Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दिशांतर येतोय.. Gazalkar Dr Shivaji Kale

 दिशांतर येतोय.. 



     येत्या रविवारी मराठीतील प्रथितयश गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचा "दिशांतर" हा दुसरा गझलसंग्रह गझल मंथन साहित्य संस्थेच्या कोल्हापूर विभागीय एक दिवसीय गझल संमेलनात पन्हाळा येथे प्रकाशित होत आहे.

  पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले 

मी थांबले तरीही झाले कसे 'दिशांतर'  

... दिशा 

डॉ. स्नेहल कुलकर्णी  


     मानवी मनोव्यापारांचा आध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार करणारी पण आशयाची वास्तवाशी असलेली नाळ तुटू न देणारी गझलकारा म्हणून डॉ. स्नेहल कुलकर्णी सध्या मराठी गझलविश्वाला परिचित आहेत. निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या मारून  तात्कालिक आनंद न देता आपल्या शेरांमधे वाचकांना चिरकाल गुंतवून ठेवण्याचे कसब त्यांच्या लेखनात असल्यामुळेच त्या सध्याच्या काळातील एक महत्त्वाच्या गझलकारा ठरल्या आहेत. त्यांचा "दिशांतर" हा दुसरा गझलसंग्रह नावाप्रमाणेच मराठी गझलेला पारंपरिक दिशांच्या पार घेऊन जाणार आहे. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर गझलेशी प्रामाणिक राहून सातत्यपूर्ण उत्कृष्ट लिखाण करत असतानाच कुठल्याही वादविवादात न अडकता गझलेच्या प्रचार आणि प्रसाराचे कामही त्या तितक्याच मनोभावे आणि निरपेक्ष वृत्तीने करताना दिसतात. 

    स्नेहलजींच्या गझलेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी मला सर्वात जास्त भावलेले वैशिष्ट्य म्हणजे लिखाणाची स्वयंभू शैली आणि प्रासादिक शब्दकळा होय. प्रासादिकता म्हणजे काय हे त्यांची गझल वाचून आपल्याला समजते . "दिशांतर" मधील प्रत्येक गझल वाचकाच्या भावविश्वाशी एकरूप होऊन त्याचे अंतर्मन उलगडून तर दाखवततेच पण वेगवेगळ्या अस्पर्श खयालांच्या माध्यमातून गझलेचा आणि गझलकाराच्या प्रतिभेचा प्रचंड आवाका लक्षात आणून देते.  त्यांच्या "स्नेहांकित" या पहिल्या गझल संग्रहाच्या पुढे एक पाऊल टाकून मराठी गझलेत "दिशांतर"  घडवून आणण्यासाठी, तसेच पुढील गझल आणि साहित्य प्रवासासाठी डॉ. स्नेहल कुलकर्णी (दिशा) यांना मनापासून शुभेच्छा !  



गझलसंग्रह- 'दिशांतर' 

प्रकाशक - जयवंत वानखेडे, गझल मंथन प्रकाशन कोरपना, चंद्रपूर  

प्रस्तावना - श्री भूषण कटककर (बेफिकिर) 

ब्लर्ब - डॉ. शिवाजी काळे 

किंमत - ₹ 250/- प्रकाशनपूर्व सवलत पोस्टेजसह - ₹220 /- गुगल पे /फोन पे नंबर -9922599117




डॉ. शिवाजी काळे 

Post a Comment

0 Comments