 |
Gazalkar Anant Deshpande |
🌼 दिवाळी विशेष 🌼
🌹ऐकली ना खंत कोणी रुक्मिणीची 🌹
वागणे साधे सरळ ही रीत माझी नेहमीची
एवढी आहे कदाचित गोष्ट माझी काळजीची
उजळुनी आकाश क्षणभर काजवा चमकून गेला
मी करत बसलो अपेक्षा रात्रभरच्या सोबतीची
देह आत्मा सर्वकाही देणगी जर ईश्वराची
व्यर्थ आहे ठेवणे मी भावना ही मालकीची
वेळ नाही देत विठ्ठल सारखा भक्तात रमतो
ऐकली ना खंत कोणी शांत सोशिक रुक्मिणीची
आरशामध्ये जरासे पाहिले निरखून जेंव्हा
मी तिथे नव्हतोच.. होती फक्त प्रतिमा ओळखीची
एवढ्यातच जाणले मी मर्म आहे जीवनाचे
मागुनी आली लगोलग एक वार्ता जगबुडीची
सोडुनी तू वाट सोपी जर निवडला मार्ग खडतर
चाल तू पायी अनंता सोय नाही पालखीची
अनंत देशपांडे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments