Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

रसग्रहण-अकरावी दिशा

🌹रसग्रहण🌹 



गझल संग्रह -- अकरावी दिशा

गझलकार -- डॉ. शिवाजी काळे



     खरेतर मराठीचे गझल विश्व सर्व दिशांनी अनेक गझलकारांनी व्यापून टाकले आहे.

  त्यातलेच एक मनाला, समाजाला व साहित्याला आपल्या लेखणीने श्रीमंत करणारे आणि एक आदरणीय व आघाडीचे नाव म्हणजे या मराठी गझल विश्वात आपले अढळ स्थान निर्माण करणारे नगर जिल्ह्यातील राशिनचे गझलकार डॉ. श्री शिवाजी काळे सर. 

गझलेचा लळा, जिव्हाळा लावणाऱ्या आणि ईश्वरीय देणगी लाभलेल्या काळे सरांचा नुकताच "अकरावी दिशा" हा १०० गझलांचा सामावेश असलेला गझल संग्रह गंगाखेड येथे प्रकाशित झाला आहे. सरांच्या या पहिल्या गझल संग्रहाचे मनापासून स्वागत.

   गझल प्रेमींनो खरच गझल आत्मसात करायला प्राण ओतून काम करावे लागते तेंव्हा कुठे लेखणीचे सार्थक झाले असे म्हणता येईल. तर, रसिकहो सरांच्या "अकरावी दिशा" या गझल संग्रहाच्या प्रकाशनामुळे सकस, सात्विक आणि पोषक अशा हटके खयालाने अनेक गझलसाधकांच्या श्वासाला जणू नवसंजीवनी देत भरभरून आनंद दिला आहे.

  गझल आत्मसात करणे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. याची खात्री हा गझल संग्रह वाचताना झाली.


 चला तर मग सरांच्या गझलसंग्रहाचा आस्वाद घेऊ या..!


   आपल्या सुरूवातीच्याच गझलेतील मला आवडलेल्या शेरांमध्ये ते म्हणतात.

 

एकाच ह्या थेंबात जर बुडवायचे होते मला

आधी कशाला दोन सागर द्यायचे होते मला 


इतके दिवस साधा दगड समजून का लाथाडले

तेव्हाच जागृत देवता मानायचे होते मला 


ते पुढील शेरात काय म्हणतात बघा..


दिसली मनाला शेवटी विश्वात अकरावी दिशा

आयुष्य वाटेवर जिच्या शोधायचे होते मला 


  किती सुंदर आहेत ना दमदार आणि हटके खयाल..


    सरांचं गझलप्रेम खरेतर डोळ्यातच नाही तर दिशादिशांना भरणारे आहे.

  मुळात प्रेम हाच गझलेचा स्थायीभाव आहे.प्रेमाचे क्षेत्र खूप व्यापक आहे. हृदय आकर्षित झाले की, प्रेम हे येतच.

   कोण पोटातून,कोण ओठातून बोलतोय हे आपल्याला आपसुकच समजते.

  गझलेला कोणताही विषय वर्ज्य नाही तो वेगवेगळ्या छटा घेऊन येत राहतो.

  अशा सशक्त अभिव्यक्तीचा कोणत्याही गुरू शिष्याचे अवडंबर न माजवता गझल संग्रह माझ्या हाती लागला हे मी माझे सद्भाग्य समजते..

  सरांचे नवोदित गझलकारांना मार्गदर्शन करीत सर्वांना सोबत घेऊन चालणे माझ्यासारख्या साधकाला खूप संस्कार देत आहे.!

 ‌

ते मला आवडलेल्या पुढच्या गझलेतील शेरांमध्ये सांगतात..


तुझ्या यज्ञात समिधा टाकल्या आहेत आयुष्या 

बघूया आपले इप्सित कधी जुळणार आहे का


सरांचा मक्ते का शेर किती भेदक आहे पहा..


कुठेही ज्योत दिसली तर शिवाला वात आठवते

असे इंधन पुरवल्यावर गझल विझणार आहे का


कवीच्या अंतःकरणात उसळणाऱ्या भावनांचे विभाजन करण्यासाठी त्यांच्या हृदयात चाललेला हर्ष, खेद, आनंद, न्याय, करूणा, आशा, निराशा, संयम, कृतज्ञता, उद्वेग वेगवेगळ्या विषयांना हाताळताना वास्तवाची दाहकता सुरेख मांडली गेली आहे.


  वाहत्या काल प्रवाहात खूपच भावोत्कटता भरलेली आहे.

  सृष्टीचे चालणारे कालचक्र सतत नाविन्यात उजळून निघते तसेच सरांची अकारावी दिशा देखील आपल्याला आपसुकच बोलते करत आहे.


मनात वादळ भरून कुणाला इजा न करणे कठीण असते

सरी लपवल्या तरी ढगांनी विजा लपवणे कठीण असते


मरुन जळण्यापुढे कितीही उदात्त ठरू दे जळून मरणे

तरी पतंगा, जिवंत राहुन विरह पचवणे कठीण असते


आपली मराठी भाषा अतिशय श्रीमंत आणि समृध्द आहे.वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार यामुळे ती शेराची उंची वाढवत नेते..

   काळजाला स्पर्श करणाऱ्या या साध्या सोप्या भाषेतील शेर सरांनी रसिकांना वाचायला अभ्यासायला दिले आहे.

  दिव्याने दिवा लावावा तसे या सर्व गझलेतील शेरातून इतरांना प्रेरणा देत राहणं हे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही..

   सहजता, साधेपणा आणि प्रासादिकता असे गझलेला आवश्यक असलेले गुण या गझलेत आले आहेत.


  सरांच्या अकरावी दिशा या गझल संग्रहातील काही शेर जे हमखास मनाला वेड लावतात ते मी इथे मांडुन व्यक्त होणार आहे.


जागे होता कळून आले चुकले थोडे जगताना

मृत्यू गेला टपली मारून भानावर मी नसताना 


गझलेशी आजन्म घरोबा करून गझलेच्या विस्ताराला आशयघनता आली आहे या मतल्याने..

  वाचता वाचता जगायला शिकवले मला या अजून एका आवडत्या गझलेने आणि त्यातील काही शेरांनी 


देहात धाडण्याची देऊ नकोस शिक्षा

ताऱ्यांसवे मलाही सांभाळ अंतरिक्षा


शिकवू नका हुशारी फाजील आकड्यांनो

नुकतीच घेतली मी शून्याकडून दिक्षा


तो द्यायला तुम्हाला आला असेल काही

घालू नये लगेचच झोळी बघून भिक्षा


प्राण आणि हृदय तसेच रूपक आणि काव्य अंतःकरणाला सौंदर्य प्रदान करते..तेंव्हाच गझलकार रसिकांच्या हृदयावर राज्य करतो.

सरांनी या गझलेतील शेरातून 

उपमा, दृष्टांत, याबरोबरच रूपकाला अगदी सहज उतरवले आहे मित्रांनो..


आता पुढील गझलेचे मला आवडलेले शेर बघा..


खरेतर कित्येक विषय मुळातच आकर्षक असतात.


अती वागताना विनयशील सूर्या

दरारा स्वतःचा विसरशील सूर्या


तुझ्या आसवांची जरी वाफ होते

किती भावनांना दडपशील सूर्या


उकळतो इथेही नसातून लाव्हा

तुझ्यासारखा मी ज्वलनशील सूर्या


ठामपणा खूप महत्तवाचा आहे.खरेतर सरांच्या सर्वच गझलांवर सविस्तर लिहिणे गरजेचे आहे.ज्या ताकदीने सरांनी शेरातून अतिशय गहिरेपणा मांडला आहे.त्याचे महत्त्व गझलेत खूप मोठे आहे.

    

सरांच्या गझलसंग्रहाला हातातून बाजूलाच करावेसे वाटत नाही मित्रांनो..

अतिशय सुंदर कोणती उपमा देऊ हा प्रश्न पडला आहे मला..!

 सरांचे पुढचे खयाल वाचताना असे वाटत आहे की जणू कस्तुरीच मिळाली आहे..


मोकळे आकाश म्हणजे घर निवारा होत नाही

कोण म्हणतो पाखरांचा कोंडमारा होत नाही


कंसात टाकला मी संदर्भ यातनांचा

शोधून वाचणारा दर्दी कुठे दिसेना


इथे आधीच जर निष्कर्ष ठरलेले

तुझी गंभीर चर्चा वायफळ आहे


भले मांड बाजार माझ्या व्यथेचा,लिलावात घेणार सहभाग मी

कुबेरापरी कोण दुसरा इथे जर व्यथा उच्चकोटी हिऱ्यासारखी 


जरी छाटल्या आयुष्याच्या लवलवणाऱ्या फांद्या

शेंडा भिडला आकाशाला,अडसर झाला नाही 


माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याला स्वत:च्या व्यथांचे भांडार उभा करता येते..

  पण या अवलिया डॉक्टर गझलकाराने पाखरांची सुध्दा वेदना प्रचंड सौंदर्याने रेखाटली आहे.वेदनेची अनुभूती तीव्र होत गेली की त्यातून सहजच काव्यनिर्मिती होते असा माझा समज आहे.

अमर्याद आनंदप्राप्ती देणाऱ्या वरील सर्व शेरांनी अधिकच हळवे बनवले आहे.


 सहजता काय असते ते खालील काही शेरामधून लगेचच समजून जाईल सर्वांना..


काळानुसार काही गोष्टी घडून गेल्या

इतिहास मात्र माझा दुषित करून गेल्या 


स्वयंभू तुझे जग अबाधित राहो

कुणाच्याच मीही प्रभावात नाही


दार कुरकुरेल ना पुन्हा घरात घ्यायला

जर तुझ्या करामती बिजागरीत गुंतल्या


दोष देत वरच्यांना खालचेच वर गेले

त्याशिवाय कुठलाही मंच गाजला नाही


चालतो आहे तुझी मी वाट अनवाणी

तू स्वतःच्या गुप्त काचा वेच आयुष्या


वरचढ होता तुझा भरवसा तुझा इरादा तुझा बहाणा

तुझ्यासारखे मला हरवणे प्रारब्धाला जमले नाही


कुणावर क्षण उधार आहे का

कशाला काळ थांबला आहे


जिचे वाहणे निर्माल्याने पावण झाले

त्याच नदीचा प्रश्न बोचरा आठवतो का 


दारावरील पाटी हसली मनामधे

जेव्हा मला घराने पत्ता विचारला


काय लिहावे या अर्थगर्भ शेरांवर रसिकांनो..!किती कमाल आहे ना!अनुभवसंपन्नता,चिंतनशीलता,आणि मौलिकता निर्माण करत आहेत सर्व शेर.

  कित्येक वर्षे जपून साठवलेला हा अनुभवांचा अमृतठेवा अमृतमहोत्सवी वर्षात "अकरावी दिशा" या गझलसंग्रहामधे प्रकाशित झाला आहे या सोज्वळ मूर्तीचा.

  

   आयुष्याचा एक मोठा कालखंड अनुभवल्यानंतर वैद्यकीय आणि साहित्य क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतलेल्या या अभिनंदनीय व्यक्तीमत्तवाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे..

   नव्याने गझल लिहू पाहणाऱ्या पिढीला प्रेरणा देऊन गझल गझलियत सहित लिहायला लावणारा असा गझल संग्रह आहे हा.

गझलेच्या एकाच माध्यमातून अनेक विषयांना स्पर्श केला आहे सरांनी.. मनाला भिडलेल्या विषयांचा आकृतीबंध पाळून नातीगोती, माणूसकी, समाजात वावरताना आलेले अनुभव याशिवाय अनेक विषय गझलेत गुंतवले आहेत. यासाठी केलेली प्रदीर्घ साधना, आणि ठेवलेला संयम आपल्या सर्वांना दिसून येत आहे.

    

स्वतः स्वतःचा करू निवाडा

कुठे झगडता जगाबरोबर


फक्त वाटाड्या म्हणूनच हात धर

वाट सरल्यावर परत पाठव मला


मी जिव्हाळा शोधतो गावाकडे

जो तुझ्या शहरात नाही फारसा


जे न देखे रवी ते देखे कवी हा जमिन आस्मान एक करणारा अनुभव दशदिशांना भेटून आला आहे.. तेव्हा "अकरावी दिशा" आपल्या सर्वांना सरांच्या गझलसंग्रहातून पाहायला मिळत आहे..!

काफिया, रदिफ प्रचंड सौंदर्याने व खयालाने नटलेला गझल संग्रह आपसूकच वाहवा मिळवल्याशिवाय राहत नाही.

  लिखाण वाढत आहे मित्रांनो पण खरे सांगू का ?सरांच्या गझल संग्रहाबद्दल लिहाल आणि वाचाल तेवढे कमीच आहे..असा आकर्षक आणि दमदार गझलांनी, खयालांनी नटलेला गझल संग्रह सरांकडून आपल्या सर्वांना मिळाला आहे..तो आपल्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा सन्मान आहे..

   खूप ताकद भरली आहे गझल संग्रहात खरे तर मी एक साधी चारोळी लिहायची ठरवलं तर विचाराची जुळवाजुळव करून थकायला होतं. पण या पवित्र गझलसंग्रहाने अंतःकरण ढवळले तर गेलेच पण बरोबरीने उजळून देखील निघाले आहे.

  अतिशय बोलका, समाजातील बारीक सारीक गोष्टींचा तपशील घेत,अगदी जवळून ऐकलेली निसर्गाची हाक, सरांनी ऐकली आहे.

हा जिवाभावाचा करार धरतीवर गझलकार डॉ.शिवाजी काळे सरांच्या "अकरावी दिशा" या गझलसंग्रहामधे अवतरला आहे.

सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गझलकार डॉ.शिवाजी काळे सरांच्या गझलसंग्रहाला माझा मनापासून सलाम!

  तुमचे खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील सर्व यशस्वी वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा शिवा दादा!


 प्रत्येकाच्या संग्रहात असायलाच हवा "अकरावी दिशा" हा गझल संग्रह..

  नक्की घेऊन वाचा मित्रांनो 


गझलसंग्रह -- अकरावी दिशा 

गझलकार --डॉ.शिवाजी काळे

प्रकाशक:- गझलमंथन प्रकाशन, कोरपना

गुगल पे --९४२३७५१५३३



सरिता प्रशांत गोखले

रत्नागिरी



 _________________________________________

 

🌹 *साहित्य पाठवा* 🌹


गझल मंथन साहित्य संस्थेने स्वतंत्र ब्लॉग सुरु केला आहे. या माध्यमातून गझल, लेख, पुस्तक परीक्षण आदी साहित्य प्रकाशित करण्यात येते. साहित्यिकांनी आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.


भरत माळी

प्रसिद्धी प्रमुख,

गझल मंथन साहित्य संस्था

मो. 9420168806

_________________________________________

Post a Comment

0 Comments