● पुस्तक परिचय ●
🌹 लहजा, श्री. सदानंद डबीर आणि काही आठवणी 🌹
समीक्षा वगैरे सोडाच, कोणत्याही पुस्तकावर मी कधी जाहीरपणे प्रतिक्रिया सुध्दा दिलेली नाही. तशी वेळ सहसा आलेली नाही. कोणी तशी इच्छा व्यक्त केली नाही, असं नाही; पण मलाच इच्छा झाली नाही किंवा मी आळस केला असावा. कवी आणि ज्येष्ठ ग़ज़लकार श्री. सदानंद डबीरांचा शेवटचा संग्रह “लहजा” हातात आला. संग्रह मिळाल्याचं त्यांना मी फोन करून सांगितलं, तेव्हा संग़्रहाबद्दल थोडक्यात काही तरी लिही असं त्यांनी मला हक्काने सांगितलं.
वास्तविकतः कोणत्याही गद्य-पद्य लेखनाबद्दल समीक्षा झाली नाही तरी प्रतिक्रिया आली पाहिजे, आणि ती प्रतिक्रिया इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या लेखनाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची कोणत्याही लेखक/कवीला उत्सुकता असतेच. लेखनाला दाद मिळवणं हा जसा लेखकाचा अधिकार आहे, तसंच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया जाणून घेणं हा देखील लेखक/कवीचा अधिकार असतो. प्रतिक्रिया स्पष्ट असावी आणि ती लेखक/कवीच्या पाठीमागे दिली जाऊ नये, इतकीच अपेक्षा असते. यामुळेच तो स्वतःच्या लेखनाकडे एका वेगळ्या नजरेतून पाहू शकतो, गरजेनुसार बदल आणि सुधारणा करू शकतो. बाकी लेखनाबद्दल मतमतांतरे असू शकतात, पण वाचकांच्या प्रतिक्रिया ही कवी-लेखकाची गरज असते. असो... डबीरांनी मला हक्काने “थोडक्यात काही तरी लिही” सांग़ण्यामागे आमच्यातील मैत्री आणि इतर काही सामायिक गोष्टी आहेत. शिवाय सदानंद डबीरांसारख्या एका लेखक, कवी आणि ग़ज़लकाराबाबत लिहून मीही थोडा भाव खाऊ शकतो.
डबीरांच्या केवळ एका पुस्तकावर मी भाष्य करावं, अशी स्थिती नाही, ते अगदीच जुजबी होईल. जर कवी-लेखकाशी आपली ओळख/मैत्री असली, तर लेखनाच्या मागील त्यांची वैचारिक जडणघडण, मनःस्थिती, अनुभव आणि त्याचं लेखन ह्याची सांगड घालून लेखक-कवीची ओळख करून देता-घेता आली पाहिजे. अन्यथा त्या लेखक-कवीला दिला जाणारा प्रतिसाद अपूर्ण राहतो.
प्रत्येक वेळी लेखन हे लेखक-कवीच्या आयुष्याशी थेट निगडीत नसतं; पण कुठेतरी त्याचे अनुभव किंवा पाहिलेल्या घटना तो लेखनातून प्रतिबिंबित करत असतो. नेमकी हीच डबीरांच्या प्रवाही लेखनाची ताकद आहे. “लहजा” हा डबीरांचा शेवटचा संग्रह आहे. आता ते कोणताही संग्रह प्रकाशित किंवा प्रसिद्ध करणार नाहीत, असं त्यांनी मला फोनवर बोलताना सांगितलं. तरीही मी थोडा आळशीपणा केला आणि संग्रह सावकाश वाचून प्रतिक्रिया देतो असंच म्हणालो.
डबीरांच्या संग्रहांबद्दल बोलायचं झाल्यास, भावानुवाद, ग़ज़लवरचं अभ्यासपूर्ण लेखन असा सगळा ऐवज लक्षात घेतल्यास, त्यांनी एकूण १६ पुस्तकं लिहिली आहेत. कविता, ग़ज़ल, गीत, गद्य, नियतकालिकं, स्पर्धा, काव्य व ग़ज़ल संमेलने, मालिकांसाठी गीत लेखन, सीडी-कॅसेट, दूरदर्शनवर नाटकं वगैरे असा त्यांचा साहित्यिक प्रवास तब्बल ६० वर्षांचा आहे. मी ह्या प्रवासात त्यांच्यासोबत काही काळ आणि उशीराने म्हणजे डबीरांचा ३५ वर्षांचा साहित्यिक प्रवास झाल्यानंतरचा एक सहप्रवासी आहे.
२००० साली जोगेश्वरीला डबीरांच्या घरी एक मुशायरा भरला होता. त्यावेळी ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे, पै. इलाही जमादार, बुध्दवासी मनोहर रणपिसे, जाहीर शेख वगैरे जुने ग़ज़लकार बसलेले होते. मी १९९७ साली पद्धतशीरपणे ग़ज़लच्या कार्यशाळेत जाऊन ग़ज़लचं व्याकरण शिकलो होतो. व्याकरण शिकणं म्हणजे ग़ज़ल लिहिणं अवघड नसतं; तसंच ते सोपंही नसतं, हे कळायला मला ७-८ वर्षं गेली. त्या काळात मी जे काही लिहिलं, त्यातील शेर म्हणण्याच्या लायकीच्या दोनच ओळी होत्या. पण त्यासाठी सर्व अनुभवी ग़ज़लकारांनी मला खूप दाद दिली. नवोदितांना प्रोत्साहन देणं, हा त्यामागचा उद्देश होता. त्या दिवशी डबीरांची आणि माझी ओळख झाली.
पुढे ३–४ वर्षांत सदानंद डबीर अंधेरी म्हणजेच पार्ला-अंधेरीच्या सीमेवर कायमस्वरूपी वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांचं विलेपार्ल्यात बाजारहाट किंवा अन्य कामांसाठी येणं होत असे. त्या काळात मी पार्ल्यात राहत असल्याने आमच्या अनेकदा भेटीगाठी होत असत. ग़ज़ल लेखन, अभ्यास आणि ग़ज़लेवर असलेलं प्रेम हा आमच्यातील सामायिक दुवा होता आणि आजही आहे.
तसं पाहिलं, तर सदानंद डबीर माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत; पण ग़ज़ल मुळे आमच्यात इतकी चांगली मैत्री झाली की अनेकदा आम्ही नाक्यावर उभं राहून कटींग चहा घेत ग़ज़ल , ग़ज़ल बाबतचे मुशायरे, संग्रह, लेखनव्याकरण या विषयांवर चर्चा करत असू. २०१२ साली मी पार्ला सोडलं, पण महिन्यातून एकदा तरी डबीरांशी फोनवर बोलणं होतच असे. काही मुद्यांवर आमचे मतभेदही झाले, पण आमच्या मैत्रीत कधीच फरक पडला नाही. किंबहुना त्यांनी नेहमीच मला एका जवळच्या मित्राची वागणूक दिली.
डबीर आणि माझ्यातला दुसरा समान घटक म्हणजे प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर. विजय कॉलेजात असताना पार्ल्यात राहत असल्याने त्याची आणि माझी जुनी ओळख होती. विजयने “ लहजा”चं मुखपृष्ठ बनवलं आहे.
२०१४ साली डबीरांना कॅन्सरचं निदान झालं, आणि त्यांच्या दोन शस्त्रक्रियाही झाल्या. २००५ साली माझ्याही अशाच दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जरी त्या कॅन्सरमुळे नव्हत्या. तरी मी देखील मरता-मरता वाचलो, आणि त्या अनुभवामुळे जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला, असं मला वाटतं. डबीरांनी “ लहजा ”च्या मनोगतात अशाच काहीश्या मानसिक स्थितीचा उल्लेख केला आहे. २०२२ साली डबीरांना अपघाताने मांडीच्या फ्रॅक्चरचा सामना करावा लागला. प्रदीर्घ उपचारांनंतर ते पुन्हा चालू-फिरू लागले. त्या काळात त्यांच्या हाताला दुखापत नव्हती आणि मनही जायबंदी नव्हतं. त्यामुळे त्यांचं लेखन सुरुच राहिलं. नवीन रचना झाल्या की ते नेहमी मला व्हॉट्सॲपवर पाठवत आणि फोनवर ऐकवत होते.
डबीरांचा कोणताही संग्रह मी संपूर्ण वाचलेला नाही. कारण वाचनाच्या बाबतीत मी लहरी प्रवृत्तीचा इसम आहे. मात्र ग़ज़ल किंवा काव्यसंग्रहातील कोणतंही पान कधीही उघडून वाचतो, आणि तेच मी आजवर केलं आहे. त्यामुळे अनेक रचना वाचून डबीरांच्या लेखनाच्या खोलीचा आणि विचारांच्या परिपक्वतेचा मला अंदाज आलेला आहे. कदाचित हे डबीरांनाही माहिती असावं, म्हणूनच त्यांनी मला लिहायला भाग पाडलं. . कै. ललिता बांठिया ह्यांनी देखील त्याच्या “ओले पक्षी” ह्या संग़्रहावर मला लिहायला सांगितलं होतं पण तेव्हाही मी आळस केला होता.
मुंबई विद्यापिठात उर्दू-मराठी साहित्त्याचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक विभाग आहे २००५ साली ह्या विभागाचे प्रमुख होते श्री. युनूस आगासकर. त्यांनी मराठी ग़ज़ल बाबत एक परिसंवाद आयोजित केला होता. विद्यापिठाकडून पेपरात परिसंवादाची तारीख जाहीर करून आगाऊ बातमी वगैरे दिलेली होती. पण परिसंवादाला आलेल्यांची संख्या अगदी कमी होती. मी आणि डी.एन. गांग़ण फक्त श्रोते होतो. सर्वश्री भालचंद्र नेमाडे, संदानंद डबीर, मनोहर रणपिसे आणि चंद्रशेखर सानेकर असे वक्ते होते स्वतः युनूस आगासकर उर्दू मराठी ग़ज़लचे जाणकार असल्याने ते परिसवादांचा सुकाणू धरून बसले होते. काही मोजके विद्यार्थी हजेरी लावून गेले होते. सर्व वक्त्यांनी आपापले निबंध सादर केले आणि विचार मांडले आणि कार्यक्रम चांग़ला २ तासाचा झाला. श्रोते नसले तरी आपण श्रोते निर्माण करू अशी कल्पना मी मांडली. शेवटी परिसंवादातले मुद्दे लोकांपर्यंत गेले पाहिजेत इतकाच हेतू होता. त्या वेळी सोशल मिडीया तितका जोरात सुरू झालेला नव्हता. जो होता तो बराचसा एकतर्फी होता आणि परस्परसंवादी म्हणावा असा तर अजिबात नव्हता. तेव्हा विद्यापीठाच्या नावाने वृत्तपत्रात तपशीलवार अहवाल देऊन प्रसिध्द करू असा बेत मी सांगितला मग डबीर आणि यूनूस आगासकरांशी बोलून काय मसूदा द्यायचा नक्की केलं .२००० ते २००५ ह्या काळात मी एक स्वघोषित पत्रकार झालेलो होतो. वृत्तपत्रात फोन करून आसपासच्या बातम्या कळवणे, फुकटात लेख लिहिणे, जनता आणि वाचकाच्या सदरात सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणे असले रिकामटेकडे उद्योग मी करीत असे त्या मुळे माझ्या काही ओळखी होत्या त्याचा उपयोग करून इनमीन ५ -६ लोकं असलेल्या परिसंवादातले महत्वाचे मुद्दे आम्हाला वृत्तपत्रातून संपूर्ण महाराष्ट्रात नेता आले.
पण आज आश्चर्य वाटेल कारण तेव्हा भालचंद्र नेमाडे म्हणाले होते की मुक्त छंदाने मराठी कवितेला दारिद्र्य आणले,मराठीने गजलचे झगमगते विश्व आणायला हवे, आणि अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी ह्याचा मोठी बातमी करून गाजावाजा केला होता!
अलीकडच्या काळात वयोमाना परत्वे सदानंद डाबीर विरक्त झाले आहेत असं त्यांच्या काही रचना वाचताना वाटतं पण ते खरं नाही. “ रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ”- सुरेश भटांच्या ओळीं प्रमाणे ती एक मानसिक स्थिती आहे. समाधानी होणं, संपृक्त होणं म्हणजे विरक्त होणं नाही. जसा एखादा सूफी अवलिया आपल्याच विश्वात रमलेला असतो तशी स्थिती लेखक आणि कवीच्या आयुष्यात दीर्घ काळानेच येते त्याच मनःस्थितीत डबीर सध्या आहेत असा माझा अंदाज आहे.
लौकिकाची आस नाही
पारलौकिक ध्यास नाही!
एक साधा जीव आहे...
मी कुणीही खास नाही!
ना जरी वैशाख वणवा,
धुंद मी मधुमास नाही!
मी न बाभुळ, मी न काटा...
मी फुलांचा श्वास नाही!
मी नसे स्वामी कुणाचा...
पण कुणाचा दास नाही!
'मी'च आहे सत्य माझे,
भास वा आभास नाही!
“ लहजा ” च्या मनोगतातही हीच अनुभूती येते. किंबहुना, विख्यात चित्रकार विजयराज बोधंकर यांनीही हेच टिपलेलं आहे. कवी काय? किंवा चित्रकार काय? दोन्ही शेवटी कलाकारच. कोणत्याही कलाकाराच्या कलेचा, सृजनाचा एक पिसारा असतो. त्या बाबत आमचा मित्र विजयराज “लहजा” मध्ये त्याचं मनोगत व्यक्त करताना म्हणतो की, “आयुष्यभर ईश्वरी रंगमंचावर नाचतानाच शेवटी तो पिसारा सुध्दा आपोआप मिटला जातो, तोच समाधानाचा क्षण. ”
समकालीन सामाजिक जाणिवांवर परखड भाष्य करताना डबीर म्हणतात:
हा दोन चेहऱ्यांचा राक्षस असाच असतो
सत्तेत एक बसतो, दुसरा विरोध करतो!
हे चेहरे असे की... अगदी जुळे सयामी
एकास झाकले तर, दुसरा तसाच दिसतो!
आरोप रोजचे अन् होतात चौकशाही-
नेता मजेत सुटतो... भलता कुणी लटकतो!
म्हणतात नोकऱ्यांचे, होती लिलाव हल्ली-
काही हजार वेतन... लाखात 'भाव' असतो!
झाला विकास झाला! शहरात खूप मेट्रो!!
खेड्यात पाहिले तर... परिसर भकास दिसतो!
ह्या राक्षसास मित्रा म्हणतात 'लोकशाही'
जोडून हात येतो... नंतर तुम्हास लुटतो!
झालीत सात दशके, सारे तसेच आहे-
ना चूक राक्षसाची... आम्ही तुम्हीच चुकतो!
वयाच्या आठव्या दशकात पोहोचलेला हा शायर विरक्त नाही तर समाधानी आहे. आयुष्याबद्दल सकारात्मक आहे आणि त्याला जीवन तितकंच प्रिय आहे, जितकं एका तरुणाला असतं. डबीर म्हणतात:
जगणे माझे, जुनेच आहे
असो कसेही, हवेच आहे
रोज इथे माहोल बदलतो
अजूनही जग नवेच आहे.
स्वतःच्या चुकांकडे माणूस त्रयस्थ नजरेने कसा पाहतो? किंवा पाहू शकतो का? त्या वेळी त्याला स्वतःच्या चुकांची किती जाणीव होते? “ लहजा ” मध्ये एक वेगळा विचार मांडणारी डबीर यांची रचना आहे. गंमत म्हणून त्याला मी हॉरर असं नाव सुचवलं होतं, कारण माणसाला स्वतःच्या चुकांची जी काही जाणीव होते, तीच त्याची सर्वात मोठी भीती असते:
कुणाची सावली येते, अशी मागावरी माझ्या?
भयाची वाजते काठी, अचानक अंगणी माझ्या!
कुणाचा पायरव येतो... लगोलग थाप दारावर,
कुणाची हाकही येते... अशी नावानिशी माझ्या!
कुणीसे मध्यरात्रीला, असे कानात कुजबुजते
कुणाचे शाप छळती मज, गहन निद्रेतही माझ्या
दिसत नाही, जरी कोणी, तरी आभास छळणारे
कुणाचे श्वास रुळती हे, असे मानेवरी माझ्या?
कधी चुकलो, बहकलो मी, कधी मोहांधही झालो
कुणापाशी तरी आहे... चुकांची नोंदणी माझ्या!
“ लहजा ” नंतर आता संग्रह प्रकाशित करणार नाही असं जरी डबीर म्हणत असले, तरी त्यांचं लेखन थांबणार नाही, याची मला खात्री आहे. पूर्वीप्रमाणेच त्यांच्या रचना संगीतबद्ध होत राहतील आणि वाजतगाजत राहतील, याबद्दल जराही शंका नाही. कारण ते स्वतःच त्याची साक्ष देतात:
हे वेडे झाड असावे … फुलणेच थांबले नाही
मी बहर किती वेचावे? आयुष्यच उरले नाही.
ग़ज़लेचा “ लहजा” माझा, साधा अन् प्रांजळ होता,
आवाज आतला होता… मी शब्द सजवले नाही.
सुरुवातीच्या काळात सुरेश भट यांनी मराठीत ग़ज़लेच्या कठोर नियमांचा आग्रह धरला होता, तो त्यावेळी योग्यच होता. त्या काळात भटांच्या अनुकरणाने इतरांनी रचलेल्या ग़ज़ला ठोकळेबाज वाटतात. काही जुन्या रचना आताच्या काळात काफिया (यमक) / रदीफ (अनुप्रास) ह्यांच्या कवायती फौजा वाटतात, समजायला दुर्बोध वाटतात. पण तीही एक गरज होती, अन्यथा नियमबाह्य लेखन सुरू होऊन काही काळातच मराठी ग़ज़ल कोलमडली असती. जसजशी मराठी ग़ज़ल परिपक्व झाली, ग़ज़ल कार अनुभवी झाले, तशी मराठी ग़ज़ल तरल होत गेली.
प्रेम, शृंगार मीलन, असे विषय फार जबाबदारीने काव्यात हाताळावे लागतात. कुठेही असभ्य, आक्षेपार्ह आशय येऊ न देता हळुवारपणे शृंगार रसाचा वर्षाव करणं ही डबीरांची खासियत आहे.
ओझरती भेट तुझी, चुटपुटसे आलिंगन
अधरांनी अधरांना... केलेले अभिवादन !
सायीचे हात तुझे... चाफ्याचा स्पर्श तुझा
जुळलेल्या हातांचे... हलकेसे आंदोलन!
केस तुझे विस्कटले... स्वैर बटा वाऱ्यावर
गंधर्वच गाताना,घेत जणूजणू आवर्तन!
घुंगुराविनाच सखे, थिरकतात पाय तुझे
घरभर तू फिरताना... घर भासे वृंदावन !
तू अशीच मनमुक्ता, तू तुझीच फक्त तुझी
अस्फुटसे हास्य तुझे, गूढ तरी मनभावन !
भेट जरी ओझरती... खूण पटे जन्मांची
दूर जरी देह पुन्हा... झालेले चिरमीलन !
डबीर यांची ग़ज़ल अशा श्रेणीत जाते की सामान्य माणूस जी कविता समजतो, तशीच ती साधी आणि सोपी आहे. पण त्यात विचारांची खोली, शृंगार, सामाजिक जाणिवा आणि भावनांचे विविध रंग आहेत. डबीर यांनी ग़ज़ल आणि कवितेत एक अप्रतिम सुवर्णमध्य साधला आहे. मुख्य म्हणजे ग़ज़ल च्या व्याकरणाचे नियम पाळून त्यांनी तो सुवर्णमध्य साधला आहे, आणि तेच त्यांच्या ग़ज़लेचं यश आहे.
शेवटी मी इतकंच म्हणेन:
डबीर, तुम्ही शतायुषी नव्हे सहस्त्रायुषी व्हा. अगदी नाही झालात, तरी कोणताही कलाकार त्याच्या कलेमुळे नेहमीच अजरामर होतो आणि राहतो. असेच लिहीत रहा, व्यक्त होत रहा. प्रतिक्रियांचा हेतू जाणून मागोवा घेत रहा. नव्या ग़ज़ल कारांना ग़ज़ल कशी असावी, हे शिकवलं जातं; पण ग़ज़ल कशी नसावी, हे सांगण्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासारखे अजून ग़ज़ल कार असलेच पाहिजेत.
-यादगार
(अभिमन्यू यशवंत अळतेकर)


0 Comments