पुस्तक परिचय
उर्मिला गझलसंग्रह
गझलकारा उर्मिला बांदिवडेकर यांनी लिहिलेल्या गझलांचा "उर्मिला" हा गझलसंग्रह नुकताच वाचनात आला. या गझलसंग्रहात १०१ गझला असून सामाजिक बांधिलकी, प्रेम, स्त्री जीवनाशी संबंधित, तसेच आपल्या आजुबाजूला घडणा-या विविध घटना अशा विषयांना उर्मिलाताईंच्या गझला सहजस्पर्श करतात. मतलाबंद गझल, हझल, मात्रा वृत्त असलेल्या पादाकुलक, वनहरिणी, अनलज्वाला, हरिभगिनी, शुभगंगा या वृत्तांसह सौदामिनी, वियदगंगा, लवंगलता, आनंदकंद, भुजंगप्रयात या नेहमीच्या वृत्तांप्रमाणेच चंचला, मयूरसारिणी, लज्जिता, अनुराग, आनंद, कलिनंदिनी, अशा कठिण वृत्तातील गझलाही या गझलसंग्रहामधे वाचायला मिळतात.
“रस्त्यावरच्या धावपळीला बघते आहे उंच इमारत” या देवप्रिया वृत्तातील गझलेमधून आपल्या आजुबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा वेध घेत असतानाच “भव्य इमारत अन् बाजूला पत्र्याची ही खोली दिसते | खुजे कोण हा विचार येता झुरते आहे उंच इमारत” या शेरामधून माणुसकीचं दर्शन नक्की कुठे पहायला मिळतं हे नकळतपणे अधोरेखित होतं. स्त्रियांच्या जीवनाची शोकांतिका, संसार करताना स्त्रीला सहन करावं लागणारं दु:ख, वेदना “रोज असे हे घडते आहे” या गझलेमधून अनुभवाला येते. “आपुलाचि आपण वैरी” या वाक्याशी साधर्म्य सांगणारा “कोणी नाही नडले इतके | मीच स्वत:ला नडते आहे” हा मतला असला तरीही संसारी स्त्री संसारातील संकटांना तितक्याच धैर्याने तोंड देते. स्त्रीच्या मनातला हाच दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्ती “आयुष्याची राख जाहली | “फिनिक्स झाले उडते आहे” या गझलेच्या शेवटच्या शेरातून व्यक्त होते.
काँम्प्युटर आणि व्हाँटस् अपच्या जमान्यात संकुचित होत चाललेले नातेसंबंध हे दृष्टीआड झालेलं सत्य “सगळी नाती मनापासूनी जपत रहावी | नात्याच्या आशीर्वादाने फुलता येते” या शेरामधून हळुवारपणे उलगडून सांगितलं आहेच, शिवाय नातेसंबंध जपणं किती आवश्यक आहे हे सांगून समाजाच्या डोळयात झणझणीत अंजन घातलं आहे (सौख्याच्या आशीर्वादाने फुलता येते). दुस-यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची काही लोकांना सवयच असते, किंबहुना तेच त्यांचं काम असतं. अशा लोकांना उद्देशून उर्मिलाताई म्हणतात “हिंडायाचा नाद लागला नको तिथेही नाक खुपसते | जागोजगी जमेल तेथे फिरक्या मारत बसते हे जग”. काहीतरी करून कुणाबद्दल तरी सनसनाटी निर्माण करायची आणि त्या बातमीवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची अशा प्रकारच्या नादान वृत्तीवर या शेरामधून अचूक बोट ठेवलं आहे (गप्पा मारत बसते हे जग).
स्वत:च्या मनाला फसवता येत नाही आणि तुटलेलं नातं पुन्हा जोडता येत नाही म्हणूत तर “तुझ्या नाहीच का लक्षात काचेसारखे आहे? | अरे नातेच तुटल्यावर जुळवता येत असते का” या शेरामधून काचेला तडा गेला कि ती एकसंध होत नाही हे जन्मभर लक्षात ठेवा आणि नातेसंबंध जपा हा मौलिक सल्ला उर्मिलाताईंनी दिला आहे (ह्रदयाला फसवता येत असते का). जीवन फुलवणा-या आठवणी प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतात. विरहावस्थेत येणारी प्रियतमेची आठवण म्हणजे तनामनाला सुखावणारी वा-याची झुळूक! “झुळूक सुखाची घेऊन येते नेहमीच ती | सुखस्वप्नांचा संच वाटते तुझी आठवण” असं प्रियतमेच्या आठवणीचं सहज शब्दात वर्णन करून “जगण्याच्या या आनंदाचे माप काढण्या | फुटपट्टीचा इंच वाटते तुझी आठवण” अशी तिची भलावणही या गझलेच्या शेवटच्या शेरात केली आहे. (गाभुळलेली चिंच वाटते तुझी आठवण)
काही गोष्टींची उगीचच काळजी करून आनंदी क्षणांना पारखं व्हायचं नसतं, सुखाचं माप सांडायचं नसतं. वेळ आल्यावर काय खेळी करायची ते पहाता येईल हेच “कुणाशी घ्यायचा पंगा बघु या वेळ आल्यावर” या गझलेतून सांगितलं आहे. याच गझलेतील “कितीही घ्या नवे कपडे, कितीही दागिने घाला | कुणी आहे किती नंगा बघु या वेळ आल्यावर” या शेरातील उला (पहिली ओळ) “काय भुललासी वरलिया रंगा” या ओळीची आठवण करून देते तर सानीमुळे (दुसरी ओळ) अशी काही कलाटणी मिळते कि कोण किती पाण्यात आहे हेही वेळ आल्यावर कळेलच या सत्य परिस्थितीची जाणीव होते.
अभ्यासाच्या पुस्तकात पिंपळ पान ठेवल्याशिवाय कुणाचंच बाल्य संपलेलं नाही हे खरं असलं तरी पिंपळपानामुळे येणा-या सर्वच आठवणी सुखावह असतात असंही नाही. “आठवणींचे लख्ख चांदणे उजळत जाते जीवनाला | कठोर होते किती जाळते पुस्तकातले पिंपळपान” या शेरातील शब्दयोजनेतून हीच गोष्ट अचूकपणे दाखवून दिली आहे. तरीदेखील “तू नसताना तुझी आठवण जगण्याचा आधार आहे | आभाळासम माया करते पुस्तकातले पिंपळपान” अशा शब्दात पिंपळपानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. (जीर्णशीर्ण झालेले छळते पुस्तकातले पिंपळपान)
आयुष्यात येणारी सुखदु:खं, व्यथा, काळजी, चिंता या गोष्टींचा अभ्यासपूर्ण मागोवा उर्मिलाताई आपल्या गझलांमधून वेळोवेळी घेताना दिसतात. “किती असली सुशिक्षित अन जरी ती धाडसी असली | जगी भयग्रस्त पोरीला कुठे घेऊन जाऊ मी” बाहेरच्या जगात स्त्री सुरक्षित नाही हे नागवं सत्य आणि मातेला लेकीविषयी वाटणारी काळजी या स्त्री मनाला कुरतडणा-या दोन्ही व्यथांकडे हा शेर अंगुलीनिर्देश करतो तर “छळे सासू नि नवरोबा नणंदाही छळत असती | अशा या ओढगस्तीला कुठे घेऊन जाऊ मी” या शेरामधून घरात आलेल्या सूनेच्या मनाची होणारी कुतरओढ आणि “सहन होत नाही आणि सांगताही येत नाही” ही तिची भयावह अवस्था, त्यातून पुढे घडणा-या घडनांचा अव्यक्त अंदाज या शेरातून प्रभावीपणे व्यक्त होतो. (जगाच्या सख्त रूढीला कुठे घेऊन जाऊ मी)
जगात वेगवेळ्या स्वभावाची माणसं असतात हे आपल्या प्रेयसीला सांगताना प्रियकर म्हणतो “चळे कुणी, ढळे कुणी, छळेलही कुणी” आणि म्हणून गर्भगळीत न होता “तशातही लढायला जमेल ना तुला” असं तो तिला विचारतो आहे. प्रभाव वृत्तात लिहिलेली ही गझल बराच काळ मनात रेंगाळत रहाते (जगात या रहायला जमेल ना तुला) “वेदनेचे हे झरे झुळझुळ वहाया लागले | दु:ख माझे स्वच्छ निर्मळ झुळझुळाया लागले” या गझलेच्या मतल्यातील प्रभावी शब्द, वेदना आणि दु:ख या दोन्हीचं रूपांतर संवेदनांमधे करतात. (जगात या रहायला जमेल ना तुला) “अशी मिळावी शेजारीण” ही पादातुलक+मुरजई वृत्तातील एकमेव हझल या गझलसंग्रहात आहे.
भूषण कटककर सरांची उर्मिलाताईंच्या गझलांची ओळख करून देणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना या गझलसंग्रहाला लाभली आहे. ज्येष्ठ गझलकार निलेशजी कवडे यांनी या गझलसंग्रहाविषयी बोलताना एका समृध्द काळजाचे भावविश्व म्हणजे उर्मिला गझलसंग्रह असे सांगून “उर्मिलाताई बांदिवडेकर यांच्या लिखाणामधे सहजता आहे. वृत्त हाताळण्याची त्यांची पध्दत नवोदितांसाठी मार्गदर्शक अशी आहे” असे उद्गार काढले आहेत. उर्मिलाताई बांदिवडेकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात “कविता सखी होतीच. गझल जिवाभावाची मैत्रीण झाली. तिची आजन्म सोबत तर राहोच पण तिने दररोज अशी श्वासाइतकी जगण्याला सोबत करावी. कवितेशी तसेच गझलेशी अखंड मैत्री रहावी हीच शारदेच्या चरणी प्रार्थना.” गझलसंग्रहाला सुह्रुदांच्या आणि शिष्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या आहेत.
कविता करणाऱ्या प्रत्येक कवीला आपल्याला गझल लिहिता यावी असं नेहेमीच वाटत असतं. वयाच्या सत्तरीनंतर गझलचा ध्यास घेऊन गझलवर प्रभुत्व मिळवलेल्या उर्मिलाताई बांदिवडेकर गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे गझल शिक्षणाचे मोफत अभ्यासवर्ग घेतात. जवळजवळ २२ कार्यशाळा आत्तापर्यंत झाल्या असून इतर अनेक समुहांवरही त्यांनी ब-याच कार्यशाळा घेतल्या आहेत. (गझल कार्यशाळेसाठी संपर्क काशीनाथ गवळी – 98504 41287). आईच्या मायेने शिेकवणा-या उर्मिलाताईंच्या कार्यशाळांमधून यशस्वी गझल साधक तयार होत आहेत. गझल शिेकणा-या साधकांसाठी हा गझलसंग्रह नक्कीच मार्गदर्शक ठरेल. यात जवळजवळ ४० वृत्तं आहेत. त्याची लगावली व मात्रागट यांचा उल्लेखही केला आहे. नव्याने गझलसाधना करणा-यास याचा नक्की उपयोग हाईल. गझल मंथन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेला “उर्मिला” हा गझलसंग्रह गझलेवर प्रेम करणा-या रसिकांनी जरूर वाचायला हवा आणि गझल साधकांनी तो अभ्यासायला हवा, आपल्या संग्रही ठेवायला हवा अशी शिफारस मी नक्की करेन.
विकास मधुसूदन भावे
पुस्तकाचे नाव – उर्मिला – उर्मिला बांदिवडेकर
पृष्ठे – १२० किंमत – १६० रुपये
प्रकाशक – गझल मंथन प्रकाशन
0 Comments