|| सुरेश भट या कलंदराच्या भेटीची गोष्ट ||
![]() |
Ashok Wadkar |
साधारणत: १९७१-७२ सालानंतर रेडिओवर सुरेश भटांची दोन गाणी वारंवार ऐकू येऊ लागली. एक, 'घरकुल' मधील सी. रामचंद्र यांच्या कसदार संगीत नियोजनाखालील आशा भोसलेंनी गायलेलं "मल्मली तारुण्य माझे..." हे रोमॅंटिक गीत आणि दुसरं हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतात न्हालेलं लतादिदींच्या स्वर्गीय आवाजातलं मोकळंढाकळं "आज गोकुळात रंग खेळतो हरी..." हे रासक्रीडा गीत. या दोन्ही गीतांच्या हळूवार शब्दकळेनं माझ्या मनावर पुरतं गारूड केलेलं होतं. पुढे लता दिदी व आशाजींच्या आवाजातील 'मेंदीच्या पानावर', ' 'मी मज हरपुन', 'मालवून टाक दीप' सारख्याही तरल काव्यरचना हृदयाचा ठाव घेऊ लागल्या. तेव्हा सुरेश भट हे नाव माझ्या मनावर खोलवर ठसलेलं! शिवाय मौज प्रकाशनाचा "रंग माझा वेगळा" हा सुरेश भटांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला असल्यानं १९७७ साली मी आवर्जून खरेदी करून वाचला होता.
.
१९८२ साली मेच्या अखेरीस माझा "अक्षरधून" हा शासन पुरस्कृत पहिला काव्यसंग्रह छापून तयार होता. केवळ वेष्टनाचं काम व्हायचं राहिलेलं. मलपृष्ठावर माझ्या कवितेसंबंधी मान्यवरांचे अभिप्राय असावेत, अशी योजना होती. माझ्या कवितेसंबंधी 'मृत्युंजयकार' शिवाजी सावंत, कविवर्य डॉ.सूर्यकांत खांडेकर व डॉ.एस. एस्. भोसले यांचे अभिप्राय माझ्या संग्रही तयार होते. सुरेश भट कोल्हापुरात सर्किट हाऊसवर मुक्कामास असल्याची बातमी वाचण्यात आली. तेव्हा भटसाहेबांची भेट घेऊन त्यांचाही अभिप्राय घ्यावा असा विचार माझ्या मनात आला.
२ जुलै १९८२ रोजी शनिवारची महापालिका कार्यालयास दुपारनंतर सुट्टी असल्याने दुपारनंतर मी सर्किट हाऊस गाठले. पाहतो तो भटसाहेब त्यांच्या शिष्यगणांच्या गराड्यात गझलगायनाच्या चर्चेत दंग होते. प्राथमिक बातचीतीनंतर मी माझ्या कविता संग्रहाची शासनमान्य मुद्रणप्रत अभिप्रायासाठी त्यांच्या हवाली केली. ती त्यांनी हातात घेऊन आपल्या जवळ ठेवून दिली व आपल्या गझल गायन प्रात्यक्षिकाच्या मैफलीत ते रंगून गेले. नंतर भटसाहेबांनी मला रात्रीच्या "अशी गावी मराठी गझल" या पुणे येथील साहित्य परिषदेतील नियोजित कार्यक्रमाच्या तयारीसाठी होणा-या अनौपचारिक मैफलीस हजर राहण्याचे निमंत्रण दिले.
रात्रीच्या मैफलीमध्ये हार्मोनियमच्या सूरसंगतीनं गझल गायन आर्णीचे सुधाकर कदम यांनी केले. तबल्यावर साथीला होते शेखर सरवदे. गझल गायकीचे व सादरीकरणाच्या बारकाव्यांबाबतचे मार्गदर्शन व जरूर त्या सुचना प्रत्यक्ष गाऊन भट साहेब आपल्या खास शैलीत करत होते. मैफलीत 'एल्गार' गझलसंग्रहात नंतर समाविष्ट झालेल्या बहुततांश गझला होत्या. त्यामध्ये 'हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही ', 'तुझ्या नभाला गडे किनारे', 'हा असा चंद्र', 'आसवांनी मी मला भिजवू कशाला', 'आता असे करूया' इत्यादी गझलांचा समावेश होता. एकूणच हा सारा 'कलंदराचा दरबार' होता. त्या अपूर्व मैफलीचा आस्वाद घेणा-यात तत्कालीन आमदार लालासाहेब यादवांसह कोल्हापुरातील काव्यरसिक मंडळी आवर्जून हजर होती. ही मैफल रात्री उशीरा एकच्या दरम्यान संपली.
दुसरा दिवस रविवार सुट्टीचा होता. मी कावितांवरील अभिप्राय व काव्यसंग्रहाची मुद्रणप्रत आणण्यासाठी सकाळीच साडेनऊला सर्किट हाऊस गाठले. तयार होऊन भटसाहेब साडेदहाचे दरम्यान हॉलमध्ये आले. मला पाहून चमूतील एकाला बोलावून घेऊन खिशातून शंभर रुपयांची नोट काढून देत ते त्यास म्हणाले- "अरे, मला यांच्या कवितेवर अभिप्राय द्यायचा आहे. गावात स्टेशनवर जाऊन त्यासाठी फाऊंटन पेनची शाई संपल्याने मला 'चेलपार्क'ची काळी शाई आणून दे." माझ्या व्हेस्पा स्कूटरवरून आम्ही शाई घेऊन परतलो. तोवर कविवर्यांनी कवितांचे वाचन केले होते. लेटर पॅड काढून भट साहेबांनी आपला मौलिक अभिप्राय मोठ्याने शब्द उच्चारतच लिहून दिला व खाली काळ्या बॉलपेनने तारखेसह स्वाक्षरी केली. मजकडील मौज प्रकाशित "रंग माझा वेगळा" संग्रहालवरही त्यांनी मी अपेक्षिल्याप्रमाणे सही केली.
दुस-या दिवशी इचलकरंजीत 'मनोरंजन मंडळा'चा भट साहेबांच्या गझलांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी श्री संजय होगाडे आपल्या सहका-यांसह निमंत्रण देण्यास आले होते. त्यांनी सर्किट हाऊसवर भोजनाचा बेत आखला होता. मलाही भटसाहेबांनी भोजनाचा आग्रह केला. पण मी वेळेअभावी नम्रपणे त्यांच्या परवानगीने भट साहेबांचा निरोप घेतला. हा सुरेश भट या कलंदरासोबत दीड दिवसांचा केलेला गझलप्रवास मला प्रेरणादायी ठरला. पुढील चार दिवसांत मी माझ्या चार पाच गझलांचे उत्स्फूर्तपणे लेखन केले.
अशोक म. वाडकर
'अक्षर', ए/१४६,
फुलेवाडी, ५ वा बस-स्टॉप,
कोल्हापूर ४१६ ०१०
मो.७०२००११४०८
0 Comments