![]() |
Gazalkar Samir Bapat |
देहापेक्षा मनास माझ्या
एकदाच पण मनमुराद तो कोसळणारा पाहिजे
देहापेक्षा मनास माझ्या, चिंबवणारा पाहिजे
स्त्रोत सुखाचा खळाळणारा कुठे मागते जीवना
अळवावरचा थेंब परंतू ओथंबणारा पाहिजे
हातामध्ये हात असू दे, इतके आहे मागणे
मिठी नको पण स्पर्श सख्याचा रसरसणारा पाहिजे
नकोस होऊ पहाटचा तू सूर्य केशरी कोवळा
फक्त धुक्याचा एक कवडसा तरसवणारा पाहिजे
भिरभिरणा-या, ह्या वा-याचा, कुठे पाहिजे गारवा
कंप पुसटसा अधरावरती थरथरणारा पाहिजे
स्वर्ग सुखाची ज्याची त्याची व्याख्या आहे वेगळी
माझ्यासाठी स्पंद तुझा बस! धकधकणारा पाहिजे
बट हलताना समीर सुद्धा गोंधळणारा पाहिजे
कधीतरी हा अनाहूत क्षण लाजवणारा पाहिजे
समीर_बापट
0 Comments