🌼 गझल प्रभात 🌼
🌕 कोजागिरी विशेष 🌕
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे…. आणि तू मिटलास का रे ?
सुरेश भट
🌹🌹🌹
कोजागरी
शत पौर्णिमांचे चांदणे जा घेउनी तुमच्याघरी
आचंद्र मुक्कामास आली लाडकी कोजागरी
गझलनंदा
🌹🌹🌹
संशयाने ती जरा डोकावली पेल्यामध्ये
साजरी झाली अशी कोजागिरीची पौर्णिमा
आनंद रघुनाथ
🌹🌹🌹
लेकरू रडते दुधासाठी बिचारे रात्रभर
झोपडीला फाटक्या छळते किती कोजागिरी
अमोल शिरसाट
🌹🌹🌹
तारकांनी रात्र नटली, वाटते कोजागिरी
चांदण्यांसोबत उरी गंधाळला कोणीतरी
एजाज शेख
🌹🌹🌹
हे शुभ्र चांदणे अन आल्हाद तो सुखाचा
आला नभात माझ्या तो चंद्र पौर्णिमेचा
अलका देशमुख
🌹🌹🌹
छान केशर वेदनेचे घातल्यावर
गडद झाला रंग मग कोजागिरीचा
अरविंद उन्हाळे
🌹🌹🌹
राग आसावरी, नीर गोदावरी
पाहिले मी तुला तीच कोजागिरी
अभिजीत दाते
🌹🌹🌹
चेहरा हसरा तुझा की पौर्णिमा कोजागिरीची
चंद्रही भाळेल बघुनी लाजणे लाडिक तुझे हे
अभिजीत काळे
🌹🌹🌹
चंद्रही दिसतो तुझ्याहुन सावळा
तू सखे कोजागरीचा सोहळा
अरविंद सगर
🌹🌹🌹
उजळले बघ कसे आकाश सारे
तुझ्या माझ्यातल्या कोजागिरीने
अरुतनया अरु तनया
🌹🌹🌹
स्वप्नात चंद्र मजला कानी हळू म्हणाला
कोजागिरी अंगणि येईन भेटण्याला
भागवत (बाळू) घेवरे
🌹🌹🌹
तुझा चंद्रही परक्या सारखा भासत असतो,
कोजागिरी सारखा कधीतरी भेटत असतो
भाग्येश पोटभरे
🌹🌹🌹
चांदण्याच्या कवडस्यांचे चित्र निरखू सारखे
चंद्र आहे लाजलेला, हासली कोजागिरी ..
बापू दासरी (उमाग्रज)
🌹🌹🌹
कंटाळवाणी जिंदगीही साजरी होते
दिसताच तू माझी प्रिये कोजागरी होते
चंद्रकांत कदम
🌹🌹🌹
आठवांचा चंद्र असतो बारमाही
रोज करतो साजरी कोजागिरी
दत्तप्रसाद जोग
🌹🌹🌹
प्रेम पुजतो मी मनाच्या मंदिरी
देवता वसते मनी ती गोजिरी
.
पाहतो जेव्हा तिला मी चोरुनी
साजरी होते तिथे कोजागिरी
ज्ञानेश्वर शिवाजीराव कटारे
🌹🌹🌹
पाहिले चंद्रास जेव्हा पौर्णिमेला जाळताना
आसवे कोजागिरीची माझिया डोळ्यात आली
दीपक अंगेवार
🌹🌹🌹
भेटता तू होत असते साजरी
काय असते वेगळी कोजागरी
दीपक कांबळी
🌹🌹🌹
पौर्णिमेचा चंद्र आता नांदतो माझ्याघरी
रोजचे हे चांदणे अन रोजची कोजागरी
गिरीश जोशी ‘गझलगिरीश’
🌹🌹🌹
आपल्या भेटीची तयारी मोठी,
ये चंद्रा करु कोजागरी मोठी.
गीतांजली हराळ
🌹🌹🌹
काळजातच चंद्र आम्ही ठेवला
रोज करतो साजरी कोजागिरी
गजानन वाघमारे
🌹🌹🌹
अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या
माझ्यामुळे कोजागरी आहेस तू
गोविंद नाईक
🌹🌹🌹
भूक पोटाची असावी चंद्र घासाएवढी
वाटते आहे मनाला.. भाकरी, कोजागिरी
ग. वि. मिटके
🌹🌹🌹
हे फुकाचे जागणे शरदातल्या पुनवेस माझे
चंद्र काही कोरड्या कढईत विरघळणार नाही
गणेश धामोडकर
🌹🌹🌹
एक यावा असा चंद्र माझ्यामधे
साजरी रोज होईल कोजागरी
गणेश शिंदे दुसरबिडकर
🌹🌹🌹
नभी शुभ्र तारे निशा उजळली
तुझी धुंद सोबत नि कोजागरी
सौ. गौरी ए. शिरसाट
🌹🌹🌹
नाही मला अप्रूप सूर्याचे तुझ्या तेजाळल्या
डोळ्यात माझ्या चांदणे अन् अंतरी कोजागरी
ऋषिकेश दिपक ढवळे
🌹🌹🌹
चांदणे बहरून येते अंबरी
रोज असते आपली कोजागरी
हेमलता पाटील
🌹🌹🌹
सांगतो अंधार ह्या वस्तीतला
माहिती नाही मला कोजागरी
जय विघ्ने
🌹🌹🌹
जागण्याची कारणे माझी तुझीनिराळी
एक आहे चंद्र पण ,कोजागरी निराळी
जयश्री कुलकर्णी
🌹🌹🌹
पुन्हा सर करूया सुखाचे विसापुर, पुन्हा वाट हरवू
पुन्हा एक 'कोजागरी' आठवांची जपूया पुन्हा चल
जनार्दन केशव
🌹🌹🌹
कशाला नाचते पोरी
किती तू हासते पोरी
.
तिथे कोजागिरी आणि
इथे आरासते पोरी
कमलाकर देसले आबा
🌹🌹🌹
चंद्र आला देखणा माझ्या घरी
जिन्दगानी जाहली कोजागरी
किशोर बळी
🌹🌹🌹
कृपा ही ईश्वरी व्हावी
सुखाची पायरी व्हावी
.
तिचा मुखचंद्र उगवावा
पुन्हा कोजागरी व्हावी
कालिदास चवडेकर
🌹🌹🌹
साजरी तेव्हाच होते आमुची कोजागिरी
भाकरीचा चंद्र जेव्हा व्यापतो ही ताटली
लक्ष्मण उगले
🌹🌹🌹
शेतात 'चंद्र' दुःखी, गावात 'पौर्णिमा' ही
का साजरी करू मी, कोजागिरी सुखाने
महेन महाजन
🌹🌹🌹
ओळखीची बात आहे
शारदाची रात आहे
.
चाखली कोजागिरी तू
आज मी कैफात आहे
मनिषा नाईक
🌹🌹🌹
सोसून कळ जरा तु आयुष्यास पाहिले असते
एकतरी कोजागिरी जागती राहिली असती
नचिकेत ओझरकर
🌹🌹🌹
प्रतिबिंब पौर्णिमेचे कोजागरी तुझी
हसते बघून ओघाओघात चांदणे
नारायण सुरंदसे
🌹🌹🌹
मी तुला पाहतो रात्रभर जागतो
रात्र प्रत्येक कोजागरी वाटते
निशांत पवार
🌹🌹🌹
असतीलही वर्षामधे बारा वगैरे पौर्णिमा,
साऱ्यांहुनी त्या एक असते आगळी कोजागिरी...
प्रबंध राऊळ
🌹🌹🌹
भरदुपारी चांदणे भेटीस आलेले
भरदुपारी साजरी कोजागरी केली
प्रमोद खराडे
🌹🌹🌹
मी कशाला सांग पाहू तो नभीचा चांदवा
तूच माझा चंद्र आणि मी तुझी कोजागिरी
पूजा भडांगे
🌹🌹🌹
नवा ताज होता नभाच्या शिरी
तया लोक म्हणतात कोजागिरी
प्राजक्ता गोखले-पटवर्धन ‘प्राजु’
🌹🌹🌹
हा चंद्र अन हे चांदणे घेऊन जा तुमच्या घरी
मुक्काम करते नेहमी माझ्या घरी कोजागिरी
प्रदीप निफाडकर
🌹🌹🌹
जुईची शुभ्रता ही की तुझी कोजागिरी आहे
जणू बट मोग-याने देह हा शृंगारला आहे.
प्रशांत वैद्य
🌹🌹🌹
प्राणात चंद्र घेऊन राधा घरी निघाली
तोऱ्यात चांदण्यांची कोजागिरी निघाली
प्रफुल्ल भुजाडे
🌹🌹🌹
चंद्र परका चांदणेही पाहवेना
आजची कोजागरी का पेलवेना
प्रभा सोनावणे
🌹🌹🌹
कोजागिरीत वेडी गोडी भरून जाते
बाहूत जी दुधाच्या साखर विरून जाते
प्रफुल्ल भुजाडे
🌹🌹🌹
मी ईद आणि माझी कोजागिरी समजतो
जेव्हा तिच्या छतावर,रात्रीस 'यायची' ती
प्रमोद राठोड
🌹🌹🌹
गंधाळुनी झंकारते कोजागिरीचे चांदणे
धरणीस नाहू घालते कोजागिरीचे चांदणे
.
आहेत दु:खी जीव जे त्यांच्याचसाठी ही धरा
करुणाघनाला मागते कोजागिरीचे चांदणे
प्रल्हाद सोनेवाने
🌹🌹🌹
चांदणे आले तुझ्या ओठावरी
जाहली कोजागिरी मग साजरी
राधिका प्रेम संस्कार
🌹🌹🌹
अजिंठा वेरूळ अन शुभ्रधवल धम्मगीरी
चल सखे,आपण साजरी करू कोजागरी
रंजन तायडे
🌹🌹🌹
कंटाळवाणी जिंदगीही साजरी होते
दिसताच तू माझी प्रिये कोजागरी होते
रमेश बुरबुरे
🌹🌹🌹
जीवनाची वाट अवघड शोधता
भेटली नाही कधी कोजागरी
रविंद्र कांबळे
🌹🌹🌹
चंद्रास फक्त दर्शन कोजागरी दुधाचे
दुध प्राशण्यास 'सुटले' त्याचेच सर्व भाचे
राधाकृष्ण साळुंके
🌹🌹🌹
पौर्णिमेच्या धुंद राती चंद्र अवतरला घरी
ओठ उष्टावून झाली साजरी कोजागिरी
रोहिणी कदम
🌹🌹🌹
तीच माझी दवा शेवटी;
जा, तिला बोलवा शेवटी
.
लाजते फार कोजागरी
तो दिवा मालवा शेवटी
डॉ. श्रीकृष्ण राऊत
🌹🌹🌹
माझ्या मनीचा चंद्र तू मी काय सांगू वेगळे
अंधार गावी माझिया घेऊन ये कोजागिरी
सिद्धार्थ भगत
🌹🌹🌹
तू नसताना या जिवाला जाळते कोजागिरी
तू असताना चांदणे मग सांडते कोजागिरी
.
ज्या खेळातुन घेतली माघार होती मी कधी
खेळ नव्याने तोच पुन्हा मांडते कोजागिरी
संघमित्रा खंडारे
🌹🌹🌹
कित्येक दिवसांनी तुला मी पाहिले
मध्यान्हसुद्धा भासली कोजागरी
सुप्रिया मिलिंद जाधव
🌹🌹🌹
पंचमी दसरा दिवाळी अष्टमी कोजागिरी
माणसांवाचुन कसे हे साजरे करणार सण ?
सुप्रिया जाधव लाखे
🌹🌹🌹
कालच्या कोजागिरीची काय सांगावी कथा मी
बोलताना चांदण्यांची ऐकलेली जी व्यथा मी
सुनंदा पाटील ‘गझलनंदा’
🌹🌹🌹
साजरी व्हावी कशी कोजागिरी ही
चंद्र माझा जर ढगांच्या आड आहे
सानिका दशसहस्त्र
🌹🌹🌹
हासरी लेक माझ्या घरी दोस्त हो-
हासते रोज कोजागरी दोस्त हो
संतोष कांबळे
🌹🌹🌹
एकटा मी एकटी ती एकटी कोजागरी
आणि भवती चांदणेही एकटे पा-यापरी
सुधाकर इनामदार
🌹🌹🌹
पाहिला चेहरा तुझा अन लाजली कोजागिरी......
लेक माझी हसते अन साजरी कोजागिरी.....
शिवमती पिया पाटील
🌹🌹🌹
कुंकवाने रेखला तू चंद्र ह्या माथ्यावरी;
रोज आता भोवती रेंगाळते कोजागरी..
सुहासिनी देशमुख
🌹🌹🌹
चांदण्यांच्या घरी धुंद कोजागरी
रात्र गाते जणू राग बागेश्वरी
सुदेश मालवणकर
🌹🌹🌹
तू असा निःशब्द असता काय मी बोलायचे
मी तुझ्या नयनात तेव्हा वाचली कोजागिरी
तृप्ती काळे
🌹🌹🌹
एक होकार दे फार काही नको
फार काही नको फक्त नाही नको
आपले भेटणे हीच कोजागरी
चांदणेही नको चांदवाही नको
वैभव जोशी
🌹🌹🌹
तशी कोजागिरी माझ्या घरीही साजरी होते
दुधावरती तुझी, माझी पिठा पाण्यावरी होते
विशाल ब्रह्मानंद राजगुरू
🌹🌹🌹
रात्री तरूण झाल्या कविता वयात आल्या
कोजागरी मनाची प्यावी दुधाप्रमाणे
विजया टाळकुटे
🌹🌹🌹
मला चंद्र कोजागिरी साजणे दे
सुगंधी कळ्यांना तुझे लाजणे दे
विनायक दिलीप उजळंबे
🌹🌹🌹
कोजागिरी सवे हा लपलाय चंद्र कोठे
आणून द्या कुणी तो शोधून या नभाला
वसंत शिंदे
🌹🌹🌹
ना दिसे सामोरि मजला ना अता तू सोबती
काय तो मग चंद्रमा अन काय ती कोजागिरी
वैश मिर्झापुरे
🌹🌹🌹
कोजागिरी वर काय लिहावे आज मी ?
चंद्र माझा केव्हाच ढगां आड़ गेला
यामिनी विलास
🌹🌹🌹
रात्र पूर्वीसारखी तू लाजरी दे
आपल्या दोघातली कोजागरी दे
भरदुपारी भेटलो...रस्त्यावरी
साजरी झाली पुन्हा कोजागरी
सौ दिपाली कुलकर्णी
फक्त एकच चंद्र आकाशात आहे
ईद का कोजागिरीची रात आहे ?
सौ दिपाली कुलकर्णी
🌹🌹🌹
कोजागरीस आला खिडकीत चंद्र हसरा
नंतर पुढे पुढे तो घरचाच एक झाला
सविता सामंत
🌹🌹🌹
लेक माझा खूप दिवसांनी घरी आला
अन् पिठोरीला जणू कोजागरी झाली
चंद्र म्हणला तो मला कोजागरीचा
तोच ठरला नेमका मुद्दा कळीचा
वेगळी कोजागिरी सांगा करू का साजरी
पोर्णिमेचा चंद्र रोजच पाहते माझ्या घरी
स्मिता साळवी मुंबई
🌹🌹🌹
चांदणे लगडून व्हावी आतली कोजागरी
अन प्रकाशाने नहावी काजळी आतातरी
सौ. सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार
🌹🌹🌹
कोरडी झाली नभाचीआज खोली वाटते
काल चंद्रा सोबतीने हासली कोजागिरी
अलका देशमुख
उरल्या नभात आता तारेच सांडलेले
सोबतीने हासली होती तिथे कोजागिरी..!!
अलका देशमुख
शब्द भिजले नाहले शुभ्र चांदण्यांतूनी
आत काव्य नाचले .. हासली कोजागिरी....
अलका देशमुख
🌹🌹🌹
आपले भेटणे हीच कोजागिरी
चांदणेही नको चांदवाही नको
वैभव जोशी
🌹🌹🌹
चंद्र माझ्यासवे जागतो रात्रभर
साजरी ये करू धुंद कोजागरी
संजय कुळये
रत्नागिरी
🌹🌹🌹
म्हणतात साजरी ये कोजागिरी करू
चंद्रास चांदण्याही बहुधा सरावल्या
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
कंटाळवाणी जिंदगीही साजरी होते
दिसताच तू माझी प्रिये कोजागरी होते
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
कोजागरीचे वाटते अप्रूप ह्या कारण
चंद्राबरोबर भेटणे केंव्हातरी होते
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
🌹🌹🌹
कोजागरची रात्र मनोहर त्यात दुधाची भर
"मीना" साठी चंद्र चांदणे बिंबवतेस निशा
नभी चंद्र कोजागरीचा दिसे हासरे चांदणे सांडले अंगणी
निशा रोज गंधाळते सोनचाफ्या परी रात्र माझ्या उशाशी फुले
श्वेत रंगात रंगून आली पहा चांदण्याचा घरी आज कोजागरी
तारकांनो नभी चंद्र आला पहा रास तारांगणी रंगवा साजिरी
मीना शिंदे
🌹🌹🌹
कोजागिरीचा बघ चंद्र आला
जागून रात्री सत्कार केला
मुखावर दिसे आज कोजागिरी
मला भेटता पूर्ण ही भाकरी
स्मिता गोरंटीवार
वणी
🌹🌹🌹
कोजागरी
संसार मांडताना कोजागरी उजळली
सजणात रंगताना कोजागरी उजळली
लाजून चूर झाले, विसरून भान गेले
रायास पाहताना कोजागरी उजळली
ते चंद्र चांदणेही, झाले अवाक् सारे
प्रणयात न्हाहताना कोजागरी उजळली
माझ्या तुझ्या सुखांचे, गाणे स्वरामधे मी
श्वासात पेरताना कोजागरी उजळली
सारी तुझीच झाले, नावावरी तुझ्या मी
स्वत्वास हरवताना कोजागरी उजळली
डॉ. सुजाता मराठे
🌹🌹🌹
कौमुदी शिंपीत येतो चंद्रमा व्योमांतरी
जागते मग प्रेमिकांच्या अंतरी कोजागरी
डॉ. विजया नवले (झरकर) , पुणे
🌹🌹🌹
चंद्रास फक्त दर्शन, कोजागरी दुधाचे
दुध प्राशण्यास "सुटले", त्याचेच सर्व भाचे..!!
मनोरंजनासाठी जागत, इथे कोजागरी
भुके जीव दररोज जागती, तिथे कोजागरी..!..!
राधाकृष्ण यशवंत साळुंके, नाशिक
🌹🌹🌹
चेहरा साजणीचा उजळ एवढा
रात प्रत्येक होतेय कोजागरी
डॉ नरसिंग इंगळे
उल्हासनगर
🌹🌹🌹
रंगात पौर्णिमेच्या रंगून रात्र गेली
नाही खबर कुणाला तारे किती निखळले
सौ. अनुराधा वायकोस परभणी
🌹🌹🌹
कुंतल तिचे उडावे अन् पोर्णिमा दिसावी
कोजागिरी अशी ही मी साजरी करावी
कविता पुणतांबेकर 'कुमुद '
मध्यप्रदेश
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलक:
देवदत्त संगेप
आणि
भरत माळी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संयोजक: भरत माळी
मो. 9420168806
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
0 Comments