कोषस्थ स्त्री जाणीवांची,साहित्य संवेदनांची दिवाळी
![]() |
| डॉ. स्नेहल कुलकर्णी |
- गझल मंथन साहित्यसंस्था कोरपना आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी आयोजित पहिले अखिल भारतीय महिला गझल संमेलन
दि.१९ नोव्हेंबर रोजी गझल मंथन साहित्य संस्था कोरपना आणि पुणे कार्यकारिणी यांच्यातर्फे संपन्न झालेले अखिल भारतीय महिला गझल संमेलन.... म्हणजे महिला गझलकारांच्या साहित्य संवेदनांची,कोषस्थ स्त्री जाणीवांची धुमधडाक्यात साजरी झालेली दिवाळी..... असंच म्हणावं लागेल...!!!
प्रवेशद्वार गंधित करणारा अलवार गुलाबफुलांचा गंध,मंद वारा,रोषनाईने सजलेला हॉल....अन्... अन्..
चेहऱ्यावर प्रसन्न उत्कटता, ओठांवर गुलाबी हास्य..डोळ्यात भिरभिरती मोरपंखी फुलपाखरे ...... घेऊन अवतरणारी.. एकेक गझलकारा....!!
तिच्याही नकळत गळून पडलेला.. वयाचा,काळाचा, भवतालाचा बंध ...'ती'.. चा नवपरिणीत मुक्त आविष्कार..!!
नखशिखान्त सुंदर दिसणारी... ती.....!
नाजूकशी चाल
शब्दांचा ताल....!
वृत्ताची लय...
गझलेची सय..!!
असा गझलमय माहोल.....आणि त्यात मैत्रिणीच्या गळाभेटीपासून शेराच्या, गझलेच्या अंतरंगात..एका स्वप्नमयी दुनियेत घेऊन गेलेला... श्वासावर कोरलेला एक मोहमयी दिवस... केवळ अविस्मरणीय..!!
संमेलनाच्या अध्यक्षा आ.शोभाताई तेलंग, उदघाटक आ. संगीताताई जोशी, या संमेलनात गझलक्रांती पुरस्काराने सन्मानित झालेल्या आ. देवकामाई देशमुख,प्रमुख अतिथी आ. उर्मिलाताई बांदोडेकर, आ. संदीप गुप्ते,आ. म. भा. चव्हाण,आ. प्रमोददा खराडे, आ. जयवंत वानखेडे, आ. देवकुमार गुमटकर..यांच्यासमवेत व्यासपिठावर विराजमान होणं.. अत्यन्त आनंददायी अभिमानास्पद होतं.सुप्रसिद्ध गझलकारा, सुहास्यवदना वैशाली माळी हिचे आपुलकीने भारलेले सूत्रसंचालन... त्या गझलमयी मंदिरात घंटेसारखे किणकिणत होते.
संमेलनाची स्वागताध्यक्षा म्हणून विराजमान होणं,
व्यासपिठावरील चार विदुषीवर, प्रमुख गझलज्ञानी अतिथीवर, त्यांच्या गझलप्रवासावर भाष्य करणे,त्यांचे स्वागत करणे... ही माझ्यासाठी परमभाग्याची चिरंतन आनंददायी गोष्ट होती.
त्यानंतर रंगलेला स्वागतसोहळा... व्यासपीठावरील आम्हा सर्वांना मिळालेली पैठणी, मायेची भाऊबीज... गझलमंथन साहित्यसंस्था कार्यकारिणीने केलेलं आमचं माहेरपण.... काय बोलू...? ती पैठणी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करेल.... माझी अन् माझ्यातल्या गझलेची...!!!
आ. शोभाताई, संगीताताई, देवकाताई... या तिघींचेही मनोगत थेट आ. सुरेश भटांच्या गझलदालनात घेऊन गेले..गझलेचे अनोखे हुंकार साद घालू लागले...अन् डोळ्यात आसवे दाटली. अगदी खरं सांगायचं तर.. क्षणभर त्या तिघींचाही प्रचंड हेवा वाटून गेला...!!!
संमेलनात गझलमंथन साहित्य संस्थेचा गझलअमृत हा दिवाळी अंक आणि गझलयात्री हा महिला गझलकारांचा संग्रह प्रकाशित झाला.. हा एक दुग्धशर्करा योगच...!!
याप्रसंगी ज्येष्ठ गझलकारा देवका देशमुख यांना गझलक्रांती पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आ.प्रदीप तळेकर, ऍड. मुकुंदराव जाधव,आ.बा ह मगदूम,डॉ मंदार खरे,गझलकारा वैशाली माळी यांना गझलयात्री सन्मान बहाल करण्यात आला.... तो यथोचित सन्मान पाहून डोळे तृप्त... तृप्त..झाले..!!
त्यानंतर संगीता जोशी, रत्नमाला शिंदे, श्रद्धा खानविलकर, डॉ. मीना सोसे, सुनीती लिमये.. ह्या जेष्ठ गझलकारांच्या अध्यक्षतेखाली...उत्तरोत्तर मुशायरे....रंगत गेले. प्रत्येकीचे अध्यक्षीय मनोगत गझलेचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. प्राजक्ता पटवर्धन, यशश्री रहाळकर, अमृता जोशी, रजनी निकाळजे, सरोज चौधरी, विजयाताई नवले... यांनी अप्रतिम सूत्रसंचालन करून मुशायरे अधिक बहारदार, रंगतदार केले.
उर्दू, मराठी गझल अभ्यासक, सुप्रसिद्ध गझलकार डॉ. संदीप गुप्ते,.. मराठी गझलेतील अढळस्थान..आ.म. भा. चव्हाण..यांच्या विचारधारा ऐकणे म्हणजे निःशब्द होणं...!
प्रमोददादांचे मूक आस्तित्व.. म्हणजे आश्वासक साथ...!!
कार्यक्रमाच्या शेवटी lucky draw काढून दोन महिला गझलकारांना चांदीची मूर्ती तर पहिलं बक्षीस... पैठणी देण्यात आली. अनपेक्षितपणे मिळालेलं हे बक्षीस घेतानाचा त्यांचा चेहऱ्यावरचा बाल आनंद... खूप काही सांगून गेला...!!आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आलेल्या सर्व गझलसख्यांची झालेली गळाभेट... कुणा एकीचं नाव घेत नाही... पण प्रत्येकजण नजरेत बसलीय, काळजात विसावलीय...... स्नेहाने कायमची बांधली गेलीय. गझलेने दिलेली... ही सर्वात अनमोल भेट आहे. स्नेह असाच राहू दे सख्यांनो...😊🌹.उत्कृष्ट आयोजन,चहा, जेवण, नाष्टा यांसह वेळेचेही उत्तम नियोजन, कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकाला संतुष्ट करणारा ( खरंतर हे सगळ्यात अवघड काम असतं )हा सर्वांगपरिपूर्ण सोहळा....हा यशस्वी करण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिलदा कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखेडे,प्रसिद्धी प्रमुख... गझलकार भरत माळी गझल मंथन साहित्य संस्था मार्गदर्शक समितीचे सर्व पदाधिकारी ,पुणे विभागप्रमुख प्रदीप तळेकर, उपप्रमुख डॉ. मंदार खरे, सचिव वैशाली माळी, पुणे जिल्हाध्यक्ष बा. ह. मगदूम, विजया नवले, रेखा कुलकर्णी, रेखा देशमुख, तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले....त्यांच्या परिश्रमाचा यशस्वी पडसाद म्हणजे हे संमेलन....,, त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे....!!! हे अखिल भारतीय महिला गझल संमेलन...निश्चितच उत्कृष्ट साहित्यिक संमेलनाचे मापदंड बनेल... गझलविश्वातील मैलाचा दगड बनेल, ऐतिहासिक बनेल, गझलविश्वात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल असा विश्वास वाटतो......!!!
या संमेलनावर जितकं लिहावं.. तितकं कमीच...!
आणखी काय हवं ना...?
.. दिशा
डॉ. स्नेहल कुलकर्णी
_________
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
गझल मंथन साहित्य संस्था
_________


0 Comments