Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गुलमोहर फुलताना Gazalkar Sabir Solapuri

 ● पुस्तक परिचय ●



🌹गुलमोहरासारख्या फुललेल्या गझला 🌹


      रस्त्यावर आग ओकणारा सूर्य सहस्र तप्त किरणांच्या हातांनी सृष्टीला भाजून काढत असताना गुलमोहर मात्र आपल्याच नादात पाकळ्या पाकळ्यांनी फुलत राहतो डवरत राहतो. उन्हाच्या झळा वाढवतात तसे गुलमोहराचे फुलणेही! आयुष्याचे विलोभनीय तात्विक जीवन रस फुला-पाकळ्यांत ओतून सूर्याला हसतो. त्याला ललकारतो. टळटळीत उन्हात वेदनांनी जळत राहूनही माणसांना जीवनवाद शिकवणारी गुलमोहराची शांत वृत्ती अनुकरणीय आहे. प्रशांत वैद्य यांची वृत्तीही अगदी तशीच शांत! प्रशांत यांची वृत्ती शांत असली तरी त्यांच्या लेखणीचा स्वभाव त्यांना कधी शांत बसू देत नाही. गझल सृजनाचे नवनवे प्रयोग ते करत राहतात. प्रशांत वैद्य हे गझलेच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. ते रसिकांना सुपरिचित आहे. सुरेश भट यांच्या गझल चळवळीतील ते अग्रणी गझलकार आहेत. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘अहवाल’ आणि ‘विजांचा सोयरा’ या गझलसंग्रहांनी रसिक मनावर अमीट ठसा उमटविला आहे. आता त्यांचा ‘गुलमोहर फुलताना…’ हा तिसरा टवटवीत, रसरशीत गझलसंग्रह गझल दरबारात दाखल झाला आहे. याचेही रसिक अतिशय उस्फूर्तपणे स्वागत करतील यात शंका नाही. 

      त्यांचे स्वतःचे गझल लेखन तर अविरतपणे सुरू आहे. गझल संमेलनातून, मुशायऱ्यातून ते त्यांच्या साभिनय गझल सादरीकरणाने श्रोत्यांना खेळवून ठेवतात. ते गझल विधेवर अंत:करणापासून प्रेम करतात. ते केवळ गझल सृजन करत नाहीत तर गझल सर्वदूर पोहोचावी, तिचा प्रचार-प्रसार व्हावा याकरिता सतत धडपडत असतात. गझलेच्या विविध उपक्रमातही क्रियाशील असतात. नव्या उमेदीच्या गझलकारांवर त्यांना मोठा भरवसा आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशांत वैद्य सदैव तत्पर असतात. अनेक वृत्तपत्रातून गझलेची दीर्घकाळ सदरे चालवून त्यांनी कित्येक नव्या गझलकारांना संधी प्राप्त करून दिली आहे. त्यातील अनेक गझलकार आज नावारूपास आले आहेत. प्रशांत वैद्य यांचे हे फार मोठे योगदान आहे.

      गझलेच्या क्षेत्रात आज जे काही दर्जेदार लेखन होत आहे. त्यात नव्या गझलकरांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सकस लेखनानेच रसिकाला गझलेकडे आकर्षित केले आहे. अशी त्यांची मनोधारणा आहे. नव्या पिढीतल्या गझलकारांचे कौतुक करायला मन आभाळा एवढे असावे लागते. प्रशांत वैद्य यांच्यापाशी ते मोठे मन खचितच आहे. नव्या गझलकारांबद्दल ते लिहितात.


खूप दर्जेदार लिहिले जात आहे

त्यातही काही नव्यांचा हात आहे


      गुलमोहराच्या झाडाशी प्रशांत वैद्य यांच्या गझलांचा आत्मीय संबंध आहे. ‘गुलमोहर फुलताना’ त्यातून त्यांनी अनेकविध तरल, तलम, नाजूक गझलशिल्पे साकारली आहेत. त्यात गझलियत आपसूकच येते. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत नाही.


ही गझल आहे मुलायम रेशमाची

काय आणू यात गझलियत उगीचच


      परिस्थिती सापेक्ष ज्या ज्या गोष्टी त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या त्या गुलमोहाराप्रमाणेच रक्तलाल फुल होवून त्यांच्या शेरामधून उमलेले आहे. तिला कोणतेही फुल आवडो गझलकार मात्र गुलमोहरावर ठाम आहे. त्याचीच पचीती देणारा हा शेर पाहा.  


तिच्या नि माझ्या मनात येते असेच हल्ली वरचेवर

तिचा एकक्षण म्हणजे चाफा आणि माझा गुलमोहर


      ‘गुलमोहर’ मनातून जाणवल्याशिवाय त्याच्या विषयी चाहत निर्माण झाल्याशिवाय गझलकार इतका सुंदर शेर लिहूच शकत नाही. वैशाखाच्या उन्हात फुलणे, मोहरणे, बहरने, डवरणे ही गुलमोहराची सगळीच वैशिष्ट्ये प्रशांत वैद्य यांच्या गझलेतून अविष्कृत झाली आहेत. 


      गुलमोहराचे झाड म्हणजे कणाकणाने वाढत जाणारे चैतन्य. क्षणाक्षणात मनाच्या आत फुललेली पाकळी! गुलमोहराच्या पाकळ्या जीवनाचा झरा असतो. आनंदाचे तरंग तरळतात. प्रखर तेजाचे सूर्याशी लढणाऱ्या शक्तीत रूपांतर होते. आणि जीवन गुलमोहरासारखे मोहरून जाते. याचा एक सदाबहार हळवा कोपरा गझलकाराच्या मनात आहेच. 


मला न पर्वा सहा ऋतूंची चिरतरुणाई माझी दौलत

बदलत जाते गुलाबाक्षी पण मी कायम गुलमोहर असतो!


      प्रेम फुला एवढे कोमल, चांदण्या इतके शितल, चंद्राइतके सुंदर असते. प्रेम पहाडाइतके कणभर, धाग्याइतके नाजूक असते. प्रेम गुलमोहरा इतके हळवे, रोपाइतके कोवळे असते. प्रेम भावनेने बहरलेले अनेकविध शेर ‘गुलमोहर फुलताना’मध्ये वाचावयास मिळतात.


आली बहार आहे दारी तुझ्या पुन्हा

माझ्यासवे नव्याने उमलून तू पहा


येईल चंद्र माझा भेटावया तुला

बस चांदणे तुझे हे उधळून तू पहा


      गुलमोहरासारख्या हळव्या गझला लिहिणाऱ्या प्रशांत वैद्य यांचे समाजभान अंतर्मुख करणारे आहे. अवतीभवती घडणाऱ्या अनेक भल्याबुर्‍या अनुभवांचा,  घटनांचा, प्रसंगाचा वेधही त्यांनी तितक्याच पोटतिडकीने घेतला आहे. विद्यमान काळात राजकारणाचा पारा पिचका होऊन बसला आहे. नुसत्या आश्वासनांचा वारेमात पाऊस पाडत लोकांची मते घेत सत्तेवर आलेले नेतेच लोकशाही मूल्यांची राजरोसपणे हेळसांड करत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे वांधे होत आहेत. वास्तविक लोकशाही ही आदर्शवत प्रणाली आहे. म्हणून आपण तिचा स्वीकार केला. परंतु आजचे चित्र वेगळेच दिसते आहे. लोकशाहीला हुकूमशाहीचा गराडा पडला आहे. त्यामुळे लोकशाही अस्तंगत पावते की काय, अशी साधार भिती निर्माण झाली आहे. यावर गझलकार मार्मिक भाष्य नोंदवतात. 


काय झाले नेमके या लोकशाहीला अचानक

का हुकुमशाही अताशा देतसे झटके कळेना


      पूर्वीची ती मायाळू माणसे कधीच इतिहास जमा झाली. माया, माणुसकी, सभ्यता केव्हाच हद्दपार झाली. माळी बागेची रेख देखभाल निष्ठेने करायचा. त्यामुळे बाग नित्य बहरत जायची. या ठिकाणी पक्षी स्वच्छंदपणे निवास करत असत. मुक्तपणे गाणी जात असत. बाग म्हणजे माणसांना विरंगुळा होता. परंतु माळ्याची जागा आता पारध्यांनी घेतली आहे. कधी कुणाची कधी शिकार होईल, हे सांगता येत नाही. इतकी दहशत बागेत निर्माण झाली आहे. मग अशा बागेत कोण जाणार, गाणी कशी गाणार? हा प्रश्न गझलकारासमोर उभा आहे.


पारधी आलेत माळ्याच्या ठिकाणी

कोण या बागेमध्ये गाणार गाणी?


      आज-काल कायद्याने न्याय मिळण्याची शक्यता फार घुसर झाली आहे. कायदेशीर कायद्यालाही आता मान्यता मिळताना दिसून येत नाही. कायद्याऐवजी फायद्याचे बोलले जात आहे. न्यायालयांच्या परीक्षेत बऱ्याच वेळा अन्याय उत्तीर्ण होतो आणि कायदा चक्क नापास होतो. मग अन्यायग्रस्तांना न्याय मिळणार कसा, इथून तिथून याचे कुणालाच काही वाटेनासे झाले आहे,  या जळजळीत सत्याकडे प्रशांत वैद्य लक्ष वेधायला विसरत नाहीत. तंत्रशुद्ध गझला लिहिण्याचा दीर्घ अनुभव प्रशांत वैद्य यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे रदीफ, काफिया यांचा हुकमी निवड, अत्यंत कल्पकतेने केलेली शब्दयोजना, शेरामधील मर्मग्राही भाष्य सहज सोपे पण आशयधन प्रकटीकरण या साऱ्या वैशिष्ट्यामुळे गुलमोहर फुलताना… हवाहवासा वाटत राहतो. 


गुलमोहर फुलताना: गझलसंग्रह

गझलकार: प्रशांत वैद्य

समग्र प्रकाशन,  तुळजापूर

पाने: १०५ मूल्य: १५०₹




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

sabirsolapuri@gmail.com

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments