Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलचाँद Gazalkar Sabir Solapuri

 ● पुस्तक परिचय ●



आशयाची शितलता देणारा: ‘गझलचाँद’


       झल हा हृदयाने हृदयाशी केलेला मोकळा संवाद असतो. गझलकाराची ती हृदस्थ निर्मिती असते. म्हणूनच तिला आशयाच्या पातळीवर वाड़मयीन मूल्य प्राप्त होते. गझलेच्या प्रत्येक शेरातून गझलकाराचे ‘हृदस्थ’ दर्शन घडत असते. कारण त्यात गझलकाराने समाजजीवनाचे सखोल, समग्र चिंतन मांडलेले असते, त्यातील आशयघनता रसिजनांना भुरळ घालते. अशा प्रकारचे आशयसंपन्न शेर लिहिण्यात हातखंडा असलेले सांगली जिल्ह्यातील आंधळी या अगदी छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. गझलचे तंत्र बऱ्यापैकी आत्मसात केलेले हरहुन्नरी गझलकार सिराज शिकलगार यांचा ‘गझल चाँद’ संग्रह अमरावतीच्या अक्षरशिल्प प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. शिकलगार हे ‘गझल चाँद’ घेऊन गझल विश्वात रोशन होतील, असा मला विश्वास वाटतो. ‘गझलचाँद’ या पुस्तकाच्या आगळ्या वेगळ्या शीर्षकावरूनच त्यातील गझलविषयी रसिक मनात मोठे कुतुहल निर्माण होते. ‘गझल चाँद’ म्हणजे आशयाची जणू पोर्णिमाच ! गझल चाँद कुणाला आवडणार नाही ! त्यांच्या लख्ख प्रकाशात कोण न्हाऊन निघणार नाही ? आशयाची शितलता प्रदान करणारा गझलचाँद तर ज्याला त्याला आपलाच वाटतो. गझलचाँद जेव्हा आशयाच्या आकाशात उगवतो तेव्हा अवघी गझलसृष्टी उजळून निघते.


         सिराज शिकलगार हे स्वतःला समजून घेण्यास सदैव सिध्द असलेले सिध्दहस्त गझलकार आहेत. ते स्वतःच्या चालीने चालणारे, स्वतःच्या शैलीने लिहिणारे स्वयंभू प्रतिभेचे गझलकार आहेत. स्वतःच्या कलेने उजळत जाणारा हा गझलचाँद आहे. भूमीतून अंकूर फुटावेत तसेच काहीसे त्यांच्या प्रतिभेला भावभावनांचे नवनवे धुमारे फुटत जातात. त्यातून लखलखत्या गझलांच्या माळांची सकस निर्मिती होत जाते. सिराज शिकलगार हे सर्वसामान्यांच्या मनातील भावनांना उत्कट शेराचे रुप देतात. मग हे शेर सार्वकालिक सर्वांचेच होऊन जातात. समाजात पावलोपावली घडणाऱ्या विसंगती, निर्माण होणारे विरोधाभास, कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची होणारी जीवघेणी ससेहोलपाट, वाढते गैरव्यवहार, नेत्यांची दांभिकता, निगरगट्टपणा, राजकारणातील हमरीतुमरी, बेरोजगार युवकांची अगतिकता, त्यांचे अस्वस्थ वर्तमान, कर्तव्याची जाणीव, देशाभिमान, पोटच्या मुलांकडून माता-पित्यांची केली जाणारी परवड आदीसारखे समाजभान जगणारे किती तरी विषय शिकलगार यांनी त्यांच्या गझलांमधून प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या गझलरचनेची वीण साधीसुधी नाही. ती भक्कम आहे, घट्ट आहे. गझलेची भट्टी छान जमलेली आहे. हा गझलकार कल्पनाविलासात अजिबात रममाण होत नाही. वास्तवाला थेट भिडतो. त्यावर सखोल चिंतन करतो. दूरगामी भाष्य नोंदवतो.


          माणसा-माणसातील वृत्ती प्रवृत्तींचा अचूकपणे वेध घेण्याचे विलक्षण सामर्थ्य त्याच्या ठायी एकवटलेले दिसून येते. वाचकांना ते पानोपानी जाणवते. किंबहुना मनामनात ठसत जाते. अवजड अक्षरांचे अवडंबर माजविण्यापेक्षा प्रतिमांची आकर्षक, समर्पक मांडणी करण्याकडे शिकलगार यांचा अधिकाधिक कल दिसून येतो. त्यामुळे त्यांची गझल रसिकांच्या पसंतीस उतरते. तिची वाचनीयता वाढत जाते. हे गझलेचे यशस्वी अंग आहे. जे गझलकारास सफलतेकडे, सार्थकतेकडे घेऊन जाणारे ठरते. गझल लिहिणे ही सहज सोपी गोष्ट नाही. एका शेराच्या दोन ओळीत अवघे भावविश्व साकारण्याचे प्रचंड सामर्थ्य सामावलेले असते. जिंदगीपासून गझलेला दूर लोटता येत नाही, जगण्याचे अनेक पैलू, अनेक पदर गझलेच्या अंतरंगात स्पष्टपणे दिसून येतात.


           गझल हा मुळात भावनिक काव्यप्रकार आहे. तो भावनेला साद घालत असतो. गझलकाराच्या खयालांची खळबळ, भावनेची होणारी घालमेल आणि गझलेशी असलेले जिदंगीचे नाते हे सारे गझलेतून अभिव्यक्त होणे नितांत निकडीचे असते. त्यासाठी शब्दाशब्दांची उकल करावी लागते. हे जिकरीचे काम ठरते---


इतुके ही सोपे नसते गझल करणे

शब्दाशब्दांची नुसती उकल करणे


     आपला देश म्हणायला कृषिप्रधान आहे. परंतु प्रत्यक्षातले चित्र अत्यंत विदारक आहे. शेतीचा व्यवसाय खूपच बेभरवशाचा झाला आहे. तो पावसाच्या लहरीपणावरचा जुगार असतो. तो जुगार शेतकऱ्यांसाठी कधीच लाभदायक ठरत नाही. अहोरात्र काबाडकष्ट करून, घाम गाळून शेतात सोने पिकविले तरी त्याला योग्य दर मिळेलच याची हमी देता येत नाही. घामातून उगवलेल्या शेतमालास अपेक्षित भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या मनोकामना आतल्या आतच जिरून जातात. नाइलाजास्तव शेतकरी गळफास घेतो. आपली जीवन यात्रा संपवून टाकतो. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांभोवती हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे फिरतच आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर देखील सरकार संवेदनशीलता दाखवत नाही. या विदारकतेवर भाष्य नोंदविताना शिकलगार म्हणतात--


घाम गाळून शेतात पिकविले तयात सोने

मिळाला न दर मालास कामना जिरून गेल्या


     नात्यात सुध्दा आताशा अस्सलपणा राहिलेला नाही. स्नेहाचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा झरा पार आटून गेला आहे. नाती स्वार्थाने बटबटली आहेत. स्वार्थ बघूनच नाती जवळ येतात. जिते स्वार्थ साधण्याची संधी नसते. तिथून नाती आपणास भर संकटात सोडून निघून जातात. नात्यांचा डोलाराच मुळात स्वार्थाच्या पायावर उभा आहे. अशा परिस्थितीत नाती कशी सांभाळायची, ती कशी दृढ करायची, हा प्रश्न आ वासून उभा ठाकतो आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारवादी चक्रात नाती सापडली आहेत. म्हणून कुठल्याच नात्याचा आजकाल भरवसा देता येत नाही. नातेसंबंधावरील शिकलगार यांचा हा चपखल शेर पाहा.---


स्वार्थात काल जेजे माझ्या निकट होते

नाती निघून सारी भर संकटात गेली


     एकदा माणूस व्यसनाच्या आहारी गेला की, घरातल्या संपत्तीला, ऐश्वर्याला घूस लागते. माणूस कंगाल आणि कफल्लक होऊन जातो. व्यसने बरबादीला आमंत्रण देणारी असतात, व्यसनाचा मार्ग अंतिमतः विनाशाकडेच घेऊन जातो. चांगलं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगायचे असेल तर माणसाने व्यसनापासून फटकूनच राहिले पाहिजे.

व्यसनाच्या दुष्परिणामावर शिकलगार यांनी लिहलेला हा शेर डोळ्यात अंजन घालणारा आहे. व्यसनाधिनांनी याचा विचार करायला हवा---


व्यसनाने झाला तो कफल्लक

आधी नोटांची चवड होता


     शिकलगार यांनी काही उपदेशपर फटके मारणाऱ्या गझला ही परिणामकारकतेने लिहिल्या आहेत. समाजात चांगुलपणा निर्माण करण्यासाठी अशा प्रबोधनात्मक गझलांची आवश्यकता असते. अंथरूण पाहूनच पाय पसरावे, असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. ते उगाच नाही. काहींना अव्वाच्या सव्वा गप्पा मारण्यातच अधिक रस असतो. आवाक्याबाहेर ढांगा टाकत चालण्यातच काहींना मजा वाटते. धादांत खोटे बोलून लोकांना टांग मारण्याची सवयच जडलेली असते. अशा बनेल माणसांसाठी असे फटकारे उपयोगाचे ठरतात---


आवाक्याबाहेर कधी ढांग टाकू नको

खोटे बोलून कुणाला टांग मारू नको


     सिराज शिकलगार यांनी समाजभान जपत असतानाच पहिल्या प्रीतीच्या अवखळ, हळूवार भावनांच्या गझलांनाही वाट मोकळी करून दिली आहे. प्रेमातूर गुलाबी चाँदचे दर्शनही त्यांनी घडविले आहे. त्यांच्या ‘गझल चाँद’ ची सर्वत्र वाहवा होईल याची खात्री आहे.


गझलचॉंद: गझलसंग्रह

गझलकार: सिराज शिकलगार 

प्रकाशक;अक्षरशिल्प प्रकाशन,अमरावती

पृष्ठे:९६, किंमत : रू. १५०/-




बदीऊज्जमा बिराजदार

साबिर सोलापुरी 

Post a Comment

0 Comments