Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

'समाधी'तून गझलेकडे Gazalkar Badiujjama Birajdar

 🌹पुस्तक परिचय 🌹

'समाधी'तून गझलेकडे


🌹'समाधी'तून गझलेकडे🌹



     समाधी हा शब्द एकाग्रतेशी निगडित आहे. समाधीवरच साधना सर्वस्वी अवलंबून असते. ध्यानधारणेतही समाधीला मौलिक स्थान आहे. कोणत्याही कलेची साधना करताना समाधी अवस्थेत जाणे तितकेच महत्त्वाचे असते. कलावंत जोपर्यंत समाधी अवस्थेत जावून साधना करत नाही तो पर्यंत त्याची साधना फळास येत नाही. समाधीत तल्लीनता असते. तल्लीनता शिगेला पोहोचली की अप्रतिम कलाकृती जन्मास येते. समाधी आणि गझल यांचा निकटचा संबंध आहे. कारण गझललेखन सुद्धा एक प्रकारची साधनाच असते. मनाच्या समाधीतूनच गझल खऱ्या अर्थाने सिद्ध होत जाते.


     वाशिमचे सिद्धहस्त गझलकार चंद्रशेखर भुयार यांचा 'समाधी' हा गझलसंग्रह ठाणे येथील अष्टगंध प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. हा गझलसंग्रह मांडणी, धाटणी विषय आशयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो वाचकांचे लक्ष सहजी वेधून घेतो. वास्तविक भुयार हे शालेय जीवनापासूनच कविता लिहीत असत. परंतु पुढे महाविद्यालयीन जीवनात सुरेश भट यांचा 'एल्गार' हा गझलसंग्रह त्यांच्या वाचनात आला. तेव्हा पासून ते दिसलेच्या प्रेमात पडले. गझलेला वाहून घेतले. गझलेला गळ्याशी लावले. त्यानंतर मात्र त्यांना कविता लिहावी असे वाटेनासे झाले. गझल हीच त्यांची सोबतीण झाली. सातत्यपूर्वक त्यांच्या गझलेचा प्रवास सुरू झाला. एकदा का गझलेची जादू लक्षात आली, गझलेचा प्रभाव मनावर गडद होत गेला की गझलकार गझलेपासून अलिप्त राहणे अशक्यप्राय होऊन जाते. भुयार यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. भुयार यांच्या गझल लेखनास 'एल्गार' चे अधिष्ठान असल्याने त्यांच्या गझलेचा दर्जा गझलेची प्रतिष्ठा उंचावणारा आहे. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

     गझलकर हा कधीच योगायोगाने गझल लिहीत नाही. गझलेची एक अदृश्य शक्ती आधीपासूनच त्याच्या मनात मूळ धरत असते. ही शक्ती ही ऊर्जा तेव्हा अनावर होते. तेव्हा गझल लेखनास सुरुवात होते. हे स्पष्ट करताना भुयार असा शेर लिहितात.


भेटणे माझे तुझे हा फक्त योगायोग नव्हता

एक ती अदृश्य शक्ती कार्यरत होतीच आधी


     गझललेखनाची तहान भागत नाही. ती समुद्रासारखी अथांग असते. जमीन जशी पावसासाठी आसूसलेली असते. तसेच गझलकाराचे होत असते. त्या मनातून प्रतिभेची बरसात होत असते.


तुझ्याप्रमाणे तहानलेली, इथे कधीची जमीन आहे

तुझ्यात पाऊस धुंद आहे, ऋतू हवासा भरात आहे


     गझल म्हणजे नुसता शब्दांचा सांगडा नसतो. उत्तमोत्तम शेरांची गझलेची प्रधान मागणी असते. जे लिहायचे आहे, जे द्यायचे आहे. रसिकांच्या पदरात टाकायचे आहे ते उत्कृष्ट असले पाहिजे असा गझलेचा दंडक आहे. त्यासाठी व्यासंग वाढवावा लागतो. दुसऱ्यांच्या गझला आधी वाचाव्या लागतात. रसिकांना गझल मनोहारी वाटली पाहिजे. हे गझल निर्मिकाचे दायित्व असते.


तुला जे द्यायचे उत्कृष्ट ते तू दे

गझल जी वाचता वाटे मनोहारी


     जी पाखरे उडून जातात ती पुन्हा परतून येत नाहीत असे कधी घडत नाही. पाखरेही माणसाळलेली असतात. पाळलेल्या पाखरांना पिंजऱ्याचा लळा असतो. ती उंच आसमंतात झेपावली तरी ती आपली नेहमीची वाट कधीही चुकत नाहीत. आपला फक्त दरवाजा खुला ठेवण्याची खरी गरज असते. ती समजून घेतली पाहिजे, असे भुयार यांना वाटते.


जी उडाली पाखरे ती परतुनी येतील

ठेव दरवाजा खुला तू पाळलेल्या पिंजऱ्याचा


     जीवनावर लागलेला डाग जेव्हा पूर्णपणे जळून जातो तेव्हा माणूस निष्कलंक होतो. पण त्यासाठी दिव्यातून जावे लागते. मनात सदा पेटलेली होळी ठेवावी लागते. त्या होळीत डागाची राख होऊन जाते. मनात सदैव धगधगती होळी पेटती ठेवणे हे स्वच्छ, पारदर्शी जीवनासाठी नितांत निकडीचे ठरते. असा आशय पुढील शेरातून व्यक्त होतो.


मी ठेवतो आत माझ्या, होळी सदा पेटलेली

बघ एकही डाग नाही, माझ्यातल्या माणसाला


     माणसाला सदैव नावीन्याचा ध्यास हवा. भूतकाळाला कवटाळून बसण्यात अर्थ नसतो. मळलेल्या रस्त्याने जाण्यात काय हाशिल? कालचा रस्ता सोडून नव्या रस्त्याने चालता आले की नवे काही गवसत असते. नवा काळ पुढ्यात येतो. हा नव्या विचारांचा हा शेर पाहा.


चालण्याचा सोड रस्ता कालचा तो

पाय काळाचे घे आता धावण्याला?


     मुळात माणूस हाच चुकांचा पुतळा आहे. चुकणे हा त्याचा गुणधर्म आहे. म्हणून कुणाच्याही चुकावर बोट ठेवता कामा नये. कुणाच्या चुकीचा बोभाटा करू नये. नाहीतर कटुता वाढत जाते. माणसे दुरावतात या जगात जो चूपचाप बसतो. त्याचाच शेवटी निभाव लागतो. याकडेही भुयार यांचा शेर लक्ष वेधतो.


सांगू नका कुणाला.. चुकला कुणी जराही

जो चूपचाप बसतो त्याचा निभाव आहे


     पोटात भूक असताना चंद्राचे स्वप्न पाहण्यात अर्थ नसतो. भुकेल्या अवस्थेत स्वप्नास कात्री लावणेच इष्ट ठरते. माणसाची भूक सनातन आहे. ती स्वप्नापेक्षा मोठी असते. उपाशीपोटी स्वप्नात रममाण होता येत नाही. ही जीवनातली सत्यता आहे.


पोटात भूक असता स्वप्नास लाव कात्री

बोलावतो कशाला.. चंद्रास मध्यरात्री


     आपला जुना यार जेव्हा पशूगत वागतो. तो वर्षानुवर्षाच्या मैत्रीत आपली फसवणूक करतो तेव्हा खऱ्या मित्राला जीवघेणा त्रास होतो. परंतु आप मतलबी मित्राला याचे काहीच देणे घेणे नसते. असे यार यारीवरच कलंक ठरतात. मैत्रीचे धागे हळवेपणानेच जपायला हवेत पण व्यवहारी जगात असे घडत नाही. जिंदगी हरून जाते. याराने केलेल्या फसवणुकीचा हा शेर हीच कथा सांगतो.


फसवितो रे मला यार माझा जुना

हारल्यासारखी वाटते जिंदगी


     शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजना म्हणजे नुसता बकवास असतो. अशा योजनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यांच्या नशिबी बारमाही दुष्काळच असतो. योजनांनी घोषणांनी दुष्काळ काही संपत नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा या शेरातून येते.


योजना तुमची किती बकवास आहे

आमुचा दुष्काळ बारोमास आहे


     देशात समता, बंधुता नांदावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना बहाल केली. परंतु विषमता आजही तग धरून आहे. जात माणसांची पाठ सोडत नाही. जातीचे उच्चाटन करण्यासाठी पोकळ भाषणबाजी करून चालणार नाही. खरी गरज आहे ती जागोजागी राज्यघटना पेरण्याची. राज्यघटना सखोल रुजली की, समता बंधुता डोलायला लागेल. असा विश्वास भुयार यांना वाटतो.


लागेल समता बंधुता डोलायला

घेऊ चला राज्यघटना पेरायला


     प्रस्तुत गझलसंग्रहात एक वऱ्हाडी गझलही आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.


उघड रे जीवना आता तुहे कोडे

अबे चालून-चालुन फाटले जोडे


     चंद्रशेखर भुयार यांची गझल सामाजिक अंगाने अधिक फुलत जाते. 'समाधी'तून गझलेकडे असा त्यांचा गझल प्रवास आहे.



गझलसंग्रह: समाधी

गझलकार: चंद्रशेखर भुयार

अष्टगंध प्रकाशन, ठाणे

पृष्ठे: १४८ मूल्य: ३००₹





बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments