Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मौनाला बोलकं करणाऱ्या गझला: 'मनाचा मौन दरवाजा' Badiujjama Birajdar

🌹 पुस्तक परिचय 🌹



मौनाला बोलकं करणाऱ्या गझला: 'मनाचा मौन दरवाजा'


     मौनात फार मोठी ताकद असते. जे बोलण्यातून नाही घडत ते मौनातून साकार होते. मौनानं केलेल्या जखमांची मोजदाद नाही करता येत. मौन इतके बोलके असते की समोरच्या माणसावर त्याचा अंतर्बाह्य परिणाम होत जातो. मौनातच सृजनाची प्रक्रिया घडत असते. हा मौनाचा मौन दरवाजा उघडला की बरंच काही तो बोलत राहतो. मनातल्या या गहिऱ्या बोलण्यानं आपण अंतर्मुख होऊन जातो हे बोल असतात गझलेचे! यातूनच गझल अन् रसिकांचा संवाद खुलत जातो. एका जिवंत, सशक्त मैफलीचा प्रफुल्ल अनुभव रसिकांना प्राप्त होत जातो. अमरावती जिल्ह्यातील चांदस-वाठोडा या आडवाटेवरील लहानशा गावातील नव्या प्रतिभेचे उत्कट प्रज्ञेचे गझलकार प्रफुल्ल भुजाडे यांचा 'मनाचा मौन दरवाजा' हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशीत झालाय्. यात भुजाडे यांनी मौनातल्या मुक्या वेदनेला बोलतं केलंय्. स्वतः दुःखी असूनही हा गझलकार सुमनांवर अन् काट्यांवरही तितकीच प्रीती करणारा आहे. त्याच्या गझलेत फुलांची कोमलता अन् काट्यांची कठोरताही आहे. शेर अन् समशेर दोन्हीचं महत्त्व तो जाणून आहे. प्रसंगानुरूप त्याचे शेर समशेरासारखे परजतात. पण या परजण्याला दुःखाची किनार आहे. याकडे कानाडोळा करता नाही येणार. भुजाडे यांची गझलेची कल्पना अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांना भर्जरी उपमा, अलंकाराच्या आश्रयाला जाण्याची आवश्यकता नाही भासत. ते म्हणतात.


शेर वा समशेर झाली पाहिजे

गझल इथले दुःख प्याली पाहिजे


     दुःख प्राशन केल्यानंतरच गझलेतील मदिरा अन् मौनातली झिंग काय असते ते कळते. याचा अनुभव मात्र ज्यानं त्यानं स्वतंत्रपणे घ्यायचा असतो. कारण अनुभवानंतरच काही गोष्टींचा उलगडा होत असतो. पण अट एवढीच असते की दुःख प्राशन करण्याची तयारी असायला हवी.


प्राशून दुःख माझे इतके मला कळाले

गझलेमध्येच मदिरा मौनात झिंग आहे


     जीवन कधीच साधेसरळ नसते. ते प्रत्येक वळणावर सत्वपरीक्षा घेत असते. ते आपल्याशी आपल्या मनाप्रमाणे कधीच नाही वागत. ते नेहमीच आशा-निराशा, सुखदुःखाच्या वाकुल्या दाखवत असते. आपण ठरवतो एक अन् जीवनाला दुसरेच काही मंजूर असते. तरीही जीवनाविषयी काही एक तक्रार नाही चालत. एकूणात जीवन समजायला खूप जटिल आहे. की कित्येकदा छातीवर दगड ठेवून जीवनाला सामोरे जावे लागते. जीवनानुभवाला दिलेलं ते एक स्पष्ट शब्दरूप आहे. हा शेर पाहा


मनाप्रमाणे कुठे वागले जीवन माझे माझ्याशी

किती कितीदा ठेवत गेलो मी छातीवर दगडाला


     किमानपक्षी प्रकाशानं तरी सर्वव्यापी असलं पाहिजे. तो डावपेच खेळून एखाद्यावर जुलूम करणारा असता कामा नये. प्रकाशाकडून दुजाभाव अपेक्षित नसतं. वात स्वतःला जाळून घेत असते. तिच्या नावानंच प्रकाश झाला पाहिजे. परंतु होतं असं की वात जळते अन् नाव होतं दिव्याचं म्हणजे वातीचं श्रेय चक्क दिवाच लुटत असतो. या मागं प्रकाशाचे डावपेच असतात. ज्याचे जळते त्यालाच कळते. ज्याचं श्रेय त्यालाच मिळायला पाहिजे. असं गझलकारास वाटते.


हे प्रकाशाचेच जुल्मी डाव होते

वात जळते अन् दिव्याचे नाव होते


     हृदयातून गझल लिहणं म्हणजे हुंदक्यांना उद्गार देणंच असतं. त्यासाठी वेगळा शेर लिहिण्याची गरज नाही पडत. शेरच वेदनाचा हुंकार असतो. हुंदक्याच्या उद्गारावरूनच जीवनाची कैफियत समजून येते. हुंदक्याचा जीवनाशी निकटचा संबंध असतो हे खरं असलं तरी हुंदके माणसाचं जीवन दुःखी करून टाकतात. मनात हुंदक्यांचा डोह निर्माण होऊ न देता त्याला उद्गार देवून वाहत ठेवणं महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनं पाहता या शेरातील सामर्थ्य प्रकर्षानं दिसून येतं.


शेर मी केला न माझ्या जीवनाचा

हुंदक्यांचा फक्त मी उद्गार केला..


     ही दुनिया इतकी जालिम आहे की ती गोरगरिबांना आपल्या घरात सुखाचा घासही धड खाऊ नाही देत. त्यांच्या मागं सावकार कर्जवसुलीसाठी भुंग्यासारखे लागतात. ते कधीही दारात 'दत्त' म्हणून उभे असतात. दार ठोकू लागतात. गरिबांच्या मनात धस्स होते. त्याच्या घासात विष कालवले जाते. त्यांचं जगणं हराम होवून जातं. गरिबाला जगू द्यायचं नाही असाच दुनियेचा दस्तूर आहे. याचा प्रत्यय भुजाडे यांच्या शेरातून सहज येतो.


चारदाणे मी सुखाचे आणले घरट्यात अन्

लगबगीने कर्ज आले, दार ठोकू लागले


     आजकालच्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यापारीकरणावर गझलकार अचूक भाष्य नोंदवतो. आजार म्हणजे सर्वसामान्यांसाठी जीवावरचं मोठं संकट असतं. डॉक्टरांच्या बिलाच्या हव्यासापोटी रुग्णाला कैक वेळा अनावश्यक चाचण्यांना नाहक सामोरे जावे लागते. श्रमिकांचा पैसा त्या गारद होऊन जातो. नाइलाजनं त्याला प्राणास मुकावं लागतं. 'देवदूत' म्हणविणाऱ्यांना याचा विसर पडतो. हे विदारक चित्र बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळतं.


नाईलाजाने आता रुग्ण मरतो

संपतो पैसा श्रमाचा चाचणीला!


     हे जग कमालीच्या विसंगतीनं, विकृतीनं पछाडलेलं आहे. आपल्या अवतीभवती अनेक मुखवटाधारी माणसं वावरत असतात. या मुखवट्या आड त्यांचा भयानक चेहरा दडलेला असतो. ते समाजात ताठ मानेनं फिरत असतात. जो विकृतीचा बाजार मांडून व्यापार करत असतो. तोच संस्कृतीच्या नावानं गळा काढतो. तो संस्कृतीचा तास घेत असतो. यापेक्षा मोठी विडंबना काय असू शकते. या दुटप्पीपणाकडंही गझलकार लक्ष वेधतो.


विकृतीचा मांडला व्यापार ज्यांने

तोच आता संस्कृतीचा तास घेतो


     नेता निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने सोईस्करपणे विसरून जातो. जनतेची स्वप्ने, मूल्यव्यवस्था तुडवून सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाल्यावर तो फक्त आपल्या सात पिढ्यांचे कल्याण साधत असतो. त्याच्या लेखी जनता म्हणजे 'किस खेत की मुली' असते. नेता कितीही लुच्चा, भ्रष्ट असला तरी अंगावर खादी चढवताच तो पवित्र होवून जातो. अगदी धुतल्या तांदळासारखा. ही लोकशाहीची शोकांतिका आहे. दोष द्यायचा तर कुणाला? गझलकार थेट बापूंनाच प्रश्न विचारतो.


अंगावरती चढवून नेता पवित्र होऊन जातो

अशी कशी तू बापू केली इतकी पावन खादी


     कोणताही गझलकार सामाजिक प्रश्नांना त्वेषानं भिडत असला तरी त्याच्या मनातही प्रेमाचा हळवा कोपरा असतोच. त्यावरचं त्यानं गझला लिहिणं अपरिहार्य ठरतं. गझलकार पाषाणासारखा कोरडाठाक नसतो. प्रेमाचा स्त्रोत्र त्याच्यात वाहत असतो. त्याच्या ठायी सळसळत रसरशीत मन असतं. याला प्रफुल्ल भुजाडे देखील अपवाद नाहीत. त्यांनी सौंदर्यवादाच्या इश्किया गझला लिहिल्यात त्या गझलामधील हळवेपणा, तरलता, हळुवार भावना महत्त्वाच्या आहेत. वानगीदाखल त्यांचे शेर पाहा.


तुझ्या या हाताची मेंदी उशाला चांदण्या होते

मधाचा चंद्र ओठावर उभी ही रात्र जागवतो


किंवा


कशा तू टाकल्या बेड्या सखे हातात स्वप्नांच्या

अताशा तूच तू येते कशी स्वप्नात स्वप्नांच्या


     प्रफुल्ल भुजाडे यांची गझलेची वाट अशीच बहरत जावो. त्यांच्या गझललेखनास शुभेच्छा!



मनाचा मौन दरवाजा: गझलसंग्रह 

गझलकार: प्रफुल्ल भुजाडे

प्रकाशक: गझल सागर प्रतिष्ठान

पृष्ठे:१०४ मूल्य:१२०₹



बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

sabirsolapuri@gmail.com

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३ 




Post a Comment

0 Comments