• गझल प्रभात • (भाग ४१ )
Gazalkara Nirmiti Kolate
🟣 नवरात्र विशेष 🟣
⚪आजचा गझल रंग- राखाडी ⚪
🌹पिंजरा तोडायची खटपट तिची🌹
आज स्वप्ने केवढी अनवट तिची
का असावी वाट सरधोपट तिची
चार चौघांच्या मध्ये द्यावी मिठी
फार आहे मागणी नटखट तिची
आसवे गाळून ती हासायची
व्हायची त्याला तरी कटकट तिची
तोल सांभाळायचा त्याने कसा
चोरटा करते इशारा बट तिची
एक घरटे पाहिजे आहे तिला
पिंजरा तोडायची खटपट तिची
उंबऱ्याच्या आत ही बाहेर ही
जीवघेणी चालली फरफट तिची
वेदनेतुन जन्म ती घेते नवा
नाळ इच्छेसारखी बळकट तिची
जन्मभर नाही कधी ढळला पदर
राहिली साडी जरी मळकट तिची
चालली ओलांडुनी रेषा जुन्या
निर्मितीने मोडली चौकट तिची
निर्मिती कोलते
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments