• गझल प्रभात • (भाग ७६ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकारा सुनेत्रा जोशी |
🌹बरकत आहे..🌹
अंतर्यामी काही माझ्या प्रसवत आहे
ह्रुदयामधले शब्दांमधुनी उमटत आहे
दिसती काळे माराचे वळ अंगावरती
मळवट का मग माथ्यावरती मिरवत आहे
पदराचा ना वापर उरला लज्जेसाठी
दिवसाकाठी खांद्यावरुनी सरकत आहे
दोघांमध्ये प्रेमाचा का चाफा फुलला
नकळत त्यांच्या दरवळ त्याचा पसरत आहे
दारी येता भाग्याचे क्षण वेळोवेळी
हातावरची रेषा त्यांना चकवत आहे
सौख्याची त्या उंची वाढत नव्हती नखभर
दुःखाला पण आता माझ्या बरकत आहे.
मर्यादांचे कुंपण अवघ्या आयुष्याला
बाईपण ही तारेवरची कसरत आहे
सौ. सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments