Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल आस्वाद - एक विचारधारा Gazalkara Snehal Kulkarni

🌹 गझल आस्वाद - एक विचारधारा 🌹



  गझल आस्वाद ही क्रिया, प्रक्रिया गझलकार आणि रसिक वाचक अशा दोन्ही बाजूनी, दोन्ही अंगांनी कार्यरत होत असते.कोणत्याही उत्कृष्ट गझलेचा /शेराचा आस्वाद घेताना एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की शेराच्या स्वरूपात आपला खयाल मांडताना गझलकार आपल्या स्वतःच्या मनाच्या ज्या पातळीवर गेलेला असतो त्या पातळीवरून त्याने साधलेला संवाद रसिकाच्या मनाची पकड घेतो, त्याच्या काळजात खोलवर रुजतो. रसिकाची विचारधारा अंतर्बाह्य बदलण्याची, किमान त्याची दिशा बदलण्याची ताकद त्या शब्दांत असते, ही जाणीव गझलकाराच्या ठायी जर  सदैव तेवत असेल तर ती हळूहळू का होईना रसिकापर्यंत झिरपत जाते आणि त्या शब्दांचे मोल रसिकाला जाणवते. आजूबाजूला काय चुकीचं चाललंय, कोणत्या गोष्टी वाईट आहेत, काय बदलायला हवं, काय ठेवायला हवं ...या गोष्टींचा उहापोह आपोआपच अशा शेरांमधून होतो.शेराच्या आशयातूनच ते घडत असतं. कारण आशयातून गझलकाराच्या जाणीवा वेगळ्या काढता येत नाहीत. मुळात गझल ही संवाद.. या पातळीवर घडत असलेली प्रक्रिया असल्यामुळे ती गझलकार आणि रसिक या दोघांच्याही वेगवेगळ्या अंगभूत जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न आपोआपच करत असते. शेरात मुद्दामहून, ओढूनताणून आणलेल्या गोष्टी त्यामुळेच फारशा परिणामकारक झालेल्या दिसून येत नाहीत.उपदेशात्मक, सुविचारात्मक, प्रचारकी थाटाचे असे काही शेरातून प्रकट होत असेल तर रसिक वाचक त्यातून सुटून जाऊ शकतो,जातो. याउलट तुमच्या माझ्या आयुष्यात घडलेले,घडणारे , घडू शकणारे असे काही शेरातून मांडले गेले आणि त्या त्या प्रसंगी शेराचा कर्ता कसा वागला असता हेही उजागर झाले तर तो शेर बहुतांशी लोकांना अपील होतो. अर्थातच प्रत्येक वेळी हे समजून सांगण्याचीही गरज नसते. या गोष्टी सतर्क वाचकाच्या लक्षात येतात.अशा वेळी कर्ता वागला ते चुकीचे की बरोबर, तो तसा का वागला असावा आणखी कोणत्या पद्धतीने ही situation जास्त चांगल्या पद्धतीने handle करता आली असती किंवा कमीत कमी अशा प्रसंगी आपण कसे वागलो असतो... अशी अनेक विचारचक्रे मानवी मनात सुरु होतात जो चांगल्याचा प्रारंभ असतो.कर्त्याचे त्यावेळचे वागणे सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याची कुवतही रसिकात असते.मात्र या सगळ्या प्रक्रियेमधे आशयापेक्षा अभिव्यक्तीला जास्त महत्व प्राप्त होत नाहीय ना.. याकडेही कटाक्षाने पहावं लागतं.ही सगळी गझलकाराची जबाबदारी असते.

       बऱ्याच अंशी प्रेमाची आलोचना, प्रणयाराधन करणारा मराठी गझलेचा प्रवास काळाबरोबर अधिकाधिक वैचारिक, समग्र, प्रगल्भ होत गेला आहे.अर्थातच शेरातून कोणतीही विचारधारा उदघृत झाली तरी तिची मूळ बैठक प्रेम हीच राहते हे सत्य आहे. गझलकार जेव्हा मानवी अनुभवांच्या विचित्र खोलीत किंवा कधी कधी अपरिचित अशा कठीण मानसिक अवस्थेच्या अरण्यात जाऊन पोहोचतो तेव्हा ते अनुभवविश्व जसेच्या तसे उभे करण्याची तो धडपड करत असतो. अशा अवस्थेत भाषेचा, शब्दाचा प्रश्न जरा जास्तच नाजूक बनतो कारण इथे भाषा नेहमीपेक्षा वेगळीच झालेली असते. तिला नवे सामर्थ्य, नवीन अर्थवलये प्राप्त झालेली असतात असं जाणवतं. असं असलं तरी जे अनुभवविश्व गझलकार शेरातून आपल्याला दाखवू पाहतोय त्यात प्रवेश करायला केवळ साधन म्हणून ह्या शब्दांचा वापर होऊ शकतो. पण योग्य दारातून प्रवेश... अतिशय महत्वाचा असल्यामुळे ह्या शब्दांनाच अनन्यसाधारण महत्व राहते. एकदा आत प्रवेश झाल्यानंतर मात्र पुढील सगळा प्रकार वाचकाच्या मानसिक अवस्थेच्या सहकंपावर अवलंबून असतो. त्यामुळे गझल /शेर वाचायला, आस्वादायला सुद्धा एक प्रभावी ताकद लागत असते...! शेर मुळातून अनुभवायचा तर वाचकाजवळ ही ताकद हवीच हवी.आणि ही ताकद अंगी जोपासायची असेल तर 'मी' चे कातडे बाहेर ठेवून सूक्ष्म होऊन शब्दात प्रवेश करता यायला हवा, करायला हवा. काहीतरी उत्कट, नवीन सांगण्याच्या अवस्थेत आपले कामावलेले भाषिक सामर्थ्य पणाला लावून गझलकार रिता होऊ पाहतोय, वाचकानेही पोकळ होऊन गझलकाराचे हे जडावलेपण शोषून तितक्याच सामर्थ्याने, समर्थपणे रिचवायला हवं.ज्यांच्या रसिकत्वाचा दर्जा उच्च आहे त्यांच्याकडे मौलिक शब्द रिचवण्याचे सामर्थ्य असते. सामान्य रसिकाला मात्र त्यासाठी अभिजात साहित्याचा अभ्यास करावा लागतो. शाब्दिक दृष्टी विकसित करावी लागते. एखाद्या शेराचा खोल आशय कळणे, जाणीवांच्या पातळीवर त्याचा अनुभव घेणे आणि तो अनुभव.... अनुभूतीमधे परावर्तीत करणे ही एक गझलअभ्यास कला आहे. ही कला ज्याला साध्य झाली त्याला  गझलकाराला अपेक्षित असलेला शेरातील आशय समजू शकेल आणि त्याचबरोबर त्या शेराची अनेकार्थता लक्षात येईल. ही गझल आणि रसिकामधली साध्य - साधक अवस्था !!

  बदललेल्या सामाजिक, साहित्यिक पार्श्वभूमीवर जिथे भाषाच साहित्यिकांना, गझलकारांना वापरून घेण्याची शक्यता निर्माण होऊ पाहतेय त्या कालखंडात आस्वादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर होऊन शब्द आणि रसिक यांच्यात अशी अद्वैत अवस्था साधली गेली तरच शेराचा, गझलेचा जन्म सार्थकी लागला असं म्हणावं लागेल!

दिशा..
डॉ. स्नेहल कुलकर्णी

Post a Comment

0 Comments