेरातून बोधपरता, रूक्ष वैचारिकता.. यांचे दर्शन घडत असले तरी आशयगर्भतेमुळे तिचा अंतिम प्रभाव सफल होताना दिसतो.


......कोणत्याही काळात लिहिलेला एक उत्कृष्ट शेर आशयातून व अभिव्यक्तीतूनही वर्तमानकाळाशी थेट संवाद साधण्याची प्रवृत्ती व ताकद अंगी बाणतो कारण त्याचे मर्म.. आत्मभावना असते.. जे कालातीत असते.शेर आजचा असला तरी अनुभव कालचे, आदिम कालापर्यंतचे आणि स्थलकालाच्या सीमा भेदून जाणारे असू शकतात. काव्याचे वास्तव व वास्तवाचे काव्य करण्याची क्षमता त्यांच्यात असते. वास्तवाची बोलकी अभिव्यक्ती.. म्हणून अशा शेरांकडे पाहता येते.Present, Past आणि Future... हे काळाचे तीन बिंदू एकमेकांजवळ आणून किंवा एकमेकांपासून दूर करूनही पुन्हा वर्तमानाशी नव्या संदर्भात जोडणारी ही .. अभिव्यक्ती शेराचे अभिजात वैशिष्टय बनून जाते. एक अमूर्त भावचिंतन मूर्त व्हायला उत्सुक आहे... अशी संवेदना सातत्याने अशा शेरातून जाणवत राहते... पसरत राहते...!!


सौंदर्यवादी वृत्ती, अस्तित्वनिष्ठता आणि सामाजिक वास्तव... स्वीकारणारी प्रतिभा असणारे गझलकार एक वेगळंच रसायन असणारे शेर पेश करतात. त्यांच्या मनातील गाढ श्रद्धा, पूर्णतेची ओढ, सौंदर्याचे आकर्षण, परखड शैली यांबरोबरच शब्दांविषयी असणारा नितांत आदर.... शेराच्या काही वेगळ्याच छटा घेऊन येतो.शुभघटक अवास्तव म्हणून नाकारून वास्तवाच्या नावाखाली कुरूप, घृणास्पद असत्य उजागर न करता आभासातील हळवेपणा, नखरेलपणा, तरलता, स्वप्नील भावनाप्रधानता यातून सत्य वास्तवभूमीवर आणून ते स्पष्ट,धीट व कणखर बनवणारे हे खयाल, हे शेर.... अजरामर झाले नाहीत तर नवल...!!


वास्तवात ध्येयवादाचे, सकारात्मकतेचे, काही अंशी स्वप्नरंजनाचे फिके रंग मिसळून.. येणारे शेरही आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. वास्तवावर कल्पनेचा कृत्रिम साज न चढवता, त्यात भावनेचे भडक रंग न भरता.. सत्यातील आभासमय सृष्टी रसिक वाचकांसमोर प्रभावीपणे मांडणारे हे शेर नक्कीच दाद मिळवून जातात कारण त्यांच्या स्वप्नील भावविश्वात वास्तववादाच्या स्पष्ट खुणा जाणवतात पण ह्या खुणा मनाला हादरवून टाकत नाहीत कारण त्याभोवती सुकोमल वेष्टन असते...!!


सामाजिक कटुता अनुभवणे व त्याचा जिवंत आविष्कार करणे... हा देखील काही शेरांचा विशेष असतो. अशा वेळी तीव्र भावना, उत्कट जाणिवा प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात.अशा खयालात श्रीमंत -गरीब, राजा - शिपाई, व्यापारी- मजूर ..कोणीही नायक बनू शकतो. इथे सुंदर -कुरूप, चांगले -वाईट, शुभ -अशुभ, मनभावन- घृणास्पद, सफल- विफल प्रेम या साऱ्यांना समान जागा दिली जाते. सत्य अंधाऱ्या, धूसर भूतकाळातून प्रकाशात आणलं जातं अथवा प्रकाशातील आभासमय धागा काळोखात नेला जातो.

असे शेर कटू वास्तवाचा एक अथांग पट....उलगडत चालल्याचे जाणवते. सामाजिक कटुतेमुळे शब्दात उतरलेली उद्विग्नता... अशा शेरांना काहीसा गूढ गाभारा प्रदान करते... जो रसिकांना ओढ लावतो...!!


'आपण माणसाविषयी आणि माणसासाठी लिहिणारे आहोत.. अशी ठाम भूमिका घेऊन लिहिणारे काही उत्कृष्ट गझलकार आहेत. वास्तव कुरूप असो किंवा सुंदर असो.. कोणत्याही कृत्रिम सजावटीशिवाय, आहे त्या खुणेसकट.. त्यांना गझल प्रवाहात आणण्याचे धाडस अशा गझलकारांच्या शेरांमधून.. उदघृत झालेले दिसून येते.प्रत्यक्षरूप वास्तव नेहमी उणीवांनी किंवा व्यंगाने युक्त असते..ह्या संकल्पनेला / कल्पनेलाच इथे छेद दिला जातो आणि अतिवास्तववाद टाळला जातो.अगदी सहजपणे असे शेर अंतरमनाला ढवळून काढण्यात यशस्वी होतात.


काही शेरात वास्तवाचे सोललेले रूप गवसते. भूतकाळाच्या अंधारात किंवा भविष्यकाळाच्या धुक्यात... आपण वास्तवापर्यंत पोहोचू शकत नाही.. ही खंत त्यांच्या खयालातून जाणवते, नेमकेपणाने अभिव्यक्त होते... लक्षणीय आशयासह ही खंत काळजाला हात घालते..!!


गझलकार जी जीवनदृष्टी स्वीकारतो ती कळत, नकळतपणे त्याच्या शेरातून प्रतिबिंबीत होत राहते. कधीकधी त्यात दोन विचारप्रवाहांची सरमिसळ अपरिहार्यपणे व्यक्त होते. अशा दुहेरी जाणिवा, संवेदनाही.. वैचारिक धारा बनून शेरात उतरत जातात.त्यातून जे दुभंगलेपण समोर येते ते देखील कधीकधी अंतरात्मा उजळून टाकते...!!


आणि.. तरीही ज्याला जसे जाणवेल तसे शेराचे स्वरूप असते. रसिकाला, वाचकाला होणारी ही खयाल- जाणीव त्याच्यावर झालेल्या विविध संस्कारांनी घडवलेली, घडलेली असते. एखाद्या गोष्टीमागच्या प्रत्येकाच्या काही कल्पना, संकल्पना असतात.. ज्या भिन्न असू शकतात. प्रत्येकाची एक मूल्याधिष्ठित सापेक्षता असते आणि मूल्ये परिवर्तनशील असतात.त्या मूल्यांचा हवाला देऊन.. शेराचे विश्लेषण केले जाते व त्यातून रसिकाची एक धारणा तयार होत असते.त्यामुळे एकाच शेराचे वेगवेगळ्या कंगोऱ्यातून नवनवीन अर्थ निघू शकतात, तिचे आकलन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते.


    शेरांचे हे आविष्कार म्हणजे शेर कोणते रूप घेऊन येऊ शकतो याचा वेध... केवळ एक मागोवा आहे, हे शेराचे मूल्यमापन नाही.एखाद्या खयालाचे.. शेरात विकसित झालेले स्वरूप अभ्यासणे इतकाच यामागचा उद्देश आहे...!!


 काहीही असलं तरी अत्युत्कटतेने बाहेर पडलेली कोणतीही अभिव्यक्ती शेराला उजळून टाकते, मनाआडच्या मनाचा शोध घेते हे निश्चित...!!


    

डॉ. स्नेहल कुलकर्णी

गारगोटी

मो. 9922599117


_____________________________

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था.

______________________________

Post a Comment

0 Comments