• गझल प्रभात • (भाग १३५ )
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹तुला कळला कधी नाही 🌹
तुझ्यासाठीच झुरलेला तुला कळला कधी नाही
तुझ्यावर जीव जडलेला तुला कळला कधी नाही
नशीला सापळा होता तुझ्या डोळ्यात मायावी
कुणी तेथे अडकलेला तुला कळला कधी नाही
सखे खुणवायचो जेव्हा तुला शेरामधुन माझ्या
इशारा त्यात लपलेला तुला कळला कधी नाही
किती आतूर होतो मी तुला भेटायच्यासाठी
तुझ्यासाठी हरखलेला तुला कळला कधी नाही
तुला जाईजुई कळली तुला प्राजक्तही कळला
बहावा पण बहरलेला तुला कळला कधी नाही
सहज तू सोडला जेव्हा कधीचा हात धरलेला
कुणी आजन्म तुटलेला तुला कळला कधी नाही
कधी तू भाळली होतीस ज्या एकेक गझलेवर
'दिगंबर' त्यात दडलेला तुला कळला कधी नाही
दिगंबर खडसे
अकोट , जि. अकोला
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments