Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

"गझलऋतू"च्या शब्दबहराची पखरण Ashok Wadkar

।। पुस्तक परीक्षण ।।

      🌹 "गझलऋतू"च्या शब्दबहराची पखरण🌹

              

"गझलऋतू"च्या शब्दबहराची पखरण
अशोक वाडकर 


        प्रथितयश गझलकारा गझलनंदा व गझलकार प्रसाद कुलकर्णी या दोघांचा एकत्रित गझलसंग्रह "गझल प्रेमऋतूची" ख्यातकीर्त उर्दू शायर मिर्झा गालीब यांच्या २२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून २७ डिसेंबर २०२१ रोजी शानदार समारंभपूर्वक इचलकरंजी येथे प्रकाशित झाला. सदरचा गझलसंग्रह मराठी गझलविधा 'विजा घेऊन येणाऱ्या नव्या पिढ्यां'पर्यंत पोहोचवणारे गझल सम्राट सुरेश भट ऊर्फ "दादा" यांना अर्पण केला आहे.


      संग्रहाच्या सुरुवातीस "प्रेमऋतूच्या पखरणीपूर्वी" या शीर्षकाखालील प्रास्ताविकात गझलकारांनी प्रेमऋतूवरील संग्रह काढण्यामागील आपली मनोभूमिका व संग्रहाची वैशिष्ट्ये विशद केली आहेत. शिवाय प्रेम या संकल्पनेबाबतचा आपला उदात्त दृष्टिकोणही मान्यवरांच्या व्यापक विचारधारांच्या आधारे विस्ताराने मांडला आहे.


         २०२० व २०२१ ही दोन वर्षे मानवजातीला कोविड - १९ या वैश्विक महामारीने ग्रासले असून तो धोका व भिती अजूनही संपलेली नाही. प्रेमाची प्रस्थापनाच केवळ दु:खमुक्तीचा मार्ग आहे या विश्वासापायीच या संग्रहाची निर्मिती आहे असे गझलकार मानतात. शिवाय आजचा आसमंत या ना त्या कारणांनी राग, द्वेष, मत्सर या कुरूपतेने प्रदुषित झाला आहे. हा दु:खमय जीवनप्रवास आपल्या आवडत्या गझल विधेमधून प्रेममय करण्याच्या उदात्त हेतूने 'प्रेमऋतुची गझल' आळवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयोग हा निश्चितच स्तुत्य असा आहे. यातूनच "गझल प्रेमऋतूची" हा 'प्रेमाच्या विविध छटांच्या गझलांचा महाराष्ट्राच्या दोन टोकास राहणाऱ्या विदर्भातील गझलनंदा ऊर्फ प्रा.सुनंदा पाटील व दक्षिण महाराष्ट्रातील प्रसाद कुलकर्णी या तीन-चार तपे गझल लिहिणाऱ्या दोन गझलकारांचा एकत्र संग्रह काढण्याची संकल्पना पुढे आली. अशी घटना एकमेवाद्वितीय अशी आहे. या संग्रहातील गझला "मुसलसल" म्हणजे प्रेम या एकाच विषयावरील असून त्यामध्ये सम पृष्ठक्रमांकावर प्रसाद कुलकर्णी यांच्या तर विषम पृष्ठक्रमांकावर गझलनंदा यांच्या गझला दिल्या आहेत. संग्रहात प्रेमाच्या विविध छटा अभिव्यक्त करणा-या प्रत्येकी पन्नास निवडक गझलांचा समावेश आहे. हे दोनही गझलकार मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भटांची "गझलची बाराखडी" गिरवणारे एकनिष्ठ शिष्य आहेत. शिवाय हे दोघेही गझल विधेच्या प्रसार व प्रचार कार्यासाठी व्रतस्त वृत्तीने कार्यरत असून गझल लिहू पाहणाऱ्यांचे मार्गदर्शकही आहेत. या संग्रहाच्या शेवटी तब्बल वीस पानांचा गझलेचे तंत्र व व्याकरण याची अनेक बारकाव्यासह तंत्रशुद्ध मार्गदर्शक माहिती देणारा "मराठी गझल : स्वयंअध्ययनाची अंकलिपी" हा गझलनंदा यांनी लिहिलेला प्रदीर्घ लेख समाविष्ट करण्यात आला आहे. तो निश्चितच गझलकारांच्यादृष्टीने अभ्यसनीय असा आहे. हे आणखी एक या संग्रहाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. 


पुस्तकाचे मुखपृष्ठ, निर्मिती व मांडणी आशयाला साजेशी व मनोवेधक अशी आहे. एकंदरीत हा संग्रह आशयगर्भ व लोभस असल्याने संग्राह्य झाला आहे.


संग्रहातील काही उल्लेखनीय शेर उद्धृत करण्याचा मोह होतो आहे. ते खालील प्रमाणे:


गझलनंदा यांचे काही शेर --


मुशाय-याने रंगत गेली रात्र गुलाबी

  ओठांवरची पहाटगाणी आपण गावी...  

  भेटलास तू अन् श्वासाला सूर गवसला

  नशा गुलाबी प्रेमऋतूची" मला चढावी. (पृ.क्र.१७)


गंध वेडा प्राशिताना मूक होते श्वास सारे

   बोलक्या स्पर्शाविनाही अर्थ त्या नात्यास होता...

   रात्र होती रंगलेली रंगला तांबूल ओठी

   मी पहाटे जागताना धुंदला नि:श्वास होता.(पृ.क्र.३९)


 लय तालाने येत समेवर मैफल जिंकत गेले

   गुणगुणताना गझल मनीची सुरात आला श्रावण...

   ओठावरती पुन्हा उमटली मेघसावळी नक्षी

   पहाट होता प्रणयाची मग भरात आला श्रावण.                                            

                                                        (पृ.क्र.७९)


 हा दुरावा जीवघेणा रात्र आहे यौवनाची

   बोल प्रेमाच्या फुला ही शेज आहे चांदण्याची...

   पांघरावे चांदणे अन् हात चंद्राचा उशाला

   ओठ मिटले मी कधीचे वेळ नाही बोलण्याची.

                                                     (पृ.क्र.१११)



किती वादळे कितीक लाटा भरकट भरकट होते

   लगेच हसते गलबत त्याला पुन्हा किनारा दिसतो...

   पहाट होता दिशा उजळती प्राचीवर ये लाली

   फुलून येते कळी मनाचा मोरपिसारा फुलतो.            

                                                        (पृ.क्र.११३)


प्रसाद कुलकर्णी यांचे काही शेर --


 जसे शब्द माझे तुझे ओठ प्याले

   तुझा सूर माझ्या गळ्याशी उतरला...

   इथे मैफलीही स्वत:शी म्हणाल्या

   ठसा लख्ख याच्या गझलचा उमटला. (पृ.क्र.६६)


 सांगती हे जीवनाचे हेलकावे

   पैंजणांचे जाहलेले चाळ आता...

   भेटलेल्या माणसांना साठवाया

   मी गझलशी जोडलेली नाळ आता. (पृ.क्र.४२)


 प्रेमरसाळी अभंग म्हणतो हे गझलेला

   तुझ्या एकदा मुशाय-याला यावे म्हणतो...

   मी जगण्याच्या नऊ रसांनी सदा बहरलो

   प्रेमरसाचे श्रेय गझलला द्यावे म्हणतो. (पृ.क्र.३८)


येणारच स्वप्न फळाला ही मजला खात्री होती

   स्वप्नांचे माझ्या सगळे तू लाड पुरवले होते...

   गझलेचा प्रियकर होणे हे साधेसोपे नसते

   एकेका शेरासाठी मी रक्त अटवले होते. (पृ.क्र.८०)


 नात्यातल्या जमिनीमध्ये ओला जिव्हाळा पेरला

   ओलीत त्या ओलायचे। माझे तुझे नाते प्रिये...

   प्रेमातुनी उगवायचे, प्रेमासवे प्रेमायचे

   सारे ऋतू बहरायचे माझे तुझे नाते प्रिये. (पृ.क्र१००)



 लेखक- अशोक म. वाडकर

----------------------------------------------------------------                 

"गझलऋतू"च्या शब्दबहराची पखरण

                

पुस्तकाचे नाव - "गझल 'प्रेमऋतूची"

लेखक - गझलनंदा / प्रसाद कुलकर्णी

प्रकाशक - प्रसाद माधव कुलकर्णी

               समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी

पृष्ठे - १३९, मूल्य - ₹१७५/-

--------------------------------------------------------------------------------

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था 

Post a Comment

0 Comments