गझलनवाज भीमराव पांचाळे यांना
गझल मंथनचा जीवन गौरव पुरस्कार
मुंबई, (प्रतिनिधी) – मराठी गझलविश्वातील मान्यवर आणि लोकप्रिय गायक गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांना गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे दि. ७ जून रोजी गझल मंथन साहित्य संस्था आणि परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या युवा गझल संमेलनात त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी भूषवतील. अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे ३० मार्च १९५१ रोजी जन्मलेल्या भीमराव पांचाळे यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत मराठी गझल गायकीला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मराठी गझलकारांच्या रचनांना आपल्या भावपूर्ण, आशयप्रधान आणि सुरेल सादरीकरणातून त्यांनी रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवले. गझलेतील शब्दांचा अर्थ, भाव आणि संवेदनशीलता जपणारी त्यांची गायकी ही त्यांची विशेष ओळख मानली जाते.
गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी महाराष्ट्रभर मैफिली, गझल संमेलने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून मराठी गझलेचा प्रचार-प्रसार केला आहे. मराठी गझलेचे जनक कवी गझलकार सुरेश भट यांच्या गझलांना त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत स्वरबद्ध करून घराघरांत पोहोचवले. त्यामुळेच त्यांना रसिकांनी "गझलनवाज" ही मानाची उपाधी बहाल केली.
मराठी गझल क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यामध्ये एकता कला गौरव पुरस्कार (२०१६), महाराष्ट्राची गिरिशिखरे पुरस्कार (२०२१), महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार (२०२५) तसेच शाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनचा मृदगंध जीवनगौरव पुरस्कार (२०२५) यांचा समावेश आहे.
मराठी गझलला जनमानसात पोहोचविणारे, नवोदित गझलकारांना प्रेरणा देणारे आणि गझल गायकीची समृद्ध परंपरा जोपासणारे कलाकार म्हणून भीमराव पांचाळे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही त्यांच्या मैफिली, कार्यशाळा आणि मार्गदर्शनामुळे मराठी गझल चळवळीला नवी ऊर्जा मिळत आहे. या संमेलनाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्था व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


0 Comments