• गझल प्रभात • (भाग ५१ )
![]() |
Gazalnanda |
🌹 कोजागरी 🌹
शत पौर्णिमांचे चांदणे जा घेउनी तुमच्याघरी
आचंद्र मुक्कामास आली लाडकी कोजागरी
ओठास लाली लावण्या जागा न उरली तिळभरी
लिहिले अनामिक नाव मी केव्हाच या अधरावरी
मी ऐकला नाही कधी स्वर बासरीचा कोवळा
श्रीरंग गेला देउनी वेळूवनाची पावरी
जाऊ नयेसे वाटते माझ्या प्रियाने परतुनी
सांगून आले पावसा तू पाठवी श्रावणसरी
तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्या पुढे पंचारती
मी लावली तेजाळती समई जुनी माझ्या घरी
कित्येक युद्धे जिंकिली होती तिने समरांगणी
रात्रीतुनी भरती तरी का आसवांच्या घागरी
संवेदना सहवेदना केल्या व्यथांनी बोलक्या
डोळ्यातुनी मग बोलली अलवार माझी शायरी
गझलनंदा
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments