● पुस्तक परिचय ●
भावनेच्या झाडाला फुटलेली
‘गझलेची पालवी’
गझल म्हणजे आयुष्याच्या वेलीला फुटलेली सुखाची पालवी असते. गझल जगताना प्रत्येक आशा-आकांशा नित्य नवी असते. गझलेतील पालवीचा तजेला मनामनाला हवाहवासा वाटतो. तो डोळ्यांना सुखावणारा असतो. ठाणे येथील ‘ललित कला फाउंडेशन’ने काढलेला ‘पालवी’ हा प्रातिनिधीक संग्रह म्हणजे भावनेच्या झाडाला फुटलेली गझलेची टवटवीत ‘पालवी’ आहे. बारा गझलकारांच्या निवडक गझलांचा हा तरोताजा संग्रह आहे. यातील गझल सुजन म्हणजे रसिकांसाठी अनोखी मेजवानी आहे. कारण यातील अभिव्यक्ती नवी आहे. प्रत्येक गझलकाराची व्यक्त होण्याची शैली, नव्या खायालाची भरारी, भिडणारी शब्दकळा आणि प्रत्येक गझलेच्या आकृतिबंधाचा तोंडवळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे ‘पालवी’तल्या गझला वाचताना नव्या अनुभूतीचा नवा प्रत्यय येतो. वाचताना मनस्वी आनंद प्राप्त होतो.
मराठीत अलीकडच्या काळात एकाहून एक सरस, सकस प्रातिनिधीक गझलसंग्रह येऊ लागले आहेत. याचा अर्थच असा आहे की नव्याने अभिव्यक्त होणाऱ्या गझलकारांची संख्या निश्चितपणे वाढू लागली आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. गझल वाङ्मयाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी ही बाब पोषक ठरणारी आहे. गझलसम्राट सुरेश भट यांनी गझलेचे बीज महाराष्ट्राच्या भूमीत रुजविल्यानंतर गझल या काव्य प्रकारास प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आहे. परिणामी अनेक कवी गझलेकडे आकर्षित होऊ लागले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही. प्रामुख्याने गझलकडे वळणाऱ्या नव्या गझलकारांचा वाढता कल पाहता त्यांच्या नव्या उर्मीला व्यासपीठ मिळणे ही बाब गरजेची ठरते. ही गरज लक्षात घेऊनच ‘ललित कला फाउंडेशन’ने पालवी’ची नवी कोरी भेट वाचकांना दिली आहे. ही संस्था गझलेच्या सर्वांकष प्रचार प्रचारासाठी सातत्याने कृतिशील कार्य करते. या संस्थेचे अध्यक्ष दिलीप कारखानीस गझल वाढीच्या कोणत्याही उपक्रमास पूर्णत्वास नेण्यासाठी तत्परतेने सज्ज असतात. त्यांच्याच मनस्वी धडपडीतून ‘पालवी’ हा प्रातिनिधिक गझलसंग्रह पुण्याच्या महाजन पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
‘पालवी’त समाविष्ट बारा गझलकारांमध्ये सात महिला गझलकारा आहेत. हे लक्षणीय आहे. कवयित्रीदेखील गझला लिहिण्यात मागे नाहीत हे त्यांच्या सहभागावरून प्रकर्षाने दिसून येते. ‘पालवी’ म्हणजे चैतन्य, प्रसन्नता. ‘पालवी’चा लुसलुशीतपणा, रसरशीतपणा प्रत्येकाला भावणारा असतो. डोळ्यांना सुखदायी असतो. प्रत्येकाच्या समोर खुले नभांगण असते. त्याकडे डोळसपणे बघण्याची निकड असते. नभांगणाला पाहिल्याशिवाय उंच उडण्याची प्रेरणा मिळू शकत नाही. नभांगणातच उडणाऱ्यांच्या पंखात बळ भरत असते. उडण्याची तयारी मात्र स्वतःलाच करावी लागते. नदीला कोणीही वाट काढून देत नाही. वाट कितीही खडतर, अवघड असली तरी नदीला सागराची ओढ असल्याने ती स्वतःची वाट धडाडीने तयार करत पुढे वहात निघते. नदीची ही धडाडी माणसालाही शिकता आली पाहिजे. असा प्रेरणादायी शेर स्नेहलता झरकर अंदुरे लिहितात.
नदीस वाटा कुणी दिल्या का
तिची धडाडी शिकून घे तू
आरसा कधीच चेहऱ्याला फसवत नाही. तो चेहऱ्याला हुबेहुब टिपून घेतो. जसा चेहरा तसे त्याचे दर्शन घडवितो. आरसा पारदर्शक असतो. जे दिसते तेच दाखवीतो. हे खरे असले तरी चेहऱ्यावर मुखवटा लावून, किंवा चेहऱ्याला रंगरंगोटी करून आरशासमोर उभे राहिल्यास आरसा तेच दाखवितो. इथेच आरशाची फसगत होते. आरशावर आजवर अनेक शेर लिहिले गेले आहेत. परंतु गाथा जाधव-आयगोळे यांचा हा मतला अतिशय अर्थपूर्ण आहे. आरशाच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडविणारा आहे.
जो जसा दिसतो तसा केव्हाच नसतो
आरसा ही नेमका इकडेच फसतो
बाईचे कर्तृत्व कितीही भव्य दिव्य असले तरी दिव्याची वात होऊन जळत राहणे हेच तिचे प्रारब्ध असते. संसाराची काळजी पदरात घेऊन वेदनेला खुबीने झाकून ती सतत जळत असते. तिच्या मौनातली व्यथा पितृसत्ताक व्यवस्था कधी समजून घेत नाही. बाईनेच जीवतोड मेहनत करावी. सगळ्यात जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. अशी पुरुषी मानसिकता असते. त्याची सल डॉ. अंजना भंडारी यांना खोल बोचत राहते. त्या म्हणतात.
बोचरी सल खोल माझ्या आत आहे
आजही बाई दिव्याची वात आहे
आज सोबत असलेला उद्या कुणाचा होईल, याची कुणालाच शाश्वती देता येत नाही. संघटना, चळवळ असो की राजकारण पळवापळवी, फोडाफोडी सुरूच आहे. राजकीय नेत्यांमध्ये पूर्वीसारखी निष्ठा राहिलेली नाही. याची कुणालाच काही सोयरसुतक नाही. पांगलेल्या मंडळीवर सोमीनाथ सोनवणे यांनी चळवळीच्या अंगाने लिहिलेला शेर आजचे नेमके वास्तव प्रकट करणारा आहे.
सांडलेल्या ओंजळीवर काय बोलू
पांगलेल्या मंडळीवर काय बोलू
मुलगा हा वंशाचा दिवा असतो. वंश वाढविण्यासाठी मुलगाच हवा असतो. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. मुलगा दिवा असला तरी मुलगी वंशाची पणती आहे. याचा समाजाला कसा विसर पडतो, हे ठाऊक नाही. आज मुलगी कोणत्या क्षेत्रात मागे आहे? तिच्यावर बंधने लादली तरी ती आज सर्व स्थानावर तिच्या कर्तबदारीचा झेंडा फडकावते आहे. तिच्यात किती असामान्य प्रतिभा आहे. हे अगत्याने लक्षात घेतले पाहिजे. असे गझलकारा अनिसा सिकंदर यांनी त्यांच्या शेरातून सुचविले आहे.
बंधनाना लादले अन् रोखल्या स्वातंत्र्य वाटा
सर्व स्थानावर अता मुलगीच प्रतिभावंत आहे
राजकीय पटलावर आजकाल कधी नव्हे इतकी संविधानावर वेगळीच चर्चा सुरू आहे. संविधान हे लोकशाहीला मार्ग दाखविणारे दीपस्तंभ आहे. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार या मूलभूत गोष्टी संविधानानेच माणसाला दिल्या आहेत. संविधान संपविण्याचा कुणालाच अधिकार नाही. परंतु सत्ता संपादनासाठी उलटसुलट चर्चा होत राहते. ही चुकीची गोष्ट आहे. संविधानाची मनोभावे जोपासना झाली पाहिजे. संविधान हे सदैव जगात तळपत राहिले पाहिजे. असा विचार श्रीनिवास गडकरी यांनी त्यांच्या शेरातून मांडला आहे.
संविधान हे तळपत राहो जगात कायम
श्रेष्ठ मूल्य ही दिपवत राहो जगात कायम
स्वतःला प्रकाशमय करून मनात साचलेला काळोख दूर पळवता येतो. पण ज्योतीत लपवलेल्या आकांत जसा दूर करता येऊ शकतो. ज्योती स्वतःला जाळून जगाला प्रकाश वाटत असते. परंतु जळण्याचा आकांत तिच्यात दबलेला असतो. तो ऐकू येत नाही. तो कुठे नेता येत नाही. ज्योतीची आंतरिक व्यथा प्रकट करणारा एजाज मन्सुरी यांचा हा शेर पाहा.
काळोख मनाचा तर तेवून पळवला मी
ज्योतीत लपवलेला आकांत कुठे नेऊ?
या संग्रहातील नीलिमा ताटके, डॉ. विजया नवले, श्रीकांत पेटकर, योगेश दवटे, प्रा. संध्या वैद्य यांच्या गझलाही उल्लेखनीय आहेत. बऱ्याच गझलकारांनी गझलियत जपत नियमनुसार गझला लिहिण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. त्यातील खयाल चांगला आहे. काहींच्या गझलांमध्ये नवखेपणा डोकावतो, तो सरावाने, व्यासंगाने, अनुभवाने दूर होऊ शकतो. गझलेची ‘पालवी’ अशीच बहरत राहो शुभेच्छा!
पालवी: प्रातिनिधीक गझलसंग्रह
महाजन पब्लिकशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे: १०७ मूल्य: २२५₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३


0 Comments