नवी मुंबईतील गझलकारा मनाली माळी
यांना ‘गझलयात्री पुरस्कार’ जाहीर
मुंबई, (प्रतिनिधी) : गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘गझलयात्री पुरस्कार’ नवी मुंबई येथील कवयित्री तथा गझलकारा मनाली माळी यांना जाहीर झाला आहे. येत्या ७ जून रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या युवा गझल संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी युवा गझलकार गोपाल मापारी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद जोशी, सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव, डॉ. गिरीश इंगळे आणि प्रा. हेमंत सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच गझलकार चेतन पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
मनाली माळी या शिक्षणाने बी.ए., बी.एड. असून त्यांनी मराठी, इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्या सध्या ज्ञानदीप सेवा मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात (नेरूळ, नवी मुंबई) सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या काव्यप्रेमी शिक्षक मंच, महाराष्ट्रच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा असून गझल मंथन साहित्य संस्था, नवी मुंबई शाखेच्या सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.
साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना विविध मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सुवर्णपदक, OMG Book of Records National Record सन्मानपत्र, आनंदश्री ऑर्गनायझेशनचा महात्मा गांधी दर्शन पुरस्कार, BRAVO International Book of World Records सन्मान, शिक्षक कोकणरत्न पुरस्कार तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंचचा प्रेरणा पुरस्कार यांचा समावेश आहे.
मनाली माळी यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून त्यांची ‘गझलयात्री पुरस्कारासाठी निवड झाल्याने साहित्य, गझल आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत गझलकारा योगिता तकतराव यांनाही गझलयात्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पहिल्या युवा गझल संमेलनाचा लाभ गझलप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे व डॉ. स्नेहल कुलकर्णी तसेच मुंबई जिल्हा व कोकण विभागीय कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments