• गझल प्रभात • (भाग ३७ )
![]() |
Gazalkara Urmila Bandivadekar |
🟡 नवरात्र विशेष 🟡
🔴आजचा गझल रंग- लाल 🔴
🌹वैभव असते बाई म्हणजे 🌹
आयुष्याचे वैभव असते बाई म्हणजे
आनंदाचे वैभव असते बाई म्हणजे
कुणा वाटतो जन्म मुलीचा नकोनकोसा
नवसृजनाचे वैभव असते बाई म्हणजे
पोर चिमुकली पायी पैंजण ठुमकत जाते
रुमझुमण्याचे वैभव असते बाई म्हणजे
टिकली कंकणमाळ मिरवते लेक सोनुली
शृंगाराचे वैभव असते बाई म्हणजे
वयात येता बहरत जाते कळीप्रमाणे
सौंदर्याचे वैभव असते बाई म्हणजे
लाजलाजरी जाय सासरी पोर साजरी
सौजन्याचे वैभव असते बाई म्हणजे
जपते सा-या घरदाराला लळा लावते
संस्काराचे वैभव असते बाई म्हणजे
चिंचा बोरे आंबट चिंबट ..खावे वाटे
डोहाळ्याचे वैभव असते बाई म्हणजे
पोटामधल्या लाथा खाते बाळजिवाच्या
वात्सल्याचे वैभव असते बाई म्हणजे
प्रसववेदना आनंदाने झेलत जाते
आर्त क्षणाचे वैभव असते बाई म्हणजे
पदराखाली दूध पाजते, घास भरवते
आदर्शाचे वैभव असते बाई म्हणजे
राबराबते क्षणोक्षणी संसारासाठी
कष्ट श्रमाचे वैभव असते बाई म्हणजे
आजी आई पत्नी मुलगी सखी नात वा
विश्वासाचे वैभव असते बाई म्हणजे
मुलास नाही मुलीस मिळती असे सोहळे
अंकुरण्याचे वैभव असते बाई म्हणजे
आई असते दुर्गा पार्वती माय यशोदा
मातृत्वाचे वैभव असते बाई म्हणजे
-उर्मिला बांदिवडेकर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments