Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दीवान-ए-प्रशांत Badiujjama Birajdar

🌹 पुस्तक परिचय 🌹



🌹दीवान-ए-प्रशांत🌹



   उर्दूत शायरांच्या परिपूर्ण गझलसंग्रहास दीवान असे संबोधण्यात येते. उर्दूत दीवान प्रसिद्ध करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु कालखंड लक्षात घेतला तर ही परंपरा फार मोठी आहे, अशातला भाग नाही. खुदाबख्श ओरियंटल लायब्ररी (पाटना)च्या अभिलेखाप्रमाणे उर्दूत एकुणात ७६ दीवान असल्याचे सांगण्यात येते. उदाहरणादाखल दीवान-ए-मीर, दीवान-ए-गालिब, दीवान-ए-दाग, दीवान-ए-मोमीन अशी प्रमुख नावं सांगता येऊ शकतात.


     मराठीतील गझलकार प्रशांत पोरे यांचा दीवान-ए-प्रशांत हा दीवान उर्दूच्या धर्तीवर सर्व नियमांचे, बारकाव्यांचे काटेकोरपणे पालन करून एक परिपूर्ण पहिला वाहिला दीवान सिध्द करण्यात आला आहे. उर्दूतील आलिफ, बे, ते पासून ए पर्यंत सर्व अक्षरांची यात ठेवण असते. विशेषतः यात सर्व आद्याक्षरांचा वापर केलेला आढळून येतो. 'दिवान-ए-प्रशांत'ची मांडणीदेखील आपणास उर्दू शायरांच्या जुन्या काळात घेऊन जाणारी आहे. मुळाक्षरांनुसार रदीफ, काफियांचा अचूक वापर, शायरीतील वैविध्यपूर्ण नजाकत, आशयघनता याबाबतीतही दिवान-ए-प्रशांत वाखाणण्याजोगा आहे. मराठी गझलेतील हा पहिला मुकम्मल दीवान कौतुकास्पद ठरावा असाच आहे. गझलेविषयीची दिवानगी निर्माण झाल्याशिवाय 'दीवान' निर्माण होत नाही. याचा दणकट प्रत्यय दिवान-ए-प्रशांत वाचताना येत राहतो.


     मुळातच गझल हा काव्यप्रकार अवघड, किचकट असा आहे. गझल लिहिणे हे जिकरीचे अन् जोखमेचे काम आहे. जोखमेचे यासाठी की, गझलेच्या मतल्यातील रदीफ, काफियामध्ये चूक झाली की पुढे गझलेचा सर्व ढाचाच चुकत जातो. आशयाच्या दृष्टीने गझल कितीही संपन्न, सधन असली तरी तंत्राच्या उल्लंघनाचा शिक्का त्यावर बसतोच. म्हणून गझल हा काव्यप्रकार ताऱ्यावरची नव्हे तर तंत्रावरची कसरत आहे. ज्यांच्यात प्रतिभेसह जिद्द व चिकाटीचा कस लागतो. हा शब्दांचा खेळ गझलेच्या नियमावलीसह खेळण्याची हातोटी लागते. अशानाच गझल खऱ्या अर्थाने वश होते. गझल कुणालाही वारशात नाही मिळू शकत. गझल लिहिणे हा निराळा छंद आहे. यासाठी निरातीश कष्ट उपसावेच लागतात. गझलेतील जी अंगभूत अस्सल ताकद आजवर टिकून राहिलीय ती यामुळेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी गझलेतील पहिला मुकम्मल दीवान सिद्ध करण्यासाठी प्रशांत पोरे यांनी घेतलेले अपार कष्ट, दाखविलेली जिद्द मला जेवढी महत्त्वाची वाटते त्याबरोबरीनं दीवान-ए-प्रशांत तेवढाच आश्वासक वाटतो.


     कविता ही कवीशी आतून-आतून संवाद साधत असते. म्हणजे तिचं आतून धुमसणं असतं. धुमसण्यातून उमलणं सुरू झालं की कवितेला नक्की रूप येत जातं. नवी पालवी फुटत जाते. कवीचं असं धुमसणं असो वा कवितेचं उमलणं असो कवीला यांच्या आंतरिक झळा अन् कळा सोसाव्या लागत नाहीत असं कधीच नाही घडत. कवी हा त्या निर्मितीच्या प्रक्रियेचा निव्वळ घटक नसतो तर तो तिचा जनकच असतो. ही निर्मितीची प्रक्रिया आतली असल्यानं ती अधिक वेदनादायी असते. तिच्या दुःखाचा दरवळ अधिक गहिरा असतो. प्रशांत मोरे म्हणतात.


जेव्हा आतून धुमसत असते

नक्की कविता उमलत असते


     पापण्या अन् आसवांची भेट झाली की, गोठलेल्या भावनांना पुन्हा जाग येणं क्रमप्राप्त असतं. कितीही नाही म्हटलं तरी आसवांची तोरणं पापण्यावरतीच बांधलेली असतात. ही भेट का झाली पुन्हा, असा सवाल कवीला पडला असला तरीही गोठलेल्या भावनांना पुन्हा जागं करण्याची प्रक्रिया सुरूच असते. हे मुळातून समजून घेणं अगत्याचं असतं.


गोठलेल्या भावनांना जाग का आली पुन्हा?

पापण्या अन् आसवांची भेट का झाली पुन्हा?


     चाफा बोलेना, चाफा चालेना ही चाफ्याची पुराराणीच रीत आहे. त्याच्या अंतरातील दुःख कुणालाच दिसत नाही, बोलत नसल्यामुळे त्याची वेदनाही कुणाला कळत नाही. त्याच्या खिन्न वाटण्याचं, उदास दिसण्याचं कारण अदिम असलं तरी ते डोळ्यांना सहज जाणवणारं नसतं. सल खूप आतली कि तिचा वरून ठाव घेणे मुश्कील असतं. परंतु बोलण्यात अन् सांगण्यातही बोलण्या-सांगण्याच्या पलीकडची चाफ्याची ही शोकांतिका असावी! त्या शोकांतिकेलाही बोलकं करण्याचा प्रयास गझलेच्या प्रयोजनातूनच करावा लागतो.


खिन्न वाटतो, उदास दिसतो, बोलत नाही चाफा

कुणी छेडले वा रागावले, सांगत नाही चाफा


     माणूस हाच प्रशांत पोरे यांच्या गझलांचा प्राणबिंदू आहे. त्यांच्या प्रत्येक गझलेतून त्यांच्या प्रांजळ भावना प्रकट झाल्या आहेत. बोजड शब्दांचे अवडंबर न माजवता त्यांची गझल सोबत्यांशी अलवार हितगूज करणारी आहे. अलवारपणे गूज करण्याचं सामर्थ्य गझलेत असतं. मायेच्या माणसाजवळ मन हलकं करताना आपण जितक्या मोकळेपणानं गप्पागोष्टी करतो तितकाच गझलकार गझल लिहिताना मोकळा होतो.


कधी होऊनही जाते गझल अलवार एखादी

तशी राहूनही जाते गझल अलवार एखादी


     माणसांच्या जिंदगीचा क्षणाचा भरवसा राहिलेला नाही. तरीही माणूस जीवघेण्या स्पर्धेच्या युगात बेफाम धावत-पळत सुटलाय्. त्याची जिंदगी इतकी वेगवान झालीय् की त्याला कशाचं भान उरलेलं नाही. त्याला नेमकं काय हवं तरी काय हेही ठाऊक नाही. त्याची नुसती धावाधाव सुरू आहे. त्याचा सोस जिंदगीलाच धोक्यात आणणारा ठरत आहे. तरीही नादान माणूस सर्वकाही मलाच हवंय्. या राक्षसी लालसेने धावत सुटलाय्. यावर गझलकाराचं भाष्य येतं ते असं.


जेवढी वेगात आहे जिंदगी

तेवढी धोक्यात आहे जिंदगी


     तरही गझल हाही एक गझलेचा प्रकार आहे. यामध्ये मतल्यात शायराला दुसऱ्या शायराची पहिली ओळ देण्यात येते. त्याला उला मिसरा म्हणतात. कधी मतल्यातील दुसरी ओळ दुसऱ्या शायराची देण्यात येते. त्याला सानी मिसरा म्हणतात. एकदा का मिसरा अन् अन् सानी मिसरा निश्चित झाला की मग तोच रदीफ, कफिया जमीन (अलामत) बरहुकूम शायराला गझल पूर्ण करावी लागते. मुशायऱ्यांमध्ये ऐनवेळी उपस्थित प्रेक्षकांसमोर उला किंवा सानी मिसरा जाहीर करण्यात येतो. तरही गझल हा प्रकार शायरांच्या प्रतिभेला आव्हान देणारा आहे. त्याची सत्वपरीक्षा घेणारा आहे, कसोटी पाहणारा आहे. यात गझलकार आपला खरे किंवा खोटेपणा लपवूच शकत नाही. 'दूध का दूध पानी का पानी' जे काही असेल ते समोरासमोर होऊन जाऊ दे अशी ही विधा आहे. उर्दूत तरही गझल मुशायऱ्याची फार मोठी परंपरा आहे. मराठीत तरही गझल मुशायरे फारसे होत नसले तरी काही गझलकारांनी तरही गझला लिहिलेल्या आहेत. या दिवानमध्ये प्रशांत पोरे यांच्या अनेक तरही गझलाही आहेत. हे विशेष.


उदाहरणादाखल पाहा:


     (तरही गझल-मतल्यातील उला मिसरा सुरेश भट यांचा)


अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही

मी भाबडाच आहे, टाकीत डाव नाही


    (मतल्यातील सानी मिसरा रमेश सरकाटे यांचा)


अजून कोवळेच दान मागते उन्हास ती

फितूर पावसात या थरारते कशास ती


    (मतल्यातील सानी मिसरा वैवकु, वैभव कुलकर्णी यांचा)


करावी लागते होळी जुन्या कोत्या विचारांची

सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची


     इश्क, दर्द, स्वप्न, दोस्ती, दुश्मनी, प्रतीक्षा, रुसवा, प्रेम, विरह, हुरहूर अशा विविध प्रकारची गझल महासागरातील ही 'प्रशांत' वादळे आहेत. या दिवानमधील काही गझला काहीसा तिरकपणा घेऊन व्यंग अन् उपहासाच्या वाटेनं जाणाऱ्या असल्या तरी त्यात सामाजिक परिपक्वता आहे.



दीवान-ए-प्रशांत (मराठी गझलसंग्रह)

गझलकार: प्रशांत पोरे

प्रकाशक: गझलपुष्प पिंपरी-चिंचवड

पृष्ठे: २०० मूल्य:२२५ रुपए




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी) 

Post a Comment

0 Comments