Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलेचा आस्वाद घेणे - एक कला Gazalkar Dr Shivaji Kale

 🌼 दिवाळी विशेष* 🌼

गझलेचा आस्वाद घेणे - एक कला
गझलकार डॉ शिवाजी काळे 


🌹 गझलेचा आस्वाद घेणे - एक कला🌹



     आपण जेव्हा एखादे शिल्प, चित्र, किंवा वास्तू पाहतो तेव्हा त्या कलाकृतीचे मोजमाप किंवा त्यामागचे शास्त्र याचा विचार करत नाही. तसेच ती कलाकृती घडवण्यामागे कलाकाराचे किती कष्ट दडलेले असतात हेही पाहत नाही. तर आपण फक्त त्या सौंदर्याचा आस्वाद आधी घेतो आणि आस्वाद घेऊन झाल्यावर त्या कलेचे जाणकार असू तरच इतर बाबींकडे लक्ष देतो. अगदी त्याच पद्धतीने गझलरसिकानेही गझलचा आस्वाद घेणे अपेक्षित असते. चांगली गझल लिहिणे ही जशी एक कला आहे तसेच चांगल्या गझलेचा योग्य पद्धतीने आस्वाद घेणे हीसुद्धा एक कलाच आहे. ही कला जर रसिकाला अवगत असेल तरच तो गझलेच्या अंतरंगात डोकावून शेरांच्या आशयाशी एकरूप किंवा तद्रूप होऊ शकतो.

गझल असो वा इतर कुठली कला असो तिच्या आतमधे डोकावल्याशिवाय आपल्याला खरे सौंदर्य समजू शकत नाही. वरकरणी पाहून आपण त्या सौंदर्याचा फक्त अंदाज बांधू शकतो. एखादी सुबक वास्तू बाहेरून पाहताना आपल्याला तिच्या अंतर्गत गोष्टींचा, आतल्या कलाकुसरीचा आस्वाद घेता येत नाही. त्यासाठी आतमधे फिरूनच प्रत्येक गोष्ट बारकाईने पहावी लागते. एकदा आपण अंतरंगात शिरलो तर मोहित होऊन बाहेर पडणेही विसरून जातो हा प्रत्येकाचा अनुभव असतो. हा अनुभव गझलेच्या बाबतीत ज्याला घेता येतो, गझलेमधे जो सर्व बाजूंनी एकरूप होऊ शकतो, आशयाच्या प्रत्येक अंगाशी तद्रूप होऊन भान हरपून जातो त्यालाच ही कला अवगत झाली असे म्हणावे लागते आणि तोच खरा गझलरसिक समजला जातो.

अर्थात हे सर्व ज्या गझलेच्या बाबतीत आपण बोलत आहोत ती गझलही त्याच ताकदीची आणि रसिकाला स्वतःमधे डोकावून बघायला भाग पाडणारी दर्जेदार गझल आहे असे गृहीत धरले आहे. फक्त गझल आहे म्हणजे ती चांगलीच असेल असे नसते. चांगली गझल ओळखणे हे सर्वस्वी रसिकाच्या जाणकार असण्यावर आणि त्याच्या अभिरुचीवर अवलंबून असते.

चांगली गझल ओळखून तिचा आस्वाद घ्यायचा असेल तर सतत उच्च दर्जाच्या गझल वाचून किंवा ऐकून गझलवृत्ती समजून घ्यावी लागते आणि तशी आपली गझलदृष्टी तयार करावी लागते. चांगल्या गझलेतला चांगला शेर हा शांत डोहामधे अचानक पडलेल्या खड्यासारखा असतो. तो रसिकाच्या अंतर्मनामधे असे काही तरंग निर्माण करतो की अगदी शेवटचा तरंग मनाच्या काठावर पोहोचल्याशिवाय मनाचा डोह पुन्हा शांत होऊ शकत नाही .

परंतु दरवेळी गझल किंवा शेर अशी हळुवार तरंगनिर्मिती करेलच असे नाही . काही गझला रसिकाच्या मनावर जोरकसपणे येऊन आदळतात. काही वरकरणी काहीच परिणामकारकता न दाखवता मनात खोलवर डुबकी मारून खळबळ माजवतात. तर काही मनाला अगदी सैरभैर करून टाकतात. हे सगळे त्या गझलेच्या एकंदरीत मूडवर अवलंबून असते. गझलेच्या शेरांचे आशय विषय भिन्न असले तरी बऱ्याचदा शेरांचा भावनिक मूड मात्र सारखा असतो. कारण गझल सुचताना गझलकाराची जी तंद्री लागलेली असते तिच्यामधून समान मूड असणाऱ्याच शेरांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. या मूडशी एकदा वाचक एकरूप झाला की उत्तेजित होणे किंवा अंतर्मुख होणे हे परिणामस्वरूप दिसून येते. 

गझल ही चालता बोलता वरवर वाचण्याची बाब नाही किंवा अगदी बैठक मारून पुस्तकाचा फडशा पाडण्याचीही गरज नाही. तुम्ही आनंदी असाल तर तुम्हाला वेगळ्या अर्थाने उदास करण्याची किंवा दुःखी असाल तर आनंदी करण्याची ताकद गझलेमधे असते. गझलेतला प्रत्येक शेर हळुवारपणे उलगडून घ्यावा लागतो. शेररुपी कळीच्या पाकळ्या विलग करताना गझलकाराने दडवून ठेवलेल्या आशयरुपी पुंकेसराला किंवा स्त्रीकेसराला जराही धक्का लागू द्यायचा नसतो. तरच त्या शेराच्या आशयाचे सुंदर उमललेल्या फुलात रुपांतर होते. नाहीतर विचका ठरलेलाच. अर्थाचा प्रत्येक पदर, प्रत्येक शक्यता स्वतःमधे मुरवून घ्यावी लागते. हे करत असताना गझलकाराप्रमाणेच रसिकाचीही तंद्री लागायला हवी. या तंद्रीमधेच कुठेतरी शेराच्या स्वच्छ, नितळ आणि तेजस्वी अर्थापर्यंत रसिक पोहोचतो आणि एक अवर्णनीय अशी अनुभूती घेतो. शेराच्या काही मोजक्या शब्दांमधे फक्त गझलकाराचे भावविश्व दडलेले नसते तर त्याने प्रतिभेच्या उच्च अविष्काराच्या माध्यमातून रसिकाचेही भावविश्व गुंफलेले असते. त्या आशयाशी आपल्या भावनांची सांगड कुठेतरी नक्कीच जुळते आणि हे तर आपलेच अंतर्मन बोलत आहे असा साक्षात्कार शेर वाचत असताना होतो. 

कुठलाही गझलसंग्रह सलग वाचण्याची गरज नसते. प्रत्येक शेर स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती घेऊन येत असल्यामुळे संग्रहातील कुठलेही पान उघडून कुठल्याही गझलेतला कुठलाही शेर अशा पद्धतीने मनात घोळवला तर हीच अनुभूती वारंवार घेता येते. गझलकार एकदा शेर लिहून जातो आणि गझलवृत्ती असलेल्या रसिकाला मात्र तो आयुष्यभर पुरतो. 

ही गझलवृत्ती गझलकारामधे आधीपासूनच असते. म्हणून तर तो वाचकाला खिळवून ठेवणारी गझल लिहू शकतो. परंतु वाचकामधेही गझलवृत्ती असेल तरच जीवा शिवाची भेट होऊन ब्रम्हानंदी टाळी लागते. पण गझलवृत्ती नेमकी ओळखायची कशी आणि अंगी बाणवायची कशी ? तर यासाठी एक साधे उदाहरण देतो. आपण बागेत बसलेलो असताना आपल्याभोवती एक सुंदर फुलपाखरू घिरट्या घालत असेल तर आपण अतिशय स्तब्ध राहून त्याला आपल्या तळहातावर बसू द्यावे आणि त्याच्या रंगांचे, सौंदर्याचे भान हरपून निरीक्षण करत रहावे. ते फुलपाखरू म्हणजेच शेर समजून आशयाचे रसपान करण्याचा प्रयत्न केला तर गझलवृत्ती समजते आणि वाढीस लागते. पण त्या फुलपाखराला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमच्या बोटांना अर्थाचे थोडेफार रंग लावून फुलपाखरू उडून जाईल आणि जाताना स्वतःचा पंख मात्र फाडून घेईल. फुलपाखराला तळहातावर बसू द्यायचे की चिमटीत पकडायचे हे ज्याला समजेल तो खरा गझलरसिक होईल आणि गझलसागरात डुंबत राहील.

प्रत्येक शेराच्या आशयाचा एकेक पदर उलगडत रसिक जेव्हा गझलकाराला मनोमन दाद देतो तेव्हा ती दाद गझलकारापर्यंत पोहोचो अथवा न पोहोचो पण एक रसिक तृप्त केल्याचे समाधान मात्र गझलकाराला लाभत असते. तेव्हा खऱ्या अर्थाने गझलरसिक बनून गझलेचा आस्वाद घेण्याची कला अंगात मुरवून घ्या आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक कोपरा आनंदाने उजळवून टाका.


डॉ. शिवाजी काळे


_______________________

संयोजक: भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था

_______________________

Post a Comment

0 Comments