Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल साधनेची ‘समाधी’ Prakash Kshirsagar

🌹पुस्तक परिचय 🌹




🌹गझल साधनेची ‘समाधी’🌹



गझल म्हणजे एक प्रकारची साधना असते. गझलेची तंद्री लागली की, साधकाची समाधी लागते. त्याची साधना सफल होते. अशी समाधी लागणे हे साधकाचे महत्त्वाचे साध्य असते. चंद्रशेखर बी. भुयार यांचा ‘समाधी’ हा गझलसंग्रह त्याचीच प्रचिती देतो. त्यांनी गझलेची साधना  गेली अनेक वर्षे केली, त्याचे हे फलित आहे. 

स्टेट बँकेत अधिकारी असलेले श्री. भुयार यांनी महाविद्यालयीन जीवनात सुरेश भट साहेबांचा एल्गार वाचून ते गझललेखनाकडे वळले. 

ते म्हणतात, 


समुद्र सारा पिण्यास घे तू , नको कोठे बुडून जाऊ 

समुद्र मंथन कराया बुडायचे आत आत आहे । 


किती साधा सरळ शेर आहे. समुद्र मंथन करायचे तर वर पर काठावर राहून कसे चालेल. तर त्याच्या अंतरंगात शिरावे लागेल. 


गिलास खाली तसाच आहे तसाच खाली शराबखाना 

अता समाधी मिळेल कैसी, उदास आत्मा उरात आहे 


आत्मा उरात उदास असल्यावर समाधी कशी साधणार असा त्यांचा प्रश्न आहे. 


धावतो फुलपाखरांच्या तू उगा मागे कशाला 

इंद्रधनुची भव्यता बघ, रंगही रेखीव आहे 


जग भलत्याच्या मोहात तिसरीकडेच धाव घेते. रंगीत फुलपाखरांच्या मागे धावतो कशाला इंद्रधनुतही अनेक रंग आहेत, ज्यांचा आस्वाद एका जागी बसून घेता येतो. ते रेखीव रंग न्याहाळत बस असे ते म्हणतात.


 काढले पाणी कितीही पण चिखल बाकीच आहे 

पावसाला सांग जा तू … सुप्त मी राजीव आहे 


कितीही तळ ढवळला आणि पाणी काढून टाकले तरी चिखल बाकी उरतोच ना. पावसा तू कितीही पडला तरी मी चिखलात फुलणारे कमळ आहे. दुःखाच्या राड्यातही मी सुखी राहतो. 

लुटणाऱ्यांना हात जोडून चालत नाही. म्हणून ते निक्षून सांगतात 


जोडून हात आता भरणार पोट नाही 

तू देव मानलेले, आले तुला लुटाया 


त्यांना देव मानले तरीही ते तुला लुटणारच असे म्हणतात. 

एका शेरात ते म्हणतात 


घेतले हाती दगड जर … राहूद्या येतील कामी 

अर्पितो आहे, समाधी, काळ हा संजीव आहे 


अखेर काळच संजीव असतो. तो सजीवाला गिळतो. समाधी लावणाऱ्याला त्या दगडाची काय भीती, असा सवाल ते करतात. 

निसर्गाचा ऱ्हास पाहून ते कष्टी होतात. ते सांगतात,


 नदी कुणी रे भकास केली, भकास केली मनुष्यजाती 

निसर्ग आम्ही भकास केला, आम्हीच केली हवा विषारी 


आम्हीच निसर्ग भकास केला, वाहनांनी, कारखान्यांनी हवा विषारी केली. ही नदीही आता कोरडी वाहू लागली आहे. मनुष्यजाती भकास झाली आहे. सर्वत्र विकास दिसत असला तरी जमीनीचे पोट चिरून तू काय साधलेस असा त्यांचा प्रश्न आहे. 


मला या वर्तमानाने दिली ठाशीव समरसता 

मराठी गझलला मी, नवी देईन मोहकता 


 या वर्तमानाने आपल्याला काय दिले ते माहीत नाही पण मी मराठी गझलला नवी मोहकता माझ्या शब्दांनी देईन. 


कुणी या सागराच्या रे .. बघा डोळ्यातले पाणी 

मला बोलावते आहे, किनाऱ्याचीच अगतिकता 


अगतिक झालेल्या किनाऱ्याशी हितगुज करायला ते उत्सुक आहे. सागराचे पाणी अश्रूंप्रमाणे खारट असते. तो सागर किनाऱ्याला मला पाचारण करीत आहे, असे ते म्हणतात. 

जिंदगीला या गझलेत ते सांगतात, 


पेटला हा यज्ञ आता, काय देऊ आहुती मी

आसवांच्या या समीधा वाहतो मी जिंदगीला 


या जीवनच्या यज्ञात आसवांच्या समिधा ते वाहतात. 


मी मुठ्ठीत कैद केली मी भाग्यरेष माझी 

आता दहा दिशांना थोडे फिरून घेतो 


आपली भाग्यरेषा आपण मुठ्ठीत कैद करून ठेवतो तरी दहा दिशांची बंधने आपल्याला कैद करत नाहीत. 

समाधी हा चंद्रशेखर भुयार यांचा गझलसंग्रहाची मांडणी रेखीव आहे. पुठ्ठा बांधणी मनमोहक मुखपृष्ठ देखणे आहे. 


समाधी

चंद्रशेखर भुयार 

अष्टगंध प्रकाशन 

पृष्ठे १४८, मूल्य ३०० रुपये



प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 

९०११०८२२९९ 

Post a Comment

0 Comments