गजल सादरीकरण कार्यशाळा
![]() |
गझलकार डॉ कैलास गायकवाड |
1- प्रस्तावना :
गजल म्हणजे काय ? महाराष्ट्रातल्या मराठी गजलेचा प्रवास. गजलची सद्यस्थिती. उत्तम गजललेखन आणि उत्तम सादरीकरण याची आवश्यकता.
2- पूर्व आवश्यकता:
चांगल्या सादरीकरणासाठी आधी चांगली गजल लिहावी. तरलता, हळुवारता, अल्पाक्षरीत्व आणि प्रासादिकपणा याचा अंतर्भाव.
प्रासादिक व प्रसंगानुरुप पेहराव . पुरुषांनी सदरा, कुर्ता, जाकिट, स्त्रियांनी साडी, सलवार कुर्ता अथवा कोणताही यथोचित.भडक रंग शक्यतो टाळावेत.
सादरीकरणाआधीची अवस्था अत्यंत सामान्य असावी.
• शक्य असल्यास आधीच वॉशरुमला जावून यावे.
• चांगले प्रतिसाद मिळालेली, रसिकांनी व जाणकारांनी तारीफ केलेली आणि जास्तीत शेर चांगले असलेली रचना सादरीकरणासाठी निवडावी.
• आपण सादर करावयाचे शेर आणि गजल शक्यतो मुखोद्गत असावी.
किंवा सोबत एखाद्या लहान चिट्ठीवर लिहून सोबत ठेवावी.
• नुसती फडफडणारी कागदे न घेता एक डायरी सोबत असू द्यावी जेणेकरुन रसभंग होणार नाही.
• पाणी पिणे आवश्यक असल्यास आधीच पिउन सादरीकरणासाठी उठावे. पोडियमवर अथवा व्यासपीठावर बाटलीचे बूच उघडणे, पाणी घटाघटा पिणे, ते वरुन पिताना एखाद्याचे तुटलेले दात, पिवळे दात दिसणे हे चित्र फार वाईट असतं.
• खाकरुन गळा साफ करायचा असल्यास व्यासपीठावर जायच्या आधीच करावा. माइक हातात आल्यावर खाकरण्याचा आवाज सभागृह हादरवून सोडतो. औचित्यभंग करणारा हा प्रसंग असतो.
• मोबाईलवर वाचून गजल सादर करु नये. शक्यतो सादरीकरणापुरता मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकावा.
• माझी पहिलीच वेळ आहे. सांभाळून घ्या अशी आर्जवे करु नये.
• मी अमुकतमुक, अमुकतमुक ठिकाणी अमुकतमुक म्हणून काम करतो. मला संधी दिल्याबद्दल अमुकतमुक यांचे मनापासून आभार ..... ही वाक्ये टाळावीत.
• माझ्या अमुकतमुक वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीत अमुकतमुक पदावर काम करत असताना मी कधीच अमुकतमुक शहरातील रसिकांसारखे रसिक पाहिले नाहीत जी अचूक किंवा योग्य दाद देतात .... अशी रसिकांची वृथा तारीफ करणारी आणि आपल्याविषयी अनाठायी माहिती देणारी अनावश्यक वाक्ये फेकू नयेत.
• आता सादर करत असलेली गजल किंवा रचना मी माझ्या अमुकतमुक संग्रहातून घेत आहे. माझा हा अमुकतमुक संग्रह अमुकअमुक साली प्रसिद्ध झाला होता त्याला अमुकअमुक माणसाची / साहित्यिकाची प्रस्तावना लाभली होती आणि आता त्याची इतक्यावी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होत आहे..... अशी जाहिरात करुन आणि अनावश्यक माहिती विनाकारण देवून रसभंग करु नये.
3- प्रत्यक्ष सादरीकरण करताना :
सादरीकरणास सुरुवात करताना खालील बाबींकडे लक्ष द्यावे.
• आपली मुद्रा प्रसन्न असावी. सादरीकरण म्हणजे एक खूप मोठे कार्य आहे आणि सार्या जगाचे ओझे आता मला पेलायचे आहे अश्या आविर्भावात किंवा असा भाव चेहर्यावर आणू नये.
• हात एकमेकांवर चोळणे, बोटांची चूळबूळ करणे, नाक पुसणे, नाकावरुन किंवा ओठांवरुन हात अथवा बोटे फिरवणे, वारंवार ओठांवरुन जीभ फिरवणे ह्या बाबी टाळाव्यात. तुम्ही सादरीकरण करताना तुमची मन:स्थिती स्थिर नाही असे या हालचालींवरुन निदर्शनास येते.
• टेबलाशेजारी उभे राहून सादर करत असल्यास उगाच टेबल धरणे, टेबलाला हात लावण्याचा प्रयत्न करणे, पोडियमसमोर सादर करत असल्यास अनावश्यक वाकणे, माइक वर असल्याने टाचा उंच करणे किंवा माइकच्या बूमजवळ आपले तोंड पोचवण्याचा, प्रेक्षकांच्या लक्षात येईल असा प्रयत्न करणे ह्या बाबी टाळाव्यात.
• माइकचा बूम सहजपणे आपले तोंड जवळ पोचेल असा अॅडजस्ट करावा.
• सुस्पष्ट आवाज येण्यासाठी माइकजवळ आपले तोंड आणावे. माइकला ओठ लावू नये. प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य उच्चार करताना हवा जोरात येउन ह्या शब्दांचा उच्चार लपतो आणि इच्छित शब्दोच्चार रसिकांपर्यंत पोचत नाही.
• सादरीकरणाची सुरुवात शक्यतो खालील वाक्यांनी करावी.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. सन्माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने/ परवानगीने मी माझी गजल सादर करत आहे.
जरी आधी एक मतला दोन शेर सादर करत असू, तरी त्याचा उच्चार करु नये. थेट मतला आणि दोन शेर सादर करुन झाल्यावर ...... ह्यानंतर मी माझी गजल सादर करत आहे..... असे म्हणून गजल सादर करावी.
• आपण गावाकडचे असलो, आपला लहजा किंवा भाषेचा हेल गावठी असला किंवा आपल्या प्रांताचा दिशादर्शक असला, तरीही आपले उच्चार अशुद्ध नसावेत. पाणीचा उच्चार पानी, गाणीचा उच्चार गानी, गणितचा उच्चार गनित, सोळाचा उच्चार सोला ..... हे 100% टाळता येण्याजोगे आहे. टाळावेच.
• व्यत्यासाने, अनेक ठिकाणी न चा उच्चार ण असा केला जातो तो टाळावा.
उदा. अणेक, णागरीक, पाण, वाणवा, सेणा ...
• मलम ऐवजी मळम, कलम ऐवजी कळम, हे उच्चार विचारपूर्वक टाळावेत.
• अनेक शहरी साहित्यिक किंवा नवोदित अतिशुद्धपणा दाखविण्याच्या नादात सदोष उच्चार करतात. हे सुद्धा क्षम्य नाही. उदा. असणार ऐवजी अश्णार , बसणार ऐवजी बश्णार, मला न म्हणता माला ......
-- डॉ. कैलास गायकवाड
0 Comments