• गझल प्रभात • (भाग ५९ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
Gazalkar Siddharth Bhagat |
🌹जीर्ण बुंध्याशी थवे पाखरांचे थांबले🌹
हे कसे मी खोड जाळू एवढ्यातच वाळले
जीर्ण बुंध्याशी थवे जर पाखरांचे थांबले
चिंतिले वाईट ज्यांनी सारखे माझे इथे
काय त्यांच्याने कधी होणार कोणाचे भले
उत्तरांना वाटलो मी वर्ज्य येथे आजही
तेवढे नक्कीच होते प्रश्न माझे चांगले
दाखवायाचा जगाला सोस हा नाही बरा
जाणते आहेत सारे लोक येथे बैसले
लेकरांनी आळ घ्यावा मायच्या पान्ह्यावरी
हे असे आक्रीत येथे कां घडाया लागले
त्याच वाटेने निघालो घेत मागोवा तुझा
पोळती वाटेवरी ज्या प्रस्तरांची पावले
पूर्तता आश्वासनांची आज नाही तर उद्या
ह्या विकासाच्या भुलीने गाव सारे ग्रासले
लागती सत्तेस केवळ याच बाबी मोजक्या
बाटली, सेवेस बाई अन् जिभेचे चोचले
संपले माझे अखेरी सौख्य अज्ञानातले
काढले बाहेर जेव्हा शब्द तू ओठातले
घालतो पाऊस पिंगा नित्य माझ्या लोचनी
हे मला नक्षत्र ऐसे बारमाही लाभले
मी दरोडेखोर किंवा चोरही नव्हतो जरी
फक्त तू गावात अख्ख्या दार नाही खोलले
घातला बाजार सारा पालथा कोठेच पण
भेटले नाही विषाचे थेंबही स्वस्तातले
सिद्धार्थ भगत
यवतमाळ
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments