• गझल प्रभात • (भाग १०८ )
🌹पराचा कावळा होतो🌹
असा ना एकदा वा दोनदा, तो सारखा होतो
तुला पाहून माझा का गुलाबी चेहरा होतो..?
किती दिवसांमध्ये आलेच नाही चित्त था-यावर
प्रितीच्या सागरामध्ये मनाचा भोवरा होतो
नितळ तो वाहत्या पाण्याप्रमाणे वाटतो केव्हा
कधी मी पाहता डोळ्यात त्याचा आरसा होतो
अशी शोधून जागा साथ माझी सोड आयुष्या
जिथे पोचून मृत्यू ही सुखाचा सोहळा होतो
शिवाची भग्नमूर्ती बंद दारी पाहुनी कळले
कसा भक्तांविना तो देव येथे पोरका होतो
नको नात्यात देऊ संशयाला तू कधी जागा
मनी संदेह असला की पराचा कावळा होतो
किती लपवूनही लपणार नाही भेट दोघांची
इथे नजरा नजर झाली तरीही गवगवा होतो
व्यथेला फक्त औषध लागते स्वाती असे नाही
मनाचे दुःख ओसरले तरी रोगी बरा होतो
डॉ. स्वाती भद्रे आकुसकर
नांदेड
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments