● पुस्तक परिचय ●
‘काजवा मनाचा’
आडवी मार्ग तमाचा
सूर्य आणि काजवा दोन्हीही स्वयंप्रकाशी. पण तळपणाऱ्या देदीप्यमान सूर्यामुळे काजव्याकडे फारसे कुणीच लक्ष देत नाही. काजव्याला सूर्याची बरोबरी साधता येत नाही म्हणून काजवा कधीही सूर्याशी स्वतःची तुलना करत नाही, हे खरे असले तरी स्वतः पुरती का होईना पण काजव्याला त्याच्या प्रकाशाच्या शक्तीची जाणीव असते. अंधाराचे कावे-बारकावे त्याला ठाऊक असतात. मनाच्या काजव्याची गोष्ट तर निराळीच असते. ती मुळातून जाणून घेण्यासाठी खोपोलीचे गझलकार डॉ. सुभाष कटकदौंड यांचा ‘काजवा मनाचा’ हा गझलसंग्रह वाचणे अपरिहार्य ठरते. डॉ.सुभाष कटकदौंड हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते अष्टपैलू साहित्यिक आहेत. साहित्य क्षेत्रात सर्व परिचित आहेत. गझलेबरोबर कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी मुक्त मुशाफिरी आहे. असे असले तरी गझलेवर त्यांचा जीव अधिक रमतो. गझलेतून ते जास्त खुलतात. एकटा सजलो मी, येताना तू नकळत ये, या दोन लक्षवेधक गझलसंग्रहानंतर आता त्यांचा ‘काजवा मनाचा’ हा तिसरा गझलसंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. हा संग्रह गझल रसिकांच्या पसंतीस निश्चितपणे उतरेल याची हमी देणारा आहे. यात कटकदौंड यांनी दैनंदिन समाज जीवनातील अनेकविध विषय उत्कटतेने हाताळले आहेत. मानवी जगण्यातल्या वेगवेगळ्या तऱ्हा, रुसणे, फुगणे, नातेसंबंधाची गुंफण, सफलता, विफलता, माणसाचा धूर्तपणा, वाट्यास आलेल्या व्यथा वेदना त्याबरोबर सभ्यता, माणुसकी, मांगल्य, चांगुलपणा, गुरुविषयीची कृतज्ञता अशा प्रकारच्या व्यापक विषयांना देखील त्यांनी शेरांमधून प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. प्रेम भावनेच्या, प्रीतीच्या जाणिवेच्या नाजूक हळुवार गझलाही त्यांना उत्स्फूर्तपणे लिहिल्या आहेत. त्या युवावर्गास हमखास आवडणाऱ्या आहेत. सदाबहार प्रेमाच्या विविध भावावस्था टिपत अर्थपूर्ण रंगाच्या रंगाची मनसोक्त उधळण करणाऱ्या या गझला तरुणाईला लाडिक साद घालतात. त्यांना निखळ प्रेमानंद देतात.
प्रेम हे निसर्गाचे सुंदर देणे आहे ते जगण्यासाठी सगळ्यासाठी आवश्यक आहे. प्रेमाने चराचर कणकण व्यापलेला आहे. प्रेम सगळीकडे सामावलेले आहे. गझलेचा अर्थच मुळी प्रियशी लाडीवाळ संवाद करणे, अंत:स्थ हितगुज करणे असा होतो. वास्तविक गझलेला कोणताही विषय वर्ज्य नसला तरी प्रेम, इश्क हाच गझलेचा स्थायीभाव राहिला आहे. गझलेचा नजाकतपूर्ण आकृतिबंध प्रेमाच्या प्रकटीकरणाला अनुकूल आहे. गझलेतूनच प्रेम स्वाभाविकपणे व्यक्त होते. प्रेम आभाळा इतके अभांग, तिळाएवढे कणभर असते. प्रेम फुला एवढे कोमल, चांदण्या इतके शीतल, चंद्रा इतके सुंदर असते. या प्रेमाची अधिकांश रूपे कटकदौंड यांच्या बऱ्याच गझलांमधून समर्थपणे प्रकट होत जातात.
प्रेम कधीच लपून राहू शकत नाही. ते कधी ना कधी जाहीर होतच असते. प्रेम सुगंधासारखे असते. त्याचा दरवळ कुणालाच रोखता येत नाही. प्रेम म्हणजे युगायुगाने, योगायोगाने जुळून आलेले गहिरे नाते असते. दोन तरुण मनात प्रेमाची शिंपण झाली की तिची आणि त्याची प्रत्येक गोष्ट अनमोल होते. प्रत्येक गोष्टीला महत्त्व प्राप्त होते. भेटीत घडलेल्या प्रत्येक प्रसंग अस्तित्वाला सुगंधित करून जातो. हे प्रियकराला वेगळे सांगण्याची आवश्यकता नसते. सुभाष कटकदौंड हे प्रेमाची नेमकी भावना व्यक्त करताना म्हणतात.
जगाने प्रीत जाणली आपुली
तुला सांगू कसे आता वेगळे
सखीच्या भेटीने सख्याला जसा अत्यानंद होतो. तनामनात प्रेमाची सुंदर फुले फुलून येतात. तिच्या भेटण्याची किमया एवढी असते की रातीचा चंद्रही लाजून चूर होतो. ही वेळ धुंद चंद्र चांदण्याची असते. सखीच्या प्रेमाच्या भेटीने आसमंत उजळून निघते. तिच्या या भेटीचे चंद्राला अप्रूप वातावे आणि तोही लाजावा. चंद्राचे लाजणे सख्याच्या चेहऱ्यावर चांदणे फुलविणारे असते. प्रेमातली ही अतिशय सुखद भावना असते. त्याचा अविष्कार म्हणजे हा शेर
भेटली जेव्हा सखी प्रेमाने
लाजला मग चंद्र ही रातीचा
प्रेमाचे जग वेगळे असते. दिवाणे असते. प्रेमात बोलणे फक्त बहाणे होते. बोलण्यातल्या प्रत्येक शब्दाचे गाणे होते. या गाण्याची प्रणयरम्य भाषा असते. प्रियकर आणि प्रियसी दोघेही प्रेमाच्या रंगात रंगलेले असतील तर प्रत्येक शब्द गाणे होऊन ओठात येतो. त्या व्यतिरिक्त त्यांना दुसरे हवे तरी काय असते. प्रेमाच्या सहवासातील ही शब्द सुरांची आसक्ती असते. जी दोघांनाही हवीहवीशी वाटत राहते. किती गाऊ तशी स्थिती होऊन जाते.
प्रेमात आज मीही तूही
ओठात शब्द गाणे झाले
प्रेम म्हणजे काय असते कोणी विचारले तर आपल्याला नेमके सांगता येणार नाहीच. कुणीतरी आपल्यासाठी आणि आपण कुणासाठी तरी जगतो आहोत. ही काळजातली एवढीशी अर्थपूर्ण जाणीव म्हणजे प्रेम. प्रियकर प्रियसीला सांगतो की तुझ्या प्रेमाविना जीव माझा कासावीस झाला आहे. मी तुझ्या खऱ्या प्रेमाचा भुकेला आहे. पण तू जे प्रेम केले होते ते खरे होते ना तू एकदा सांगून जा. एवढ्यानेही माझ्यातल्या ‘मी’ ला प्रेमाची फुले येतील. असा आशादायी सूरही कटकदौंड यांच्या शेरातून उमटतो.
दुःख माझ्या काळजाचे एकदा पाहून जा
प्रेम होते ना खरे तू एकदा सांगून जा
सत्याचा वेध घेणारे काही सामाजिक विषयही कटकदौंड यांनी गझलेतून सजगतेने मांडले आहेत. आसपास इतका कोलाहल माजलेला आहे. गर्दीचा ओघ प्रचंड वाढलेला आहे. परंतु कुणाला काय हवे आहे, कुणाचा हेतू काय आहे. हे मुळीच समजत नाही. उगाच कुणाशी काय बोलावे हे ही धड उमजत नाही. कोण भला कोण दुष्ट यातला फरक सुद्धा कळत नाही. या गर्दीतला कोण भला माणूस आहे हे आधी स्पष्ट झाले तर घराचे काय मनाचे दार सुद्धा उघडता येईल. कुणीही असो त्याला पारखून घेणेच अंतिमतः इष्ट ठरते. अशी भूमिका गझलकार या शेरातून स्पष्ट करतो.
मनाचे जरा दार उघडेन पण
कळाया हवे कोण आहे भला
गझलकार कधीच चिंतामुक्त राहू शकत नाही. त्याच्या स्वतःच्या चिंता तर त्याला लागलेल्या असतातच पण त्याकडे तो नेहमीच कानाडोळा करत असतो. स्वतःच्या चिंता उशाशी ठेवून तो जगाच्या चिंतांनी व्यथित होतो. जगाच्या कल्याणाची तो मनोमनी कामना करत असतो. हीच त्याच्या संवेदनशील मनाची ग्वाही असते. हा शेर त्याच्याच भाग बनून समोर येतो.
चिंता मनाच्या ठेवल्या साऱ्या उशाशी
नाही सवय मज एकट्याने जगण्याची
देव हा नेहमी तृप्त असतो. त्याला कधीच भूक लागत नाही. तरी त्याला खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखविणे दुधाचा अभिषेक करणे योग्य नाही. ही अंधश्रद्धा थांबवायला हवी. जी माणसे भुकेने त्रस्त आहेत त्यांना दोन घास दिले पाहिजे. आपली सद्सद् विवेक बुद्धी जागृत ठेवायला हवी. हे वैज्ञानिक सत्य सांगणारा हा शेर
अर्पू नका दुधाला तो देव ना भुकेला
खोट्या रुढी प्रथांना मी मोडणार आहे
‘काजवा मनाचा’ हा वैविध्यपूर्ण गझलसंग्रह आहे. वाचनीय आहे. सुभाष कटकदौंड यांनी प्रत्येक गझलेच्या तळाला वृत्त आणि लगावली मात्रांसह दिलेली आहे. नव्या गझलकारांना आणि गझल अभ्यासकांना याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
काजवा मनाचा: गझलसंग्रह
गझलकार: डॉ. सुभाष कटकदौंड
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे: १०० मूल्य: २१०₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३



0 Comments