Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल माया Gazalkar Sabir Solapuri

 🌸 पुस्तक परिचय 🌸



आभाळा एवढी

‘गझल माया’


           झलेवर माया करण्यासाठी आभाळा एवढे मन असावे लागते. मन आभाळाएवढे असले की गझलेचा पैसही अपार विस्तारत जातो. गझल आभाळाला कशी भिडत जाते हे लक्षात सुध्दा येत नाही. गझलेत आभाळाएवढे दुःख असते, फुलाएवढे सुख असते. हे सुख दुःख आपण रोजच्या जगण्यात अनुभवत असतो. गझल मायेचे वेगवेगळे रंगीबेरंगी पदर आपल्याला खुणावत असतात. शिणलेल्या देहमनास उल्हसित करत असतात. गझल माया आपणास भरभरून देणे देत राहते. आपण फक्त मनाची ओंजळ पुढे करावी. याची साक्षात्कारी प्रचिती गझल मायेतून येत राहते. ज्यांच्यावर गझलेचीच माया जडली आहे असे प्रतिथयश गझलकार म्हणजे सिराज शिकलगार होय. गझलेने या गझलकारावर जीव लावावा. त्याच्यावर अफाट माया करावी, निर्मितीचे अलौकिक दान त्याच्या पदरात टाकावे, तेच नक्षत्रांचे देणे हा गझलकार रसिकांवर मनसोक्त उधळतो आहे. त्याचे रुक्ष जगणे गझलमय करतो आहे. हा गझल मायेचाच विविधांगी लोभस अविष्कार आहे. पात्रता आणि प्रतिमा पाहूनच गझल ‘माया’ करते. गझलकाराच्या प्रतिभेची प्रामाणिक तपस्या पारखूनच गझल त्याला जवळ करते. तिच्या मायेला मोल नाही.

           सिराजभाई हे गझलेच्या मायेस पात्र ठरलेले गझलकार आहेत. ते सांगलीचे असल्याने ‘सांगलीची गझल चांगली’ हे समीकरण त्यांच्यां संबंधाने आकारास येत आहे. गझलेचा लौकिक वाढविणारी ही गोष्ट आहे. ‘गझल माया’ या संग्रहाचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल यात दुमत असण्याचे कारण नाही. प्रस्तुत गझल संग्रहातील भगवंत, शक्ती-भक्ती, माया, प्रेम, धरणी-आभाळ, मानवता, चिंतन, अनुभूती, अविष्कार या विविध विषयावरच्या सिराजभाई यांच्या ह्या सुंदर गझला मनाला भुरळ पाडतात. या गझला आशयघन तर आहेतच पण रचना सौंदर्याचा नमुनाही आहे. रसिकांनी कधी काळी अनुभवलेल्या, जगलेल्या हळव्या जमान्यात त्या घेऊन जातात. सिराजभाईंनी गुंफलेला हा गझल मायेचा शब्दहार आहे. त्याचे रुपसौंदर्य आणि नादसौंदर्य, मार्दव मोहविणारे आहे. गझल मायेतील हे विलक्षण क्षण आपल्याही वाट्याला यावेत असे दर्दी रसिकांना आवर्जून वाटत राहते. रसिकांची सहजस्फूर्त माया ‘गझल माया’ या संग्रहास मिळणे ही त्याची सार्थकता आहे.

            सिराजभाई यांच्या ‘वळतात पावले का’ या गझलेमधून त्यांच्या मनाला ग्रासून, व्यासून राहिलेला एकाकीपणा ठळकपणाने जाणवतो. कदाचित या विस्कटलेल्या एकाकीपणाची मुळे कुठे तरी प्रेमभंगाच्या जमिनीत पसरलेली असावीत. सिराजभाईंच्या गझला वाचताना ही बाब स्वच्छपणाने समोर येते की त्यांच्या कोणत्याच गझलेत दुःखाचे भांडवल नाही, ऊर बडवेपणा नाही, आक्रताळेपणा नाही. या दारूण दुःखाच्या कडांचा अनाकलनीय स्वरुपात संदिग्ध उल्लेख आढळून येतो. एकातांतील एकटेपणाच्या जाणीवेचे चित्रण करताना सिराजभाई उपमा, प्रतिमांचा, मिथ्यकांचा सिध्दहस्त वापर करतात. एकटेपण कधी स्वतःचे असते, पण त्याची ही धुंदी चढत जाते. कळत नकळत पावले तिच्याकडे वळत जातात. आसवे गळत राहतात पण सारे कळण्याच्या पलीकडचे असते.दिल्या घेतल्या वचनांचा, शपथांचा हिशोबही मांडता येत नाही जसे की –


वळतात पावले का, पाहून तुझ्याकडे

गळतात आसवे का, पाहुन तुझ्याकडे


जीवनाच्या वाटेवर माणसाला वंचना चहुबाजुनी घेरून असतात. त्यामुळे त्याच्या जगण्याची वाट सुखद होण्या ऐवजी दुःखद होऊन जाते. गृहकलह, प्रेमभंगापोटी आलेले वैफल्य, कामधंद्यातील दगदग, मनाला सतावणारी मुलाबाळांची चिंता, भवतालातल्या दुःखदारिद्र्याने होरपळलेले मन, कोलाहलात हरवलेली मनःशांती अशा एक ना अनेक विवंचना माणसाच्या पुढ्यात उभ्या ठाकतात. तेव्हा तारेवरची कसरतच त्याच्या वाट्याला येते. या धडपडीत सगळ्यात महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे जगणे. ते जगणेच उरत नाही. कल्पनांची पडझड ही एक सारखी होत राहते. त्यात त्याचे क्षणोक्षणी विझणे सुरु असते. सजणे उरतच नाही. तेव्हा हा प्रश्न समोर येतोच-------


धडपडीत वंचनांच्या जगणे उरले कुठे ?

पडझडीत कल्पनांच्या सजणे उरले कुठे ?


प्रेमाला वासनेत माळण्याची सवय जडकी की जीवनाला जाळणारे धोके निर्माण होण्याचा अधिक संभव असतो. प्रेम हे नितळ, निर्व्याज असायला हवे. प्रेमावरची बेगड हा नुसता देखावा असतो. असण्यापेक्षा दिसण्याकडेच त्याचा जास्त कल असतो. प्रेमातली ही लटकी, नाटकी भावना फार काळ टिकून राहत नाही. ती केव्हा विरुन जाते हे ही कळत नाही. त्यातील वासना लपून राहत नाही. एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडली की आपले मन त्याच्यावर सदोदित प्रेमाची उधळण करायला राजी होते. प्रसंगी आपण तिच्यावरून जीव ओवाळून टाकतो. तिला फुलाप्रमाणे जपतो. ही प्रेमातील सुंदर अनुभूती असते. यात जळण्याचा किंवा जाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रेम आणि वासना यातील मूलभूत तफावत लक्षात घेण्याचा इशारा सिराजभाई यांच्या शेरातून देतात---


प्रेमात वासनेला माळू नको कधीही

धोक्यात जीवनाला जाळू नको कधीही


जीवनाचे मर्म जाणून जो धेय्याकडे निरंतर वाटचाल करतो. त्याचेच जीवन सफल संपूर्ण होते. आपण स्वतः इतकेच दुस-यावर ही प्रेम करायला हवे. दुसऱ्याला आनंद देणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असायला हवे. ध्येयाचा विसर पडला की जन्म व्यर्थ जातो. प्रत्येकाच्या जीवनात दुःख, संकट आणि नैराश्य असतेच. पण माणूस या उदासीच्या गर्तेत आपल्या सानिध्यात येणाऱ्या कोणत्याही जिवाला दुःखी कष्टी करता कामा नये. त्रागा करून उपयोग नसतो. जीवन म्हणजे फक्त दुःख, संकट नव्हे. जीवनात प्रेम आहे, आनंद आहे. चैतन्य आहे. जीवनात सदा वाईट गोष्टीच घडतात असे नाही. आपण सकारात्मक ऊर्जेने जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनाचा प्रत्येक क्षण न् क्षण सुंदर अतिसुंदर आहे. तो तितक्यात समरसतेने जगला पाहिजे. ही खरी जीवन निष्ठा आहे. हेच जीवनाचे मर्म आहे. सिराजभाईंनी जीवनाचे हे मर्म सुलभपणाने विशद केले आहे----


मर्म ज्याने जाणले ना जीवनाचे

ध्येय भुलला जन्म आहे व्यर्थ त्याचा


‘करावे तसे भरावे’ हा निसर्गाचा नियम आहे. जे पेरले तेच उगवते. बाभळीच्या झाडास आंबे लागत नाहीत. माणसाचा त्याच्या कर्मावर विश्वास असायला हवा. कर्मातूनच कर्तृत्व जन्मास येते. कर्तव्य न करता केवळ कर्मकांडावर, कर्मफलितावर भिस्त ठेवून जगता येत नाही. कर्म निष्ठा हीच जगण्याची संजीवनी असते. माणूस नुसत्याच कर्मफलितांवर विसंबून राहिला की त्याचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. गंडेदोरे बांधून जीवन सफल होत नाही. त्यातून फसगत आणि असफलताच पदरी येते हे त्रिकालाबाधित सत्यही सांगायला सिराजभाई विसरत नाहीत----


कळले कसे न त्याला उगवेल पेरलेले

पाहून कर्मफलिते बसला फसून आहे


सिराजभाई यांच्या बहुअंशी शेरांची धाटणी संदेश वाहकाची आहे. प्रत्येक शेरातून ते वाचकांना हितकारी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापाशी जे सांगण्यासराखे आहे ते सढळ हाताने देण्याची उदारता त्यांच्या ठायी आहे. त्यांच्यावरील ‘गझल माया’ त्यांना यश मिळवून देण्यासाठी पात्र ठरावी अशीच आहे.


गझल माया: गझलसंग्रह

गझलकार: सिराज शिकलगार 

प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती

पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹




बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)

Post a Comment

0 Comments